जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावरील ‘पनामा (टीआर४) रोगाबाबत शास्त्रीय उपाययोजना व जनजागृतीसाठी संयुक्त अभ्यास समिती स्थापन – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. ४ :जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावर आढळलेल्या पनामा (टीआर४) फंगस रोगाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत या रोगाच्या प्रतिबंधासाठी शास्त्रीय उपाययोजना निश्चित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी संयुक्त अभ्यास समिती स्थापन करण्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. या निर्णयामुळे राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पनामा (टीआर४) हा केळी पिकासाठी अत्यंत घातक फंगसजन्य रोग असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने शास्त्रीय आणि समन्वित उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील तज्ञ शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी यांचा समावेश असलेली संयुक्त अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रोगाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना आणि जनजागृती मोहिमेची रूपरेषा तयार करणार आहे.
तसेच केळी पिकावर पनामा (टीआर४) रोगाची लागण झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात, रोगाचा प्रसार कसा थांबवावा आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन कसे द्यावे याबाबतही समिती सविस्तर अहवाल तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment