मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी 55.12 किमी असून मुख्य सागरी सेतू 24.35 किमी लांबीचा असणार आहे. या प्रकल्पात 9.32 किमी लांबीचा उत्तन जोडरस्ता, 2.5 किमीचा वसई जोडरस्ता आणि 18.95 किमीचा विरार जोडरस्ता तयार करण्यात येणार असून आता तो वाढवण बंदरापर्यंत वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील उत्तर-दक्षिण रस्ता जोडणीचे काम सुरू असून दक्षिण किनारी रस्ता, वांद्रे वरळी सागरी सेतू, अटल सेतूचे काम पूर्ण झाले असून आरेंज गेट बोगदा, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, उत्तर किनारी मार्ग, दिल्ली-मुंबई महामार्ग, शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर उत्तन विरार सागरी सेतू आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे मुंबईतील प्रवास अखंड होणार असून वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.
No comments:
Post a Comment