सोमवारपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात;
‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत
मुंबई, दि. 13 : पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार दि. 16 जून रोजी तर विदर्भात सोमवार दि. 23 जून 2025 पासून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरीता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, राज्यमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना नजिकच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश व इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यात येईल. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्याशी चर्चा करुन विद्यार्थ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल, यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येतील.
No comments:
Post a Comment