Tuesday, 7 July 2026

मुंबई शहरात एका महिन्याच्या सरासरी इतका पाऊस

 मुंबई शहरात एका महिन्याच्या सरासरी इतका पाऊस अवघ्या चार दिवसांत नोंदवण्यात आला आहे. विशेषतः भरतीच्या काळात अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर आपत्तीजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे. काल मुंबई शहरात  ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहताना निदर्शनास आले.  यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. साधारणपणे संपूर्ण चार महिन्यांच्या मान्सूनमध्ये जितकी झाडे पडतात, त्यापैकी जवळपास ३०० झाडे एकाच दिवशी पडली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

            येत्या तीन दिवसांत, म्हणजे ८ जुलैच्या  रात्रीपर्यंत, हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. सर्व जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे.  दरम्यान, भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुंबईपुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम कराव, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

            अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून  नागरिकांनी वर्क फ्रॉम होमचा अवलंब करावा. खाजगी आस्थापनांनी  मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर फ्रॉम होम जे सवलत द्यावी असे न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. 

नाशिक व त्रंबकेश्वर परिसरातील पर्यटकांची विशेष खबरदारी घ्यावी

 नाशिक व त्रंबकेश्वर परिसरातील पर्यटकांची विशेष खबरदारी घ्यावी

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अरबी समुद्रावर बनत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात उद्या ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस बऱ्यापैकी त्र्यंबकेश्वर व आजूबाजूच्या परिसरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सुमारे ३०० मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे.  अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. कुठेही जीवित हानी होणार नाही, याबाबतही दक्ष रहावे.

            ही परिस्थिती लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी. बंद होऊ शकणारे रस्ते, दरडी कोसळण्याची ठिकाणी अशा सर्वंकष बाबींचा विचार करून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पर्यटकांनी जावू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

             सर्व यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहून अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. पुढील ४८ तास शून्य बळीहे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, असेही मुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केले.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी

 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून महामार्गावरील मलबा हटविण्यात यावा.  पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन संभाव्य दरड कोसळणाऱ्या ठिकाणी पथके सज्ज ठेवावीत. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर यावेळी अनपेक्षित ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून दरडीचा मलबा तात्काळ हटविण्यात यावा. कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीचे कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ 'अलर्ट मोड'वर ठेवा

 पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ 'अलर्ट मोड'वर ठेवा

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा

·         अत्यावश्यक असल्याशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये

            मुंबई, दि. ६ : मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच आज दुपारी ३ ते ४.३० वाजे दरम्यान समुद्राला भरती येण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये , असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

            राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीत  राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.  

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या सक्षमतेसाठी प्रलंबित चौकशी प्रकरणे तातडीने निकाली काढा

 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या सक्षमतेसाठी

प्रलंबित चौकशी प्रकरणे तातडीने निकाली काढा केंद्रीय उपसचिव सुदीप दत्ता

 

मुंबई, दि. ६ : २०२२ मध्ये शिष्यवृत्ती योजनांतील निधीच्या गैरवापराच्या प्रकरणांनंतर ८३० शैक्षणिक संस्थांची प्रकरणे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) आणि ६० हजारांहून अधिक प्रकरणे विविध राज्यांकडे चौकशीसाठी सोपविण्यात आली आहेत. ही प्रकरणे निकाली निघाल्याशिवाय योजना पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करणे शक्य होणार नाही. त्यामुळे राज्यांनी चौकशी प्रक्रियेला गती देऊन प्रलंबित प्रकरणांचा तातडीने करण्याचे निर्देश केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे उपसचिव (शष्यवृत्ती)सुदीप दत्ता यांनी दिले.

केंद्र शासनाच्या पूर्व-माध्यमिक (Pre-Matric), उत्तर-माध्यमिक (Post-Matric) आणि गुणवत्ता व साधनआधारित (Merit-cum-Means) शिष्यवृत्ती योजनांबाबत प्रलंबित चौकशी प्रकरणांचा आढावा घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सचिवालय जिमखाना, मुंबई येथे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि दादरा व नगर हवेली व दीव दम या पाच राज्यांची प्रादेशिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेत महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांतील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे चवरे यावेळी उपस्थित होत्या.

उपसचिव सुदीप दत्ता म्हणाले राज्यांकडून झालेल्या प्रगतीचा आढावा घेऊन चौकशीदरम्यान येणाऱ्या अडचणी, तपास यंत्रणांसमोरील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली असून प्रकरणे निकाली काढण्यासाठी आवश्यक समन्वय साधून त्यानंतर वित्त मंत्रालय, खर्च विभाग, मंत्रिमंडळ सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी राज्यांना ३१ जुलैपर्यंत गैरवापर झालेल्या निधीच्या वसुलीसाठी प्रभावी प्रयत्न करण्याचे, आवश्यकतेनुसार बँकांची मदत घेण्याचे, वसुली न झाल्यास एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया राबविण्याचे, तसेच १ ते १५ ऑगस्टदरम्यान क्लोजर रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले. या मुदतीत प्रकरणांचा निपटारा झाल्यास शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. १५ ऑगस्टपर्यंत आवश्यक उद्दिष्टे पूर्ण करून शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र व राज्यांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सचिव डॉ. माधवी खोडे चवरे म्हणाल्या, अल्पसंख्याक समाजाचा विकास हा सकारात्मक दृष्टिकोनातून आणि परिणामकारक अंमलबजावणीतून साध्य होणार आहे. कोणत्याही अडचणींवर मात करून अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विविध राज्यांचे अनुभव आणि सूचना लक्षात घेऊन शिष्यवृत्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्याने सुरुवात करण्याची ही संधी असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी महाराष्ट्राची निवड झाल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले.

            कार्यशाळेत चौकशी प्रकरणांच्या अंतिम निपटाऱ्यासाठी विभागांमधील प्रभावी समन्वयाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. विशेषतः महाराष्ट्रात अल्पसंख्याक विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच गृह विभाग यांच्या समन्वयातून प्रकरणांवर अंतिम कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

            कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी श्री दत्ता यांनी अल्पसंख्याक कार्य मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जवाटप प्रक्रियेत पतसंस्थांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करा · सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे निर्देश

 अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जवाटप प्रक्रियेत पतसंस्थांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करा

·         सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे निर्देश

मुंबई, दि. 6 : ग्रामीण भागासोबत पतसंस्थांची नाळ जुळलेली आहे. कर्जवाटप प्रक्रियेत पतसंस्थांचा समावेश झाल्यास अधिकाधिक युवकांना उद्योजकतेसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी आवश्यक अर्थसहाय्य मिळण्यास मदत होईल. त्यासाठी याबाबत सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बँकांसोबतच सक्षम पतसंस्थांचाही समावेश करण्यासंदर्भात सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, दक्षिण कराडचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले, सध्या महामंडळामार्फत उद्योगासाठीचे अर्थसहाय्य बँकांद्वारे केले जाते. तसेच कर्जधारकांनी जमा केलेल्या व्याजाचा परतावाही संबंधित बँकांमार्फत दिला जातो. हेच काम सक्षम पतसंस्थांमार्फतही प्रभावीपणे करता येऊ शकते. पतसंस्थांची नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली असते. त्यामुळे कर्जवाटपाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि लाभार्थ्यांसाठी सोयीची होईल. यासाठी पतसंस्थांची निवड करताना विशिष्ट निकष निश्चित करण्याचे निर्देश मंत्री श्री भोयर यांनी यावेळी दिले.

महामंडळांच्या कर्ज योजनांसाठी पतसंस्थांचे आर्थिक निकष निश्चित करून विस्तृत प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री भोयर यांनी यावेळी दिले.

या सुधारणांमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध सहकारी पतसंस्थांना प्राधान्य मिळेल. राज्यातील सक्षम आणि विश्वासार्ह पतसंस्थांकडे कर्जवाटपाची जबाबदारी सोपविल्यास कर्जधारक तरुणांना अधिक चांगली सेवा मिळेल आणि उद्योग उभारणीसह रोजगार निर्मितीसाठीदेखील आवश्यक अर्थसहाय्य अधिक सहज उपलब्ध होईल, असे सहकार मंत्री श्री भोयर यांनी सांगितले.

रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 

·         रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क

·         नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ६ : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. भालचंद्र चव्हाण यांच्याकडून रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी आज व उद्या मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ४८ तास दोन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रशासनाला आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच सुधागड व रोहा परिसरात आपत्कालीन परिस्थितीत अधिक वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देता यावा, यासाठी १४५ जवानांची अतिरिक्त तुकडी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पूर आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कर्जत, खोपोली येथील विविध सेवाभावी संस्थांशी आपण नियमित संपर्कात असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. या संस्थांना शासनाकडून आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जातील. तसेच जिल्ह्याच्या इतर भागांमध्येही त्यांच्या सेवांची आवश्यकता भासल्यास त्यांचे सहकार्य घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पूरस्थितीवर प्रशासनासोबत स्वतः राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून सातत्याने लक्ष ठेवत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील सर्व नागरिकांनी अत्यंत आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा तसेच स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

000

Featured post

Lakshvedhi