पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील
उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार
मुंबई, दि. १५ : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन २,३९९ उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.
या एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याकरीता गठित राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेची बैठक वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे उपस्थित होते. तर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत केलेल्या प्रमुख उद्दिष्टपूर्तीचे तसेच योजनेतील उपचारांच्या यादीत सुधारणेसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या अहवालाचे सादरीकरण केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन्ही योजनेत सुचीबद्ध असलेल्या रुग्णालयाची तालुकानिहाय मॅपिंग करावे. संबंधित तालुक्यात ३० खाटांचे एकही रुग्णालय नसल्यास अशा ठिकाणी उपलब्ध असलेल्या रुग्णालयात योजनेचा लाभ देऊन त्यांच्या देयकाच्या अदागीची वेगळी व्यवस्था निर्माण करावी. तसेच अशा तालुक्यामध्ये ३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी खासगी रुग्णालयांना आमंत्रित करून सुविधा द्याव्यात. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी ग्रामीण भागात आरोग्य मित्रांची संख्या वाढवावी.
No comments:
Post a Comment