नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 8 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही, तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्क्यांची वाढ करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू, वने मंत्री गणेश नाईक, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जपानचे राजदूत ओनो केइची, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासह खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. जे प्रकल्प स्वप्न रूपात होते, ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वास्तवात उतरले आहेत. नवी मुंबई विमानतळाची संकल्पना 1990च्या दशकात झाली असली, तरी अनेक वर्षांपासून ती केवळ कागदावरच होती. प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘प्रगती’ उपक्रमाअंतर्गत या प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर सर्व आवश्यक परवाने मिळवण्यात यश येऊन कामाला वेग आला. हे विमानतळ दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले


No comments:
Post a Comment