चिपी विमानतळ उड्डाणास सज्ज;
9 ऑक्टोबर रोजी उद्घाटन
मुंबई, दि. 23 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले असून येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमानातळाचे उद्घाटन होणार आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या कामाची माहिती दिली. उड्डाणासाठी विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले. उद्घाटनप्रसंगी येणाऱ्या विमानाचे बुकिंग पूर्ण झाले आहे.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी आदी बैठकीला उपस्थित होते.
***
टाइम्स ग्रुपच्या ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर’ पुरस्काराने
उद्योगमंत्री सुभाष देसाई सन्मानित
मुंबई, दि. 23 : टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर' पुरस्कार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना प्रदान करण्यात आला.
मुंबईतील वांद्रे येथील हॉटेल ताजमध्ये झालेल्या सोहळ्यात श्री. देसाई यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना संकटकाळात उद्योगचक्र गतिमान ठेवण्यात उत्पादन क्षेत्राचा मोठा वाटा राहिला. उत्पादन क्षेत्रातील जाणकारांच्या सूचनांचा विचार करून राज्य शासन नवनवीन धोरणे ठरवत आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांत राज्यात सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यातून सुमारे तीन लाख जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. उद्योगक्षेत्राने राज्य शासनावर दाखविलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले. जगाची गरज ओळखून उद्योगक्षेत्रात क्रांतीकारक बदल घडत आहेत. ते स्वीकारून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
या सोहळ्यादरम्यान विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत परिसंवाद झाला.
***
No comments:
Post a Comment