Monday, 2 May 2022

 जुहू समुद्र किनारी फिरायला आलेल्या पर्यटकांनी घेतली

शासनाच्या कामांची माहिती.

· जुहू येथील प्रदर्शनास मिळाला उत्तम प्रतिसाद

मुंबई दि.१; महाराष्ट्र दिन, कामगार दिवस आणि रविवार अशी आज सुट्टी आल्याने जुहू परिसरातील समुद्र किनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली होती. बच्चे कंपनी समुद्राच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होते तर इथेआलेल्या जाणकार आणि सजग पर्यटकांनी शासनाने केलेल्या दोन वर्षातील महत्त्वाच्या कामगिरीची माहिती जाणून घेतली.

             राज्य शासनाच्या विकास कामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे जुहू येथे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे. आज या प्रदर्शनाचा पहिला दिवस होता. पर्यटकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हे प्रदर्शन येत्या पाच तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

            नारळपाणी विकणारे विक्रेते, कामगार दिनानिमित्ताने नाशिक वरून आलेली कामगार वर्गाची सहल, आयटी क्षेत्रात काम करणारा युवावर्ग, शिक्षिका, गृहीणी, नातवांना सोबत घेऊन आलेल्या आजीबाई अशा विविध क्षेत्रातील आणि विविध वयोगटातील पर्यटकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

            शासनातर्फे होत असलेल्या कामांची माहिती इथे आल्यामुळे कळली अशी प्रतिक्रिया युवकांच्या एका गृपने व्यक्त केली . समृद्धी महामार्ग तयार होत आला असल्याचे या प्रदर्शनातून कळले तसेच कोविड काळात झालेल्या कामांच्या माहितीने आपण भारावून गेलो असल्याची प्रतिक्रीयाही इथे आलेल्या एका जोडप्याने व्यक्त केली. समाज माध्यमांवर या प्रदर्शना विषयीची पोस्ट टाकून आपल्या मैत्रिणींना हे प्रदर्शन पाहण्यासाठी आग्रह करेन असे खाररोड येथून आलेल्या युवतीने मत व्यक्त केले.

            दोन वर्ष प्रगतीची महाविकास आघाडीची या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन जनतेच्या पसंतीस उतरत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामुल्य आहे.

           काय आहे प्रदर्शनात

        कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना तोंड देत राज्य शासनाने राबविलेल्या विविधलोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणारे हे सचित्र प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या सर्व विभागीयस्तरावर आयोजन करण्यात आले आहे.

            महाविकास आघाडी सरकारने विविध विकासकामे केली असून कोरोना महामारी आणि अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना राबविल्या असून या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे      

            शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची सचित्र माहिती असलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी केले आहे.

00000


 


 



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi