ठाण्यात ‘मॅन-सिक’ मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न
“मौन सोडू, संवाद साधू”च्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जागृती
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून गैरसमज दूर
ठाणे, दि. 25 (विमाका) :- नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘मॅन-सिक’ हा सार्वजनिक जनजागृती उपक्रम ठाणे महानगरपालिका सभागृह येथे उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.
जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे तसेच ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, वेसाक इंडिया आणि रिझोनांझ कम्यूनिकेशन्स यांचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले ठाणे प्रादेशिक रुग्णालयाचे मानसोपचारतज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी मार्गदर्शन केले. “मौन सोडू, संवाद साधू” तसेच “जाणिवेतून जागृतीकडे” या संकल्पनांवर आधारित या कार्यक्रमात मानसिक आरोग्याविषयी खुले व सकारात्मक संवाद घडवून आणण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान ‘मॅन-सिक सिनेमॅटिक इनिशिएटिव्ह’ अंतर्गत सादर करण्यात आलेल्या लघुपटांनी उपस्थितांच्या मनावर प्रभाव टाकत मानसिक आरोग्याबाबत सहानुभूती आणि जाणीव निर्माण केली.
तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संवादात्मक सत्रांमधून मानसिक आरोग्याशी संबंधित विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चांमुळे मानसिक आरोग्याबाबत समाजात प्रचलित असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन अधिक संवेदनशील, जागरूक आणि कलंकमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्राचे सूत्रसंचलन कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक (माहिती) संजीवनी जाधव-पाटील यांनी केले.
कार्यक्रमास रेझोनासचे कम्युनिकेशनचे समीर निगुडकर, वैभव सावंत, राज्य अधिस्वकृतीचे सदस्य संजय पितळे नागरिक, पत्रकार, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
*****

No comments:
Post a Comment