महाराष्ट्रात राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत
क्वांटम तंत्रज्ञान व कौशल्यविकास उपक्रमास मंजुरी
-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
· क्वांटम क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई, दि.१४ : केंद्र सरकारने २०२३ मध्ये ६ हजार कोटींच्या तरतुदीसह राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संप्रेषण, क्वांटम सेन्सिंग आणि क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत भारताला जागतिक स्तरावर अग्रणी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या राष्ट्रीय उपक्रमाशी सुसंगत राहून महाराष्ट्र शासनाने राज्यात क्वांटम तंत्रज्ञान व कौशल्यविकास उपक्रम राबविण्यास मान्यता दिली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सदर उपक्रमांतर्गत आय-हब क्वांटम टेक्नॉल फाऊंडेशन, आयआयएसईआर पुणे ही संस्था हब म्हणून कार्य करणार असून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई, तसेच विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर या संस्था स्पोक संस्था म्हणून सहभागी राहणार आहेत.