बीडच्या जनतेच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिवस-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमळनेर (भां) ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ
बीड,दि.17 (जिमाका) : अनेक दशकांपासून बीडच्या जनतेने प्रतीक्षा केलेली रेल्वे आज बीड येथून सुरू झाली असून, बीडकरांना ऐतिहासिक भेट देत रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवंगत गोपीनाथराव मुंडे, केशरकाकू क्षीरसागर यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमळनेर (भां) ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून केला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, आमदार श्रीमती नमिता मुंदडा, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीणा, विभागीय रेल्वे प्रबंधक राजेशकुमार वर्मा आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment