Thursday, 20 February 2025

भगवंताचे नाम मनापासून घ्यावे.,

 🌹🌹🌹🌹🌹 *चिंतन* 🌹🌹🌹🌹🌹


*भगवंताचे नाम मनापासून घ्यावे. अखंड चालणा-या नियमाने जो नाम घेतो त्यास संकटे त्रास देत नाहीत. भगवंतासाठी नाम घेणे म्हणजे मनापासून नाम घेणे. येथे एक अडचण येते ती अशी की, व्यवहारामधे आपण एखादे कर्म केले, की त्याचे फळ काय मिळते इकडे आपले लक्ष असते. किंबहुना ते फळ मिळावे म्हणूनच आपण ते कर्म करतो. भगवंताचे नाम घेताना ही सवय आड येते. पण अध्यात्मामध्ये ही सवय मोडावी. नाम घेतच रहावे असे वाटणे, हेच नाम घेण्याचे फळ समजावे. नाम घेण्याची वासना शिल्लक उतरून इतर वासना विराम पावतात म्हणजे पूर्णकाम. पूर्णकाम होऊन जो नित्यनेमाने नाम घेतो त्यावर संकटे आली तरी त्याचे नाम खंडित होत नाही. नामाला नित्याचे मोजमाप असावे. पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात, पूजनात, संभाषणात व प्रार्थनेत गुंतून ठेवावे. अंतकाळी ही सवय अतिशय उपयोगी पडते. अंतकाळी जीव भगवंताला बरोबर घेऊनच जातो.*

🌹🌹🌹🌹🌹🔥🌹🌹🌹🌹🌹

नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये.(१)*

 🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥

     *🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*


------------------------------------------------------

*🔸संकलन - सदानंद पाटील, रत्नागिरी.*

-----------------------------------------------------


*🏵नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये.(१)*


           *नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये हा भारतीय संस्कृतीचा सारभूत गाभा आहे... एक वेळ आन्हिक व पूजापाठात हेळसांड होऊ शकेल, पण नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होतात असे दिसून येते. नैमित्तिक पूजेच्या बाबतीत पुरुषवर्गाचा तर व्रतवैकल्यात महिलावर्गाचा महत्वाचा भरीव सहयोग असतो.....*


             *नैमित्तिक पूजेमध्ये 'सत्य' नावाने सुरू होणाऱ्या सत्यदत्त, सत्यदेवी, सत्यनारायण इत्यादी विविध पूजा, तसेच गणेशचतुर्थी, अनंतचतुर्दशी, नवरात्र महोत्सव इत्यादी नैमित्तिक पूजा काही बाबतीत वैयक्तिक तर काही बाबतीत सामाजिक स्तरावर संपन्न होतात... त्यापैकी काही पूजा वंशपरंपरा चालत असल्यामुळे त्यांना कुळधर्म अशी संज्ञा असते. सत्यनारायण, सत्यदत्त, अनंतचतुर्दशी, वरदशंकर, वरदलक्ष्मी, शनिप्रदोष इत्यादी कामनिक स्वरूपाच्या नैमित्तिक पूजांचा कालावधी पूर्ण होताच त्यांचे विधीपूर्वक उद्यापन केले जाते. वरदलक्ष्मी व अनंतचतुर्दशी या नैमित्तिक पूजा कामनिक स्वरूपाच्या असल्या, तरी एखाद्या पिढीला लाभल्यावर मग पिढ्यान् पिढ्या चालत राहिल्यामुळे त्याचे कुळधर्मात रूपांतर झालेले दिसून येते.....*


              *बहुतेक सर्व नैमित्तिक पूजांसाठी पुरोहितांना पाचारण करण्यात येते... किंबहुना पुरोहितावाचून अशा पूजा संपन्न होऊच शकत नाहीत, असा एक अज्ञानमूलक दृढ गैरसमज जनमानसात खोलवर रुजलेला असल्यामुळे काही वेळा अशा पूजा टाळण्याकडे किंवा केल्याच तर कुणीतरी जबरदस्तीने लादल्याप्रमाणे तणावपूर्ण वातावरणात संपन्न होतात. काहीवेळा तर पूजा टाळल्या किंवा कमतरता झाली तर उगीच देवाचा कोप (?) नको या भीतीपोटी नैमित्तिक पूजा कशाबशा उरकण्याकडे प्रवृत्ती दिसून येते.....*


           *त्यामुळे अशा पूजामागे असलेली शास्त्रीय व आध्यात्मिक बैठक, त्यामागची संस्कृती, मानवी जीवन व समाज यांना पोषक ठरणारे विज्ञान आणि पूजेमागील धार्मिक विधीविधान, या सर्वांचा विसर पडत चाललेला दिसून येतो.....*


              *याहूनही खेदजनक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कुळधर्म म्हणून संपन्न होणाऱ्या पूजेसाठी मिळणारे लाभ तर हवेतच, त्याचबरोबर त्या पूजा टाळण्यामुळे होणारा देवाचा कोप (?) नको आणि पूजा स्वतः करायला नकोत... असा त्रिकोण साधण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे आपल्यातील ज्येष्ठ भावाकडे त्या सोपवून रिकामे होणे व कुळधर्माच्या दिवशी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी हमखास उपस्थित राहणे. आपल्या नाकर्तेपणाविषयी फारच टीका होऊ लागली, तर पूजेच्या खर्चाची अंशतः, भागश: किंवा पूर्णश: जबाबदारी उचलणे.....*


               *हल्ली बहुसंख्य लोक हाच पर्याय स्विकारून पळवाट काढतात... हल्ली कित्येक घरे अशी आढळून येतात की,  कुळधर्माचा पुसटसा लवलेशही तेथे आढळत नाही. कुणी विचारले, तर उत्तर एकच असते की, "ते सर्व आमच्या वडील भावाकडे (किंवा काकांकडे, किंवा चुलत चुलत आजोबांकडे वगैरे वगैरे). जे वाडवडिलांनी केले नाही, ते पुढील पिढीकडून होण्याची अपेक्षाच नसते..... (अपूर्ण)*


*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*

🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥

धूप हा बहुवर्षायू वृक्ष डिप्टेरोकोर्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वॅटेरिया इंडिका आहे

 ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

                      *🔸धूप.🔸*


*---------------------------------------------*

*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*

*---------------------------------------------*


*धूप हा बहुवर्षायू वृक्ष डिप्टेरोकोर्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वॅटेरिया इंडिका आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील असून महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू व कर्नाटक राज्यांतील सदाहरित वनांत आढळतो.*


*महाराष्ट्रात हा वृक्ष तिल्लारीच्या वनांत आढळतो. लाकडासाठी धूप वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो दिवसेंदिवस दुर्र्मीळ होत चालला आहे.*


*आययूसीएन (The International Union for Conservation of Nature) या आंतरराष्ट्रीय संस्थेने नष्टप्राय होणाऱ्या वनस्पतींच्या यादीत धूप वृक्षाचा समावेश केला आहे. हा सदापर्णी वृक्ष आकाराने मोठा असून ४०-६० मी. उंच वाढतो. खोड गोलसर असून साल काळसर मऊ असते. कोवळ्या फांद्या व देठांवर लव असते. पाने साधी, एकाआड एक व लंबगोल असून टोकाला रुंद असतात.*


*या वृक्षाची फुले लहान व पांढरी असून पानांच्या बेचक्यातून आलेल्या पुष्पसंभारात येतात. फळ (बोंड) फिकट तपकिरी, तीन कप्प्यांचे व लांबट असून त्यात एक बी असते. धूप वृक्षाच्या खोडातून व जून फांद्यांतून पिवळ्या रंगाची डिंकासारखी राळ बाहेर पडते, यालाच सामान्यपणे धूप म्हणतात. याचा वापर रंग व रोगण (व्हार्निश) यांकरिता करतात.*


*हा धूप औषधी असून जुनाट खोकला, सांधेदुखी, जुलाब इत्यादींवर देतात. यात नैसर्गिक सुगंधी द्रव्य असल्यामुळे धार्मिक विधींत धूप जाळतात. डासांचा उपद्रव टाळण्यासाठीही काही जण धूप जाळतात. या वृक्षाच्या लाकडापासून प्लायवुड तयार करतात. धूपाच्या झाडालाच राळधूपाचा वृक्ष म्हणतात.*


*अन्य धूप .*

*तंत्रशास्त्रासार ऊद, तगर, कुष्ठ, शैलज, शर्करा, नागरमोथा, चंदन, वेलदोडा, तमालपत्र, नखनखी, मुशीर, जटामांसी, कापूर, ताली, सदलन आणि गुग्गुळ हे सोळा प्रकारचे धूप मानले गेले आहेत. यांना षोडशांग धूप म्हणतात. मदरत्न च्या मते चंदन, कुष्ठ, नखल, राल, गूळ, शर्करा, नखगंध, जटामांसी यांच्या समभाग मिश्रणातून उत्तम धूप बनतो.*


*यांशिवाय, सहा भाग कुष्ठ, दोन भाग गूळ, तीन भाग लाख, एक पंचमांश भाग नखला, हरडा आणि राळ समभाग, एक भाग, दपै एक भाग, शिलाजित तीन कण, जिनतान, नागरमोथा चार भाग, गुग्गुळ एक भाग यांच्या मिश्रणाने अति उत्तम धूप तयार होतो. रुहिकाख्य, कण, दारुसिहृक, ऊद, सित, शंख, जातिफल, श्रीश हे धूप श्रेष्ठ समजले जातात.....*

*स्रोत: विकिपीडिया...*

❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

*विमान किती उंचावरून उडू शकतं ?* अपवाद मन, भरारी घेता येते

 🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

       *विमान किती उंचावरून उडू शकतं ?*


*विमान हवेतून उडत जातं, त्यामुळे हवेचे हे गुणधर्मच ते जास्तीत जास्ती किती उंचीवरून उडू शकतं, हे निश्चित करत असतात. समुद्रसपाटीवर हवा जितकी दाट असते तितकी ती अधिक उंचीवर असत नाही. जसजसे आपण अधिक उंचीवर जाऊ तसतशी हवा विरळ होत जाते. तिचा दाब कमी होत जातो.*


*ज्या उंचीवर विमान साधारणपणे उडतं, तिथली हवा तर चांगलीच विरळ असते, आणि त्यामुळे तिचा दाब फारच कमी असतो. तो दाब त्या विमानातल्या प्रवाशांना सहन होणं शक्य नसतं. त्यामुळे सर्व नागरी विमानांमध्ये दाब नियंत्रित केलेला असतो. यालाच प्रेशराईज्ड इंटिरियर असं म्हणतात.*


*त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुसह्य होत असला, तरी त्या विमानाच्या सांगाड्याला आतल्या आणि बाहेरच्या दाबातल्या फरकाला तोंड द्यावं लागतं, आतल्या हवेचा दाब जास्त असल्यामुळे बाहेरच्या दिशेनं काम करत असलेल्या बलाचा ताण त्या पत्र्याला सहन करावा लागतो. ज्या ऍल्युमिनियमच्या मिश्रघातूपासून विमानाचा सांगाडा तयार केला जातो, त्याच्या या ताण सहन करण्याच्या क्षमतेला मर्यादा असतात, त्यामुळे आतल्या आणि बाहेरच्या हवेच्या दाबातला फरक एका विशिष्ट मयदिपलीकडे जाऊन चालत नाही.*


*थोडक्यात, त्यापायी विमानाच्या उडण्याची कमाल उंची निर्धारित केली जाते. तरीही जितकी उंची अधिक, तितकी हवा विरळ असल्यामुळे तिचा विरोधही कमी होतो. त्यापायी वेग वाढवता येतो.*


*या दोन परस्परविरोधी घटकांचा विचार करून विमानाच्या आतला हवेचा दाब समुद्रसपाटी इतका न ठेवता साधारण पाच-सहा हजार फूट उंचीवर असणाऱ्या हवेच्या दाबाइतका ठेवला जातो. त्यामुळे विमानाला अधिक उंची गाठणं शक्य होतं. तरीही उंचीवर जसजशी हवा विरळ होते, तसतसं त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होत जातं. विमानाच्या इंजिनातल्या जेट इंधनाच्या ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे अधिक उंचीवर गेल्यास त्या इंजिनाच्या कार्यक्षमतेतही घट होते. कमाल उंची निर्धारित करणारा हा दुसरा घटक आहे.*


*या दोन्हींचा विचार करता नागरी उड्डाणं साधारण २८००० ते ३५००० फूट म्हणजेच ९००० ते १२००० मीटर उंचीवरून उड़तात. कॉन्कॉड हे आता रद्द केलं गेलेलं स्वनातीत विमान त्याहूनही जास्त म्हणजे ५०००० फूट उंचीवरून उडत असे; पण ती कमाल उंची झाली.*


*उंचीची ही मर्यादा अर्थात नागरी विमानांना लागू आहे. लष्करी विमानं प्रेशराईज्ड नसतात. त्याऐवजी त्यातले वैमानिक दाबापासून संरक्षण करणारे विशिष्ट पोशाख घालतात, त्यामुळे ती विमानं अधिक उंचीवरून उडू शकतात. त्यांच्यावर फक्त ऑक्सिजनच्या उपलब्धतेची मर्यादा पडते. ती विमानं ९०००० फूट म्हणजेच ३०००० मीटरची उंची गाठू शकतात.....*


*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन...*

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

श्री गजानन महाराज, प्रकट दिन नमन

 

⚜🚩⚜🔆🕉️🔆⚜🚩⚜

      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻

 *श्री गजानन महाराज प्रकटदिनाची*

        *‼️अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव-निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय‼️*
     
⚜🌹⚜🚩🙏🚩⚜🌹⚜

    *गजाननपदीं निष्ठा ठेवा ।*
    *सुख-अनुभव सर्वदा घ्यावा ।*
    *कुतर्कासी मुळीं न द्यावा ।*
    *ठाव आपुल्या मानसीं ॥*
    *या गजाननरुप जमिनींत ।*
    *जें जें कांहीं पेराल सत्य ।*
    *तें तें मिळणार आहे परत !*
    *बहुत होऊन तुम्हांला ॥*
        *.... गजानन विजय*
      
        *हे विज्ञान युग आहे. पण या युगातही श्रद्धा आणि विश्वासाने केलेल्या भक्तीचे फळ प्राप्त होते. जीवन सुखी.. समाधानी आनंदी होते. याचेच प्रत्यंतर म्हणजे गावोगाव मोठ्या उत्साहाने संपन्न होणारा श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा.*
        *आज माघ वद्य सप्तमी. संत श्री गजानन महाराज प्रकट दिन. आजच्या दिवशीच महाराजांचे १८७८ मध्ये 'श्री' चे शेगाव येथे प्रथम दर्शन झाले.*
        *आजचा दिवस अत्यानंदाचा. भौतिक जगातील कलह दूर करुन मनामनात भक्ती भाव जागविणारा. भक्तीच्या उर्जेने जीवनात चैतन्य निर्माण करणारा. यामुळेच भक्तांचा आनंद म्हणजे काय याचे सर्वत्र दर्शन घडतेय. शेगाव नगरीच सजलीय असे नाही तर देशविदेशातही या प्रकटदिन सोहळ्याचा उत्साह आहे. घरोघरी दिवाळीप्रमाणेच सडासमार्जन झालेय. रंगीबेरंगी रांगोळी.. मंदिरात फुलांची सजावट.. आरास झालीय.*
        *"संत संग देई सदा" असे तुकोबा म्हणतात हे त्रिवार सत्य. श्रद्धेने जीवनात सौख्य लाभते. लाखोंच्या वाणीला.. जीवनाला संत गजानन महाराजांच्या कस्तुरी लीला कृपेचा सुगंध लाभलाय. केवळ अन्न.. वस्र.. निवारा किंवा सत्ता.. संपत्ती हेच सुख नाही. जीवन उद्दिष्ट नाही. तर भक्ती मार्गानेच षड्रिपू विजय प्राप्त होत जीवन सुखी होते हा भक्तीमार्ग श्री गजानन महाराजांनी शिकवला. यामुळेच कोट्यावधी भक्तांची जीवनात उत्तरोत्तर प्रगती होत आहे.. जीवन सुखी.. समाधानी.. आनंदी होत आहे.*
        *आज प्रकटदिनी हारफुलांनी सुशोभित 'श्रीं' च्या प्रतिमा.. मूर्ती समोर गजानन महाराज विजय ग्रंथ.. स्तोत्र.. बावन्नी इ. वाचन.. मनन.. श्रवण होत संकीर्तनात भक्तीचा आनंद भक्तगण लुटणार.*
        *संतांना ओळखणे अवघडच. पण बंकटलाल.. दामोदर या भक्तांनी त्यांचे खरे स्वरुप जाणले. शेगावकरांच्या प्रेमामुळे बुटींच्या घरच्या पक्वानांच्या पंगती सोडून महाराज शेगावला भक्तांच्या उद्धारासाठी परतले.* 
        *महाराजांची आवड गरीब भक्तांची. अगदी साधी. पिठलं-भाकर.. अंबाडीची भाजी.. कांदा हा महाराजांचा आवडता नैवेद्य. महाराजांनी जीवनात कित्येक भक्तांना संकटातून सोडविले. आधार दिला. सन्मार्गाला लावले. महाराज त्रिकाल ज्ञानी. संतांच्या वागण्याचा अर्थ उमगत नाही. श्री गजानन महाराजांचे वागणे असेच होते त्यांच्या कृतीत चमत्कार जाणवायचे.*        
        *गजानन महाराजांच्या भक्तीने मन निर्मळ होते. जगात कुणी शत्रूच उरत नाही. मनशांती लाभते.. आध्यात्मिक उन्नती होते. महाराज योगी.. भक्त मन जाणणारे अंतर्ज्ञानी. पशु.. पक्षी.. निसर्ग यावर सत्ता चालविणारे ब्रह्मांडनायक. महाराजांना वाचासिद्धीच प्राप्त असल्याने जे बोलायचे ते सत्य व्हायचे.*
        *गजानन महाराजांच्या  लीलांचे प्रत्यंतर वारंवार येतच आहे. संत दासगणुंवर त्यांची कृपा झाली. २१ अध्यायी रसाळ भाषेतील 'गजानन विजय' ग्रंथ तसेच स्तोत्र, आरती लिहली. विजय ग्रंथ पारायणाने जीवनातील दूर होणारी संकटे.. प्राप्त होणारे आत्मबल.. सुख याचे निरंतर प्रत्यंतर कोट्यावधी भक्तांना येत आहे. विज्ञान युगातही भक्तांमध्ये जागणारा हा श्रद्धाभाव ही पण लीलाच. शिवशंकर भाऊंसारखे शेगाव संस्थानाला लाभलेले.. लाभणारे निस्पृह भक्त ही पण लीलाच.*
        *भक्तांना अपेक्षित आनंद देणारे आदर्श मंदिर म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज मंदिर. या मंदिर संस्थानाचे समाजोपयोगी कार्य.. मंदिरात भक्तांना मिळणारी आपुलकीची वागणूक.. स्वच्छता.. पवित्र भक्तीमय वातावरण यामुळे जगभर प्राप्त झालेला लौकिक ही पण महाराजांची लीलाच.* 
        *श्री गजानन महाराजांनी समाजात भक्तीसोबतच सेवाभाव रुजविलाय. मंदिरात मोफत सेवा देण्यासाठी हजारो भक्त प्रतिक्षेत असतात ही पण लीलाच.*
        *आज प्रकटदिनी दासगणुंच्या भाषेत हेच मागणे..*
        *आपल्या कृपे करुन*
        *सानंद राहो सदा मन*
        *सर्वदा घडो हरिस्मरण*
        *तैसीच संगत सज्जनांची.*
        *श्रीं च्या चरणी साष्टांग दंडवत. संत गजानन महाराजांची आपणावरही सदैव कृपा राहो.*
        *.. गण गण गणात बोते*

⚜🌹🛕🌸🙏🌸🛕🌹⚜
  1️⃣
  *जय जय सतचित स्वरूपा*
  *स्वामी गणराया ।*
  *अवतरलासी भूवर*
  *जड मुढ ताराया ॥*
  *जयदेव जयदेव*

  *निर्गुण ब्रह्म सनातन*
  *अव्यय अविनाशी ।*
  *स्थिरचर व्यापून उरलें*
  *जे या जगताशी ॥*
  *तें तूं तत्त्व खरोखर*
  *निःसंशय अससी ।*
  *लीलामात्रें धरिलें*
  *मानव देहासी ॥*
  *जयदेव जयदेव*

  *होऊं न देशी त्याची*
  *जाणिव तूं कवणा ।*
  *करूनी गणि गण*
  *गणांत बोतेया भजना ॥*
  *धाता हरिहर (नरहरी)*
  *गुरुवर तूंचि सुखसदना ।*
  *जिकडें पहावे तिकडे*
  *तूं दिससी नयना ॥*
  *जयदेव जयदेव*

  *लीला अनंत केल्या*
  *बंकट सदनास ।*
  *पेटविलें त्या अग्नीवाचूनी*
  *चिलमेस ॥*
  *क्षणांत आणिलें*
  *जीवन निर्जल वापीस ।*
  *केला ब्रह्मगिरीच्या*
  *गर्वाचा नाश ॥*
  *जयदेव जयदेव*

  *व्याधी वारून केलें*
  *कैकां संपन्न ।*
  *करविले भक्तालागी*
  *विठ्ठल दर्शन ॥*
  *भवसिंधू हा तरण्या*
  *नौका तव चरण ।*
  *स्वामी दासगणूचे*
  *मान्य करा कवन ॥*
  *जयदेव जयदेव*

  *रचना : संत दासगणू*  ✍
  *स्वर : उषा मंगेशकर*

🌹☘🌸🥀🌺🥀🌸☘🌹 
  2️⃣
  *गण गण गणात बोते* 
  *हे भजन प्रिय सद्गुरु ते*
  *....*

  *रचना : संत दासगणू*  ✍
  *स्वर : अनुराधा पौडवाल*

  🎼🎶🎼🎶🎼   🎧

      *‼गण गण गणात बोते‼*

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
                *२०.०२.२०२५*

⚜🌹⚜🌻🙏🌻⚜🌹⚜

Wednesday, 19 February 2025

राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचे 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर*

 राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचे 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर*


*व्यंकटेश जोशी, वैभव वानखडे, सीमा सिंग, डॉ. विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांचा ‘महाराष्ट्र भूषण’मध्ये समावेश*

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या पाच व्यक्तींना राज्य शासन आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यात व्यंकटेश जोशी, वैभव वानखडे, सीमा सिंग, डॉ. विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांचा समावेश आहे.
समाजसेवा, शिक्षण, शेती, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यासाठी पुरस्कार निवड समितीने पुढाकार घेतला होता. या निवड समितीमध्ये हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रमोद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांचा समावेश होता. 
पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींची थोडक्यात ओळख खालीलप्रमाणे आहे. 
व्यंकटेश जोशी हे सेंद्रिय शेतीचे शिक्षण शेतकऱ्यांना देतात. ते गेल्या २० वर्षांपासून मुंबई आणि नाशिक परिसरातील शेकडो पाड्यांवर मोफत दूध वाटप करत आहेत. जोशी यांचे समाजसेवा आणि शेतीविषयक कार्य मोठे योगदान आहे. भारतभर त्यांनी शेतीसाठी अनेक प्रयोग केले. वैभव वानखडे मराठी शाळांसाठी पुढाकार घेतला आहे. वैभव यांच्या माध्यमातून राज्यात अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे. गेल्या १० वर्षांत मराठी शाळांचे जतन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य, आणि रोजगार निर्मिती यामध्ये मोठे योगदान दिले आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये महिला, युवक आणि लहान मुलांसाठी गेल्या १५ वर्षांपासून अहोरात्र कार्य करणारे नाव म्हणजे सीमा सिंग. सीमा सिंग यांचे सर्वाइकल कॅन्सरसाठी खूप मोठे योगदान आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण मिळावे, आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी त्यांनी अनेक उपक्रम भारतभर हाती घेतले आहेत. त्यांनी साडेचार हजारांहून अधिक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. डॉ. विजय दहिफळे हे मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडलेल्या लाखो महिला आणि पुरुषांसाठी आधारस्तंभ ठरलेले नाव आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते जगभर समुपदेशन आणि लैंगिक शिक्षणाच्या प्रचारासाठी कार्यरत आहेत. अडीच लाखांहून अधिक तुटलेल्या कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. १५ लाखांपेक्षा अधिक युवकांना लैंगिक अडचणींमधून मार्गदर्शन करून त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला आहे. शिवाजी बनकर हे माजी सैनिक असून, सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्याचे महान कार्य हाती घेतले. त्याच अनाथ मुलांसाठी अकादमी सुरू केली. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व बनकर यांनी स्वीकारले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी ही पाचही व्यक्तिमत्त्वे आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सरचिटणीस दिगंबर महाले, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक, उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ सर्व ‘महाराष्ट्र भूषण’चे अभिनंदन केले आहे. लवकरच मुंबईत एका शानदान कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 
.......

विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया

 विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे ब्राझीलच्या शिष्टमंडळास आवाहन

 

मुंबईदि. 19 - महाराष्ट्र आणि ब्राझीलच्या गोयास राज्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात देशात आघाडीवर असून महाराष्ट्राप्रमाणेच गोयास मध्ये देखील तंत्रज्ञान आणि नाविन्यतेवर भर दिला जातो. यामुळेच महाराष्ट्र आणि गोयासने सोबत येऊन विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूयाअसे आवाहन राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी गोयासच्या शिष्टमंडळास केले.

ब्राझीलच्या गोयास राज्याचे गव्हर्नर ई. रोनाल्डो रामोस काईडो यांच्या नेतृत्वाखालील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी विविध विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.

मंत्री श्री.रावल म्हणाले भारत आणि त्यातही महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. यामुळे जग भारताकडे आश्वासकतेने पाहत आहेत. महाराष्ट्रात विविध उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. राज्यातील अनेक शेतकरी ऑरगॅनिक शेतीकडे वळत आहेत. ब्राझील प्रमाणेच साखर उत्पादनामध्ये देखील महाराष्ट्र अग्रेसर असून राज्यात इथेनॉल तयार करण्यावर भर दिला जात आहे. येथील आंबाकेळीडाळिंब आदी फळे मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून येथे प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीसाठी देखील मोठा वाव आहे. महाराष्ट्र आणि गोयास राज्यामध्ये माहितीतंत्रज्ञानबाजारपेठ अशा विविध क्षेत्रात आदान प्रदान होऊन द्विपक्षीय परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. यासाठी सामंजस्य करार करून परस्पर सहकार्याची क्षेत्रे निश्चित करूअसे श्री. रावल यांनी सांगितले. 

गोयास चे गव्हर्नर श्री.काईडो यांनी गोयास आणि महाराष्ट्रादरम्यान असलेल्या विविध क्षेत्रातील साम्यावर भाष्य करून ऑरगॅनिक शेती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. साखर उद्योगइथेनॉल उत्पादन आदींसह विविध क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यास त्यांनी सकारात्मकता दर्शविली. 

Featured post

Lakshvedhi