महापारेषणच्या नागपुरातील पाचगाव उपकेंद्राचे
काम वेळेच्या आधीच पूर्ण
- मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) नागपूर परिमंडळांतर्गत २२० के. व्ही. पाचगाव उपकेंद्र आणि संलग्नित २२० के. व्ही. कन्हान-उमरेड लिलो विद्युत वाहिनी (२२ सर्किट कि. मी.) निर्धारित कार्यपूर्ती वेळेच्या तब्बल आठ महिने अगोदरच पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल महापारेषणचे कौतुक केले आहे.
ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात पाचगाव येथील २२०/३३ के. व्ही. उपकेंद्र आणि संलग्नित २२० के. व्ही. कन्हान-उमरेड लिलो वाहिनी निर्धारित कार्यपूर्ती वेळेच्या तब्बल आठ महिन्याआधी पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली.
२२०/३३ के.व्ही. पाचगाव उपकेंद्र कार्यान्वित झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका आणि लगतच्या नागपूर ग्रामीण भागातील घरगुती तसेच औद्योगिक विद्युत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे या उपकेंद्रामुळे विद्युत ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी महापारेषणच्या प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. विद्युत प्रकल्प उभारणीत परवानाधारक पारेषण कंपनींना अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वीजप्रकल्प उभारणीची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण होत नाहीत. वीजवाहिनीच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये न्यायालयीन प्रकरणे, वनविभागाची परवानगी, रेल्वे क्रॉसिंगची परवानगी, महामार्ग विभागाची परवानगी, आदी अडचणींमुळे प्रकल्पांच्या कामाच्या गतीवर परिणाम होतो.