Thursday, 7 March 2024

मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम एप्रिलपासून मुंबईत झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी

 मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम


एप्रिलपासून मुंबईत झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी


मुंबईकरांना आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्र्यांची आपला दवाखान्याला अचानक भेट


 


            मुंबई, दि. 7 : मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला.


            मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल पासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्री यांचे अचानक आगमन झाले. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्ता गृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्री यांनी संवाद साधत ‘आपला दवाखाना’ विषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.


            यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस,पेपरलेस मिळत आहेत.


            मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.


            यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त वेलारासू, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.


००००

Wednesday, 6 March 2024

पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग

 पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा

 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ

रेल्वेमेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

       मुंबई, दि. 6 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी - चिंचवड महानगरपालिका ते निगडीपुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपुणे मेट्रोला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

            प्रधानमंत्री यांनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील या मेट्रो प्रकल्पांची दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी झाले होते.

            प्रधानमंत्री लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.

            यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे या पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते आणि आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

            प्रधानमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

            हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.

            मागील पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे.

            आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे.

            वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे.

            सर्व प्रकल्प आणि विकासकामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

0000


१६ ते २२ मार्च कालावधीत ‘जलजागृती सप्ताह

 १६ ते २२ मार्च कालावधीत ‘जलजागृती सप्ताह’

 

            मुंबई दि. ५ :- आंतराष्ट्रीय स्तरावर २२ मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ ("Water for Peace") म्हणून साजरा केला जाणार आहे.  या निमित्ताने राज्यात १६ ते २२ मार्च२०२४ या कालावधीत "जलजागृती सप्ताह" साजरा करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाचे उपसचिव (लाक्षेवि) म. रा. वानखेडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २४ कोटीवर निधी वितरणास मान्यता

 अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी

२४ कोटीवर निधी वितरणास मान्यता

- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि. ५ :- अवकाळी पावसामुळे डिसेंबर,२०२३ व जानेवारी२०२४ या कालावधीत  झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २४ कोटी ६७ लाख ३७ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

            याबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या निर्णयामुळे  बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार आहे. डिसेंबर२०२३ व जानेवारी२०२४ या कालावधीत  झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी मदतीसाठी प्राप्त प्रस्तावानुसार राज्य शासनाने ही मदत वितरित करण्यास मान्यता दिली आहेअसे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

            श्री. पाटील यांनी सांगितलेअतिवृष्टीपूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहते. अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

 

            मुंबई दि. :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज सायंकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले.

            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्री. शाह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळेआशिष शेलारप्रवीण दरेकर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकरराजशिष्टाचार विभाग तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून सातारा एकात्मिक पर्यटन विकासाचा 381 कोटींचा शासन निर्णय जारी जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक, निसर्ग, जल पर्यटनास वेग येणार

 उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून

सातारा एकात्मिक पर्यटन विकासाचा 381 कोटींचा शासन निर्णय जारी

 

जिल्ह्यातील धार्मिकऐतिहासिकनिसर्गजल पर्यटनास वेग येणार

            मुंबईदि. 5 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागानेसातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिकऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळे विकासाचा 381 कोटी 56 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय आज (5 मार्च) जारी करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन या सुधारीत पर्यटन आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता मिळवली. त्यानंतर आजचा शासन निर्णय जारी झाला. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिकऐतिहासिकनिसर्गजल पर्यटनस्थळांचा विकास होणार असून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पर्यटनवाढीस वेग येणार आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसारसातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील धार्मिकऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळे विकासाच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत श्रीक्षेत्र महाबळेश्वरप्रतापगड किल्ला जतन व संवर्धनसहयाद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास तसेच कोयना हेळवाक वन झोन अंतर्गत कोयना नदी जलपर्यटनाची सुमारे 381 कोटी 56 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. आराखड्यानुसार विकासकामांच्या अंमलबजावणीचे अधिकार आणि जबाबदारी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ही कामे 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

            सातारा जिल्ह्यातील निसर्गाचे संवर्धन व्हावेऐतिहासिकधार्मिकजल पर्यटनस्थळांचानिसर्गपुरक विकास व्हावाजिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढावी या हेतूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने मुंबईत आणि पुण्यात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले होते तसेच सुधारीत पर्यटन विकास आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 फेब्रुवारी मुंबईत आणि तदनंतर पुण्यात यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर वेगाने कार्यवाही होऊन 22 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत सुधारित पर्यटन आराखड्यास मान्यता घेण्यात आली. शिखर समितीच्या मान्यतेनंतर त्यासंदर्भातील शासन निर्णय नियोजन विभागाकडून आज जारी करण्यात आला.

            सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यानुसार श्रीक्षेत्र महाबळेश्वरप्रतापगड किल्ला जतन व संवर्धनसह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास व कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटन विकासाची कामे करण्यात येणार आहेत. मुनावळे येथे वॉटर स्पोर्टस् सुरू करण्यात येणार असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस् असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार असून त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या अध्यक्षतेखाली ८ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीतपर्यटन विकास आराखड्यामध्ये महाबळेश्वरप्रतापगडसह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यानुसार कामे करताना मूळ वास्तू आणि परिसराच्या सुशोभीकरणाची कामे नैसर्गिक रंग वापरूनबांधकामाचे साहित्य देखील पर्यावरण पूरक वापरण्याचे निर्देश दिले होते.

            प्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन याबाबी लक्षात घेऊन गडावर जाणारे व येण्याचे मार्गबुरुज व तटबंदी  बांधकामकिल्ल्यावर झालेल्या पडझडीच्या दुरुस्तीची कामेपर्यटकांसाठी सोयीसुविधा यासर्व कामांचा पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करण्याची सूचना त्यांनी केली होती. किल्ल्याचे मूळ सौंदर्य कोणत्याही प्रकारे खराब दिसू नये याची खबरदारी घ्यावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन विकासाची कामे करताना या परिसरातील जैवविविधता राखली जावी. स्थानिक कृषी पर्यटनाला चालना मिळावीस्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा. पर्यटन विकासाची कामे करतांना जिल्ह्यातील तसेच पश्चिम घाट क्षेत्रातील ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थांकडून (भारतीय पुरातत्व विभाग तसेच राज्य पुरातत्वीय विभाग) सदर कामे करुन घेण्यात यावीत,  आदी सूचनाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी बैठकीत केल्या होत्या. त्यानुसार सुधारीत आराखडा तयार करण्यात आला होतात्यानुसार आजचा शासननिर्णय जारी झाला आहे. वाईचे आमदार मकरंद पाटीलजिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही जिल्हा पर्यटनविकासाचा आराखडा परिपूर्ण होण्यात आणि शासन निर्णय जारी होण्यात महत्वाची भूमिका बजावली.

००००

भवताल" फेब्रुवारी २०२४ अंक !

 भवताल" फेब्रुवारी २०२४ अंक !


नमस्कार.
"भवताल मासिका" चा फेब्रुवारी २०२४ चा अंक सोबत शेअर देत आहोत. त्यात पुढील विषयांचा समावेश आहे:

• वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे?
(वनस्पती प्रजातींच्या मूळ नावांचा आणि त्याच्याशी संबंधित आशयाचा वेध घेणारी मांडणी)
• अंजीर पट्ट्याला घरघर
(अंजीरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये होत असलेले बदल व त्याचा अंजिराच्या उत्पादनावर होणारा परिणाम या संदर्भात लेख)
• काचेच्या तावदांना धडकण्यापासून पक्ष्यांना वाचवा!
(एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणारा लेख)
• इको-अपडेट्स 
(अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा)

सोबत अंकाची PDF कॉपी, कव्हर, अंकाची नावनोंदणी करण्याची लिंक देत आहोत. कव्हर व लिंक आपल्या संपर्कात शेअर करून लोकांना अंकाची नावनोंदणी करण्यास सांगावे, हे आवाहन.

नावनोंदणीसाठी लिंक:

आपण २०२४ या वर्षाची वर्गणी भरली नसल्यास रु. ५९० इतकी वार्षिक वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला "भवताल" चा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.

वर्गणी भरण्यासाठी,
G-pay:  9822840436
UPI:   abhighorpade@okhdfcbank

- संपादक

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

Featured post

Lakshvedhi