'फार्मर कप' ची अंमलबजावणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती
राज्यात सर्व तालुके आणि गावांमध्ये 'फार्मर कप' या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करणार आहे. राज्यभरात 'फार्मर कप' उपक्रमाची अंमलबजावणीसाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, एटीई चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित चंद्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे परिमल सिंह, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, सह्याद्री फार्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास शिंदे, मुख्यमंत्री यांचे विशेष सल्लागार डॉ. आनंद बंग, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान, पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव यांची या समितीमध्ये समावेश आहे. उच्चस्तरीय समिती स्थापन झाल्यानंतर ही समिती त्यांचा पहिला कृति अहवाल तीन महिन्यात सादर करेल.
उच्चस्तरीय समितीच्या कार्यकक्षा
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ‘फार्मर कप’चा विस्तार करण्यासाठी सविस्तर कार्ययोजना तयार करणे. शेतकरी सहजपणे सामूहिक शेती आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) स्वीकारतील यासाठी सोपी व उपयोगी कार्यपद्धती तयार करणे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतीवर आधारित उद्योगांमध्ये मूल्यवर्धन घडवून आणण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांना आवश्यक साहाय्य उपलब्ध करून देणे. हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे. कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी करणे, तसेच सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार करणे. शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी ठोस अंमलबजावणी योजना तयार करणे. ‘फार्मर कप’ अंतर्गत प्रत्येक काम निश्चित वेळेत पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक आखणे. अंमलबजावणी करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणांना प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे. योजनांच्या यशस्वीतेसाठी जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करणे. विविध शासकीय विभागांमध्ये सशक्त समन्वय सुनिश्चित करणे असे असेल.
No comments:
Post a Comment