Tuesday, 5 March 2024

लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित

 लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. ४  मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेक लाडकी " ही योजना सुरु करण्यांत आली आहे.

या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिली.

            एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयनवी मुंबई मार्फत ३६ जिल्हयांना १९.७० कोटी (रुपये १९ कोटी ७० लाख) वितरीत करण्यांत आले याबाबत  जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यांत येत आहे.

            आतापर्यत जवळपास ३५ हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील १५ दिवसांत तालुका निहाय / जिल्हा निहाय कॅम्प आयोजित करण्यांत येत असून पात्र लाभार्थीनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.

            या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीना लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपयेइयत्ता पहिलीत ६ हजार रुपयेसहावीत ७ हजार रुपयेअकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

            ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहीलतसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

0000

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ

 मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रमचार कोटी लोकांना मिळाला लाभ



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्ताईनगर पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी देणार

            जळगाव दि. 4 (जिमाका) :  महाराष्ट्र शासनाचा " शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजनाएस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत करतांना एन.डी.आर.एफ नियमात बदल केल्याचे सांगून आता मुक्ताईनगर आणि रावेरला जोडणारा इथली भाग्य रेषा बदलणारा हा तापी नदीवरला पूल देत आहोत. तसेच संत मुक्ताईच्या पावनभूमीच्या  पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) व रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील  पुलाच्या भूमीपूजनानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलआ. किशोरआप्पा पाटीलआ. संजय सावकारेआ. चिमणराव पाटीलआ.चंद्रकांत पाटीलमाजी आ. चंद्रकांत सोनवणेमाजी आ. दशरथ भांडेजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित उपस्थित होते.

             मुक्ताईनगरच्या या पुलामुळे 30 ते 35 किलोमीटरचा वळसा वाचणार असून आता मुक्ताईनगर आणि रावेर जोडले जाणार आहे. हा पुल नाबार्ड कडून केला जाणार असल्याचे सांगून या पुलासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

              यावेळी मुख्यमंत्री म्हणालेराज्यात सगळीकडे विकासाची कामं सुरु आहेत. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राबविला जातो आहे. एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळतायतकोणाला ट्रॅक्टर मिळतय,कोणाला घर मिळतंयकोणाला शेती अवजारे मिळतायत अशा अनेक योजनाचा थेट लाभ दिला जात आहे. उद्योगाच्या बाबतीतही शासनाने आघाडी घेतली असून पाच हजार कोटीचे नवे उद्योग राज्यात येत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.

            संत मुक्ताबाई यांच्या पावन भूमीच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तालुक्यातील इतर विकासकामाचे जवळपास 75 कोटी  रुपयांच्या कामाचे आज मुख्यमंत्री यांनी उदघाटन केल्याचे जाहीर केले.

            मंत्री अनिल पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणालेमुक्ताईनगर ते रावेरचे प्रवेशद्वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वाद आणि मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाचे यश असून आता मुक्ताईनगर बदलायला लागलं आहे.

            यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री यांची कृतज्ञता व्यक्त केली. तापी नदीवरील हा पुल इथल्या जनतेसाठी किती महत्वाचा होता हे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घेतले संत मुक्ताबाईंच्या समाधीचे दर्शन

              संत निवृत्तीनाथसंत ज्ञानेश्वरसंत सोपानदेव यांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांची समाधी ज्या मुक्ताईनगरमध्ये आहे त्या नगरीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. सगळे कार्यक्रम आटोपल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी संत मुक्ताबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. साडीचोळी वाहिली आणि आरतीही केली.

००००

जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन जळगाव जिल्हा वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही

 जिल्हास्तरीय वारकरी भवनाचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव जिल्हा वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            जळगाव दि. 4 (जिमाका ) : जळगाव सारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनला निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            आज त्यांच्या हस्ते या 'वारकरी भवनचे भूमिपूजन खेडी ( जळगाव )येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजनपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलखा. उन्मेष पाटीलखा  रक्षा खडसेआ. राजुमामा भोळेआ किशोरआप्पा पाटीलआ.चिमणराव पाटीलआ.चंद्रकांत पाटीलजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकितह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,आज आपल्याला इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि  मनाला खुप आनंद झाला. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या  'वारकरी भवनचे भूमीपूजन होत  आहे. या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे आभार आणि ज्यांचे लागणार आहेत सर्वांना या निमित्ताने मी मनापासून  शुभेच्छा देतो.  

             पालकमंत्री गुलाबराव  पाटील यांनी विकासकामांसोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत परंतू  या सर्वात महत्वाचे असे 'वारकरी भवनबांधण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला असल्याचे सांगून या 'वारकरी भवनप्रमाणे  प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

            ते पुढे म्हणाले कीआपल्या राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातूनत्यातील कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मरण करुन मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाच काम तसेच जनजागृतीच काम करीत आहे.   पंढरपुरचा विकास होत असतांना  राज्यातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेतत्या सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे शासनाने ठरविले आहे. विशेष म्हणजे राज्यातील 'वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी  राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये अडीच हजार कोटींची  तरतुद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असे आहे वारकरी भवन

            प्रस्तावित जिल्हातील वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून त्याला सहा कोटी सहा लाख एवढा निधी अपेक्षित आहे. इथले वारकरी भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. या वारकरी भवनास जिल्हा वा‍र्षिंक योजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 6 कोटी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण बांधकाम- १८१०.३८ चौ.मी. (तळ मजला) (टप्पा-1) वारकरी भवन            पहिल्या टप्प्यात  सभामंडप व भक्त निवास इमारत (मुख्य इमारत ) प्रस्तावित आहे.


कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्श न

 कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या

जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्श

            मुंबई. दि. ४ : राजर्षी शाहू महाराज हे लोकशाहीवादी व समाज सुधारक राजे होते. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. यानिमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ निर्मिती करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य तरुण पिढीला माहित व्हावे हा या मागील मुख्य उद्देश असून यानिमित्ताने दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी चित्ररथाचे प्रदर्शन ०५ मार्च, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे.


            हा चित्ररथ कोल्हापूरमधील महत्वाच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या प्रदर्शनाचे उद्धाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करणार असून या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


            मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे तसेच मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन चित्ररथ निर्मिती कामी लाभले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.


000

मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ ची ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात

 मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ ची

ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात

            मुंबईदि. ४ : वाचनाने माणूस अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध होतो. प्रत्येकाने नॅशनल लायब्ररी येथे दोन दिवसीय सुरू असलेल्या या ग्रंथ महोत्सवाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केले.

             दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी कळवले आहे. नॅशनल लायब्ररी वांद्रे पश्चिम येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयमुंबई उपनगरतर्फे आयोजित ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ चे उद्घाटन मुंबई उपनगरचे आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेमुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद महाडिककोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवेराज्य ग्रंथालयाचे प्रशांत पाटील, अॅड. दीपक पडवळकरमुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड उपस्थित होते.

            आमदार अॅड. आशिष शेलार म्हणालेकाळाच्या ओघात वाचनाच्या पद्धती बदललेल्या आहेत. मात्र नव्या पिढीला दोन दिवस येथे सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या साहित्य संस्कृतीची माहिती मिळेल. ग्रंथ महोत्सवात विविध प्रकाशकांची पुस्तके देखील आहेत. शासनाच्या या  उपक्रमाचा येथील सर्व ग्रंथ प्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

            कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीने महोत्सवाची सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. बनसोड यांनी प्रास्ताविक केले. तर कोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती साळवे यांनी आभार मानले.

ग्रंथ महोत्सव २०२३ मध्ये उद्या विविध परिसंवाद

            दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.५ मार्च रोजी पहिल्या सत्रात 'प्रकाशन व्यवसायातील आव्हानेया परिसंवादात डिम्पल प्रकाशनाचे अशोक मुळेमॅजेस्टिक पब्लिशिंगचे अशोक कोठावळेजयहिंद प्रकाशनचे हेमंत रायकरज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सहभाग असेल.

            वाचन संस्कृतीसामाजिक बांधिलकी या विषयी चेतना महाविद्यालया तर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. अवयव दान काळाची गरज हे पुरुषोत्तम पवार सादर करणार आहेत.

             याशिवाय राकेश तळगावकर यांची संकल्पना असलेले  मराठी साहित्यातील उत्तम व अभिजात पत्र साहित्यावर आधारित कार्यक्रमात श्रीनिवास नार्वेकरअस्मिता पांडे राजश्री पोतदारआशुतोष घोरपडेसमीर दळवी आणि विनीत मराठे यांचा सहभाग असणार आहे.

            समारोपात वाचनाची आनंदयात्रा या कार्यक्रमाने होईल. यात ज्योती कपिलेविनम्र भाबलतसेच महिला वाहतूक पोलीस कर्मचारी मेधा तामोरे आणि सुप्रिया रणधीर हे आपले मनोगत व्यक्त करतील. सोबत ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे स्टॉल असणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ग्रंथप्रेमी आणि वाचक प्रेमींसाठी विनामुल्य असणार आहेत.

००००

‘ताडोबा भवन’ ठरणार पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र

  ‘ताडोबा भवन’ ठरणार पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. 4 : ‘ताडोबाअंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतीलअसा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवेअसा विचार मनात आला. त्यामुळेच 4482 चौ. मीटरमध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचे चालते-बोलते ज्ञानकेंद्र ठरणार आहे’असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

            चंद्रपूर येथे ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचे भुमिपूजन कार्यक्रमात वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)  शोमिता विश्वासमहिम गुप्ताताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकरउपवनरंक्षक कुशाग्र पाठकजितेश मल्होत्रासार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणेकार्यकारी अभियंता मुकेश टांगलेविभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीदेशाचे रक्षण करणा-या जवानांना आपण सॅल्यूट करतोतसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्यरत असणा-या वन अधिकारी व कर्मचा-यांना आज सॅल्यूट करण्याची गरज आहे. देशाची सेवा सर्वतोपरी आहेतशीच वसुंधरेचे रक्षण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्टच असला पाहिजे. जगायचा आनंद पैशाने विकत घेता येत नाहीतो पर्यावरणातूनच मिळू शकतो. त्यामुळे ताडोबा भवन हे पर्यावरणाचा आनंद देणारे केंद्र राहीलअसे त्यांनी नमूद केले.

            मंत्री म्हणालेताडोबा भवन हे इको – फ्रेंडली असावेया इमारतीमध्ये विजेचे बील येता कामा नयेत्यासाठी संपूर्ण इमारत सोलर पॅनलवर करावी. या इमारतीच्या बांधकामासाठी 18 कोटी 8 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहेमात्र इतर अत्याधुनिक सोयीसुविधा करण्यासाठी अतिरिक्त 14 कोटी रुपये त्वरीत देण्यात येतील. वनविभागाच्या प्रस्तावांना गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.

वन विभागात पायाभूत सुविधा उत्तम

            वन विभागाच्या इमारतीविश्रामगृह अतिशय उत्तम करण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण राज्यातील वन कर्मचा-यांच्या निवासी वसाहतीसुद्धा कॅम्पमधून उत्तम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

असे राहील ताडोबा भवन

            चंद्रपूर येथील मुल रस्त्यावर असलेल्या क्षेत्र संचालकताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खुल्या जागेत 18 कोटी 8 लक्ष खर्च करून नवीन ताडोबा भवन बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर 100 आसन क्षमतेचे ऑडीटोरीयमपहिल्या माळ्यावर उपवनरंक्षक (बफर) आणि उपवनसंरक्षक (कोअर) यांचे कार्यालय तर दुस-या माळ्यावर क्षेत्रीय संचालक यांचे कार्यालय राहणार आहे. याशिवाय संकीर्ण बांधकामामध्ये पेव्हींग ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामांचा समावेश आहे.

0000

हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द वन विभागाच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द

वन विभागाच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 

            मुंबईदि. ४ :  वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वन विभागाने  ६५,७२४ रोपट्यांपासून भारतमाता’ या शब्दाची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. यामुळे  वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत वनविभागाने चार लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  नावावर करण्याचाही विक्रम केला आहे.

            चंद्रपूर येथे वनविभागाच्यावतीने १ ते ३ मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव २०२४’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प शनिवारी (२ मार्च) चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. २६ प्रजातींच्या तब्बल ६५,७२४ रोपट्यांनी भारतमाता’ या शब्दाची निर्मिती केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त केले.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘आतापर्यंत वन विभागाने चार लिमका रेकॉर्ड केले. आता मात्र प्रथमच राज्याच्या वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व वन अधिकारीवन कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. चंद्रपूर येथे ६५,७२४ रोपट्यांनी लिहिलेल्या हरित भारतमातेचा’ संकल्प संपूर्ण जगभरात पोहचला असल्याचे त्यांनी सांगितले.

            कार्यक्रमाला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वासमहिप गुप्ताताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकरगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्नील डांगरीकरवनअधिकारी प्रशांत खाडेमिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते.

त्वरित उद्यान करण्याच्या सूचना

             ‘भारतमाता’ शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाचे वनविभागाने एक चांगले उद्यान त्वरीत साकारावे. तसेच आज मिळालेले प्रमाणपत्र हे तेथे दर्शनी भागात लावावे. विशेष म्हणजे ही रोपटे सुध्दा नवनिर्मित उद्यानामध्ये भारतमाता’ याच शब्दाप्रमाणे लावावीतअशी सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली. 

Featured post

Lakshvedhi