व्हिजन डॉक्युमेंट २०४७ हे राज्याच्या धोरणात्मक निर्णयांची मार्गदर्शक तत्वे
व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखू, विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारू
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणे व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. या व्हिजन नुसार भविष्यातील राज्याची धोरणे तयार करावीत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत यावेळी बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पाणी, वीज, शिक्षण, सामाजिक कल्याण, उद्योग आणि सेवा, तंत्रज्ञान, अर्थकारण हे आजच्या सादरीकरणाचे क्षेत्र होते.
सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सादरीकरण अतिशय चांगले झाले असून त्यात डीप थिंकिंग झाले आहे. आपण योग्य मार्गावर आहोत. पुढील वीस-पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार होतो आहे. व्हिजन म्हणजे दिशा; त्यामुळे आपले गोल आणि त्यांची दिशा निश्चित असणे आवश्यक आहे. केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य व्हावे, यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावली पाहिजे. आपल्या धोरणांची आखणी ह्या व्हिजननुसार झाली पाहिजे. पुढील पाच वर्ष आपण सातत्याने या व्हिजनवर काम केले, तर २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपण नक्की पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले .
No comments:
Post a Comment