जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसह
घरगुती नळ जोडणीची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी
मुंबई दि.१६ : - जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व घरगुती नळ जोडणीची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.राज्यातील जलजीवन मिशन अंमलबजावणीचा आढावा मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जलजीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणीची कामे मार्च २०२२ अखेरपर्यंत तसेच नवीन योजनांची कार्यवाही ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यक्रम आखावा व यावर्षीचे निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे.सर्व मुख्य अभियंत्यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या नियमित बैठका घेवून कामांची प्रगती राखावी असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती नळ जोडणी प्रगती, जलजीवन मिशन प्रगतीपथावरील योजना, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या रखडलेल्या योजना, १० वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या योजना,५ ते १० वर्ष कालावधीच्या योजना, ३ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या योजनांची प्रगती,जलजीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणी कामांचा आढावा, नवीन योजनांची कामे या बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर,जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी ,राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कार्यरत सर्व मुख्य अभियंते,अधीक्षक अभियंते यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे मंत्रालयातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
0000
देवेंद्र पाटील /वि. सं. अ./दि.१६ सप्टेंबर २०२१
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत 'अन्न सुरक्षा सप्ताह' राबवा
- अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
मुंबई,दि.१६ : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृतीचे उपक्रम राबवून 'अन्न सुरक्षा सप्ताह' राबविण्याचे विभागाने नियोजन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमांच्या जनजागृतीबाबतच्या नियोजनासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त परिमल सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) गणेश रामदासी यांसह वरिष्ठ अधिकारी या उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, औषधे खरेदी करताना, हाताळताना व प्रत्यक्ष वापरताना घ्यावयाच्या काळजीबाबत सर्वसाधारण माहिती ग्राहकांना उपलब्ध झाली पाहिजे. सध्या सणांचा कालावधी आहे अशावेळी अन्न भेसळीच्या घटना घडू शकतात. अन्नभेसळ कशी ओळखावी याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. अन्न व सुरक्षा मानके प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या योजना यांची रेल्वे स्टेशन नजिकचा परिसर, खाऊ गल्ली, भाजीपाला व फळबाजार आदी विविध ठिकाणी जनजागृती होणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर भर देवून प्रचार व प्रसिध्दीचे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया व सर्व माध्यमांव्दारे प्रसिध्दी करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केल्या.
यावेळी अन्न व औषध प्रशासन, अन्न सुरक्षा व मानके कायदा व विभागाची माहिती, उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment