🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥
*🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*
------------------------------------------------------
*🔸संकलन - सदानंद पाटील, रत्नागिरी.*
-----------------------------------------------------
*🏵नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये.(१)*
*नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये हा भारतीय संस्कृतीचा सारभूत गाभा आहे... एक वेळ आन्हिक व पूजापाठात हेळसांड होऊ शकेल, पण नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होतात असे दिसून येते. नैमित्तिक पूजेच्या बाबतीत पुरुषवर्गाचा तर व्रतवैकल्यात महिलावर्गाचा महत्वाचा भरीव सहयोग असतो.....*
*नैमित्तिक पूजेमध्ये 'सत्य' नावाने सुरू होणाऱ्या सत्यदत्त, सत्यदेवी, सत्यनारायण इत्यादी विविध पूजा, तसेच गणेशचतुर्थी, अनंतचतुर्दशी, नवरात्र महोत्सव इत्यादी नैमित्तिक पूजा काही बाबतीत वैयक्तिक तर काही बाबतीत सामाजिक स्तरावर संपन्न होतात... त्यापैकी काही पूजा वंशपरंपरा चालत असल्यामुळे त्यांना कुळधर्म अशी संज्ञा असते. सत्यनारायण, सत्यदत्त, अनंतचतुर्दशी, वरदशंकर, वरदलक्ष्मी, शनिप्रदोष इत्यादी कामनिक स्वरूपाच्या नैमित्तिक पूजांचा कालावधी पूर्ण होताच त्यांचे विधीपूर्वक उद्यापन केले जाते. वरदलक्ष्मी व अनंतचतुर्दशी या नैमित्तिक पूजा कामनिक स्वरूपाच्या असल्या, तरी एखाद्या पिढीला लाभल्यावर मग पिढ्यान् पिढ्या चालत राहिल्यामुळे त्याचे कुळधर्मात रूपांतर झालेले दिसून येते.....*
*बहुतेक सर्व नैमित्तिक पूजांसाठी पुरोहितांना पाचारण करण्यात येते... किंबहुना पुरोहितावाचून अशा पूजा संपन्न होऊच शकत नाहीत, असा एक अज्ञानमूलक दृढ गैरसमज जनमानसात खोलवर रुजलेला असल्यामुळे काही वेळा अशा पूजा टाळण्याकडे किंवा केल्याच तर कुणीतरी जबरदस्तीने लादल्याप्रमाणे तणावपूर्ण वातावरणात संपन्न होतात. काहीवेळा तर पूजा टाळल्या किंवा कमतरता झाली तर उगीच देवाचा कोप (?) नको या भीतीपोटी नैमित्तिक पूजा कशाबशा उरकण्याकडे प्रवृत्ती दिसून येते.....*
*त्यामुळे अशा पूजामागे असलेली शास्त्रीय व आध्यात्मिक बैठक, त्यामागची संस्कृती, मानवी जीवन व समाज यांना पोषक ठरणारे विज्ञान आणि पूजेमागील धार्मिक विधीविधान, या सर्वांचा विसर पडत चाललेला दिसून येतो.....*
*याहूनही खेदजनक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कुळधर्म म्हणून संपन्न होणाऱ्या पूजेसाठी मिळणारे लाभ तर हवेतच, त्याचबरोबर त्या पूजा टाळण्यामुळे होणारा देवाचा कोप (?) नको आणि पूजा स्वतः करायला नकोत... असा त्रिकोण साधण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे आपल्यातील ज्येष्ठ भावाकडे त्या सोपवून रिकामे होणे व कुळधर्माच्या दिवशी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी हमखास उपस्थित राहणे. आपल्या नाकर्तेपणाविषयी फारच टीका होऊ लागली, तर पूजेच्या खर्चाची अंशतः, भागश: किंवा पूर्णश: जबाबदारी उचलणे.....*
*हल्ली बहुसंख्य लोक हाच पर्याय स्विकारून पळवाट काढतात... हल्ली कित्येक घरे अशी आढळून येतात की, कुळधर्माचा पुसटसा लवलेशही तेथे आढळत नाही. कुणी विचारले, तर उत्तर एकच असते की, "ते सर्व आमच्या वडील भावाकडे (किंवा काकांकडे, किंवा चुलत चुलत आजोबांकडे वगैरे वगैरे). जे वाडवडिलांनी केले नाही, ते पुढील पिढीकडून होण्याची अपेक्षाच नसते..... (अपूर्ण)*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥
No comments:
Post a Comment