Saturday, 25 July 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संगणक-आधारित परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संगणक-आधारित परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित

 

मुंबई, दि.२२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित केला आहे. याबाबत आयोगाने शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

 

आयोगाने २५ जून २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे २०२७ पासून या परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र विविध उमेदवारांकडून प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने (ओएमआर) आधारीत घेण्यासंदर्भात प्राप्त झालेली निवेदने विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित (सीबीटी) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचा निर्णय जुलै, २०२७ पर्यंत स्थगित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या कामकाजात पारदर्शकता

 राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शासकीय आरोग्य संस्थांचे बळकटीकरण यावर विशेष भर देत प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण व मोफत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्वच घटकांनी संवेदनशीलपणे व समन्वयाने काम करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

Friday, 24 July 2026

महात्मा फुले जनआरोग्य योजना ही खाजगी रुग्णालयकेंद्रित नसून जनताकेंद्रित योजना

 मंत्री आबिटकर म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजना ही खाजगी रुग्णालयकेंद्रित नसून जनताकेंद्रित योजना आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय आरोग्य संस्थांच्या माध्यमातूनच या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. शासनाच्या आरोग्य योजनांचा अधिकाधिक निधी शासकीय रुग्णालयांकडे वळल्यास आरोग्य विभागाची अंतर्गत यंत्रणा अधिक बळकट होईल. यासाठी क्षेत्रीय व्यवस्थापक आणि जिल्हा समन्वयकांनी प्रभावीपणे काम करून जिल्हा शल्यचिकित्सक व संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय ठेवावा. तसेच शासकीय रुग्णालयांतील क्लेम मंजुरीतील अडचणी तातडीने दूर करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.

 

राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शासकीय आरोग्य संस्थांचे बळकटीकरण यावर विशेष भर देत प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण व मोफत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्वच घटकांनी संवेदनशीलपणे व समन्वयाने काम करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे ६० टक्के उपचार शासकीय रुग्णालयांतच व्हावेत

 महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे ६० टक्के उपचार

शासकीय रुग्णालयांतच व्हावेत

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

·         आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करा

 

मुंबई, दि. २२ : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किमान ६० टक्के उपचार शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातूनच झाले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश देत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले  राज्य आरोग्य हमी योजनेचा जास्तीत जास्त निधी शासकीय रुग्णालयांकडे वळविल्यास शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

आरोग्य हमी सोसायटीची आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत ते बोलत होते.  बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. सुनील भोकरे उपस्थित होते. तर राज्यातील सर्व क्षेत्रीय व्यवस्थापक आणि जिल्हा समन्वयक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

स्वायत्त महाविद्यालयांसाठी राज्यस्तरावर एकसमान मार्गदर्शक सूचना तयार करा

 स्वायत्त महाविद्यालयांसाठी राज्यस्तरावर एकसमान मार्गदर्शक सूचना तयार करा

-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

·         १५ ऑगस्टपूर्वी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे

 

मुंबई, दि. २२ : राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांच्या कामकाजात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणि एकरूपता आणण्यासाठी राज्यस्तरावर एकसमान मार्गदर्शक सूचना १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी तयार करून निर्गमित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेला दिले.

 

राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते.

 

बैठकीत राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांकडून आकारण्यात येणारे विविध शुल्क, त्या शुल्कांना संबंधित विद्यापीठांची मान्यता, संलग्नीकरण शुल्क, तसेच सध्या सुरू असलेले आणि नव्याने सुरू करण्यात येणारे अभ्यासक्रम यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले की, राज्यात सध्या उच्च शिक्षण विभागांतर्गत १५१ स्वायत्त महाविद्यालये कार्यरत असून, ही महाविद्यालये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्वायत्त महाविद्यालयांसाठी एकसमान धोरणात्मक मार्गदर्शक सूचना आवश्यक आहेत.

 

या मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०२३ मध्ये निर्गमित केलेल्या अधिसूचनेच्या आधारे तयार करण्यात येणार असून, त्याची जबाबदारी महासार्ककडे सोपविण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी या मार्गदर्शक सूचना अंतिम करून निर्गमित करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

 

२४ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए), पुणे येथे राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या बैठकीत स्वायत्त महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांवर विशेष सत्र आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी दिली.

 

बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ मध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत

 दिलखुलासआणि जय महाराष्ट्रमध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात

 सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत

 

मुंबई, दि. २४ : राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आशा-आकांक्षांना नवी उमेद देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी सविस्तर माहिती देणारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रआणि दिलखुलासया लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने शासनाने शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार कमी करून त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यासाठी सक्षम करणे, आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

या विशेष मुलाखतीमध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी योजनेची उद्दिष्टे, पात्रता, लाभाचे स्वरूप, लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया, अंमलबजावणीची कार्यपद्धती तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कसा लाभ मिळणार आहे, याची सोप्या आणि सविस्तर शब्दांत माहिती दिली आहे. योजनेबाबत असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही या मुलाखतीतून मिळणार असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत शासनाच्या या निर्णयाची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दिलखुलासकार्यक्रमातून ही मुलाखत दि. २७ व २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून; तसेच न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

जय महाराष्ट्रकार्यक्रमामध्ये ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे; तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होईल. या मुलाखतीचे निवेदन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले आहे.

 

महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

0000

‘का रुसली रखुमाई’ संगीतमय नाट्यप्रयोगातून

 का रुसली रखुमाई’ संगीतमय नाट्यप्रयोगातून

भक्तीपरंपरेचा भावस्पर्शी आविष्कार

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 25 जुलै रोजी

मुंबई येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाचा जागर घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘का रुसली रखुमाई’ या विशेष संगीतमय नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, 25 जुलै, 2026 रोजी दुपारी 4 वाजता साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे होणार आहे.

 

वारकरी संप्रदायातील विठ्ठल-रखुमाई यांच्या भक्ती, प्रेम, समर्पण आणि अध्यात्मिक मूल्यांचा प्रभावी कलात्मक आविष्कार या संगीतमय नाट्यप्रयोगातून सादर करण्यात येणार आहे. विठ्ठल-रखुमाई यांच्या नात्यातील भावस्पर्शी प्रसंग, भक्तीचा गूढ अर्थ आणि वारकरी संप्रदायातील समता, प्रेम व श्रद्धेचा संदेश नाट्य, संगीत, अभिनय आणि प्रभावी दृश्यरचनेच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडला जाणार आहे.

 

या विशेष नाट्यप्रयोगाचे लेखन विनोद रत्ना यांचे असून दिग्दर्शन पियुष कुलकर्णी यांचे आहे. संगीत संयोजन साई–पियुष, नेपथ्य ऋतुजा बोथे, प्रकाशयोजना अभिप्राय कामठे यांची आहे. कैवल्य केजकर यांचे गायन, तन्मयी कांबळेकर यांचे निरुपण; तसेच चिन्मय पटवर्धन, शुभांगी जाधव आणि अदिती द्रविड यांच्या अभिनयातून हा नाट्यप्रयोग अधिक प्रभावीपणे साकारला जाणार आहे.

 

भक्ती, समता, प्रेम, श्रद्धा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. या विशेष संगीतमय नाट्यप्रयोगास प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi