फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक
क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान
मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद
मुंबई, दि. 19 - मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने मर्यादित असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले.
मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे आयोजित विशेष कार्यक्रमात भारतीय तसेच मराठी बांधवांशी संवाद साधला. या कार्यक्रमात प्रवासी मराठी समाजाशी संबंध अधिक दृढ करण्यावर भर देत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रवासी मराठी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या 12 कलमी उपक्रमांची घोषणा केली. त्यामध्ये जागतिक महाराष्ट्र मंडळांचा डेटाबेस तयार करणे, अधिकृत ई-मेल प्रणालीद्वारे संपर्क, डिजिटल माध्यमातून जागतिक महाराष्ट्र दिन साजरा करणे, जागतिक प्रवासी महाराष्ट्र मंडळ स्थापन करणे, स्वतंत्र लोगो व संकेतस्थळ विकसित करणे, डिजिटल नोंदणी पोर्टल सुरू करणे, आभासी संवाद सत्रे आयोजित करणे, गुंतवणूक, विद्यार्थी व सांस्कृतिक विषयांसाठी सिंगल विंडो प्रणाली, एमआयडीसी समन्वय यंत्रणा, तक्रार निवारण यंत्रणा, परराष्ट्र मंत्रालय व भारतीय दूतावासांच्या सहकार्याने विद्यार्थी उपक्रम आणि प्रभावी घोषवाक्य तयार करणे यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment