महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२९ वी बैठक झाली. या बैठकीत १८ विषयांना मान्यता देण्यात आली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंजिरी मनोलकर, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल आदी उपस्थित होते.
या बैठकीत महामंडळाच्या जमिनींच्या वापरासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महामंडळाकडील जमिनीची मागणी असल्यास, संबंधित प्रस्ताव 'महाऊर्जा' मार्फतच सादर केले जावेत, असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. तसेच गावठाण विस्ताराव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी जमिनीची मागणी आल्यास, अशा प्रकरणी जागा भाडेतत्वावर देणे किंवा सामंजस्य करार करण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे शेती महामंडळाकडील जमिनीचा ताबा महामंडळाकडेच कायम राहील, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment