उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बाराव्या शतकातील यादवकालीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन-दुरुस्तीकरिता शासनाने 9 कोटी 14 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. जलकुंडातील स्थापत्यदृष्ट्या आकर्षक असणाऱ्या या मंदिराच्या संवर्धनाबरोबरच परिसराचे सुशोभीकरण, सरोवरातील गाळ काढणे, पदपथ-दुरुस्ती, मंदिर जोत्यांचे मजबुतीकरण, गळती प्रतिबंधक योजना, बाग-बगीचा विकास अशी कामे करण्यात येणार आहेत. या मंदिराच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्री भवानी संग्रहालय आणि ग्रंथालय हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्त्वाचे केंद्र आहे. औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी याची स्थापना केली. जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे, शिल्पकला, दुर्मिळ ग्रंथ आणि पुरातन वस्तू यांचा अमूल्य ठेवा या संग्रहालयात जतन केला आहे. संशोधक, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. औंध संग्रहालयाच्या सर्वंकष विकास आराखड्यासाठी 52 कोटी 6 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्याअंतर्गत इमारतीचे संवर्धन, नवीन बांधकाम, अंतर्गत दालनांची उभारणी तसेच चित्रे-शिल्पे-ग्रंथांचे जतन अशा कामांचा समावेश आहे. कंकालेश्वर मंदिर आणि औंध संग्रहालय. या दोन्ही ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, मात्र या वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल राखूनच कामे करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment