Monday, 26 February 2024

डिफेन्स एक्स्पोमध्ये १३५८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार

 डिफेन्स एक्स्पोमध्ये १३५८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार

राज्यशासन आणि मॅक्स ॲरोस्पेस व एस बीएल एनर्जी,

तर मुनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

राज्यात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

 

            पुणेदि. २६ :- पुणे येथे झालेल्या एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये पहिल्याच दिवशी राज्यशासन आणि मॅक्स ॲरोस्पेसएस बीएल एनर्जीमुनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड यांच्यात तीन सामंजस्य करार झाले. या करारामुळे राज्यात १३५८ कोटी रुपयांची गुंतवणुक होणार आहे. मुख्य म्हणजे दोन कंपन्या नागपूरमध्ये तर दोन कंपन्या पुण्यात गुंतवणूक करणार असून भविष्यात राज्यात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.

            मॅक्स एरोस्पेस आणि एव्हिएशन प्रा. लिमिटेड ही एक विमानचालन अभियांत्रिकी कंपनी आहेजी लष्करी विमानांतील सुधारणाउन्नतीकरण आणि देखभाल संबंधी काम करते. नागपुरातील उत्पादन सुविधा विकसित करण्यासाठी राज्यशासन  आणि मॅक्स एरोस्पेस यांच्यात 558 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला.  असॉल्ट रायफल्सकार्बाइन्समशीन गनऑटोमॅक पिस्तूलग्रेनेड्सएअर लाँच गाईड बॉम्ब (प्रिसिजन म्युनिअन्स) आणि दारुगोळा निर्मितीसाठी ही पहिली गुंतवणूक असून राज्यातील संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी मोठी घडामोड आहे.

            एस बी एल एनर्जी लिमिटेड ही भारतातील खाण/औद्योगिक स्फोटके उत्पादकांपैकी एक प्रमुख कंपनी आहे. औद्योगिक आणि संरक्षण उद्देशांसाठी स्फोटकांच्या निर्मितीसाठी या कंपनीसोबत ५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. एसबीएल एनर्जी लि.आपला विस्तार करणार असुन पुढील  उत्पादन सुविधा नागपूरमध्ये स्थापन करणार आहे. हा सामंजस्य करार राज्यातील खाण आणि संरक्षण या दोन्ही क्षेत्रांच्या वाढीचे द्योतक आहेकारण स्फोटकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रस्तावित गुंतवणूक विदर्भात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि स्फोटक निर्मिती क्षेत्रात दुर्मिळ कौशल्य विकासासाठी सज्ज आहे.

            मुनिशन इंडिया लिमिटेड ही पुणेस्थित मुख्यालय असलेली कंपनी केंद्र सरकारच्या मालकीची संरक्षण कंपनी आहे. लष्करनौदलहवाई दल आणि निमलष्करी दलांसाठी सर्वसमावेशक दारुगोळा आणि स्फोटकांचे उत्पादनचाचणीसंशोधनविकास आणि विपणनामध्ये गुंतलेली ही भारतातील सर्वात मोठी उत्पादक आणि बाजारपेठेतील अग्रणी कंपनी आहे. निर्यातीच्या उद्देशाने 120 मिलीमीटर125 मिलीमीटर आणि 155 मिलीमीटर दारुगोळा उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी म्युनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड या कंपन्यांमध्ये  सामंजस्य करार करण्यात आला. या उत्पादन सुविधेमुळे उच्च कुशल रोजगार निर्माण होईल आणि 300 कोटी रुपयांची गुंतवणूक पुण्यात होईल. राज्यातील संरक्षण परिसंस्था मजबूत करण्यासोबतचही भागीदारी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत व्हिजनला साकार करण्यास मदत करेल.  शिवायही गुंतवणूक सुलभ  करण्यासाठी राज्य शासनाने पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही  दिली. 

            एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील राज्याच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा म्हणजे पहिल्याच दिवशी झालेली ही गुंतवणूक आहे. 2018 मध्ये नूतनीकरण केलेल्या एरोस्पेस आणि संरक्षण धोरणाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. या धोरणाने राज्याला एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात अग्रेसर बनण्यास सक्षम केले असुन  देशाच्या संरक्षण उत्पादनात 20% आणि निर्यातीत 16% योगदानही दिले आहे.

            राज्य शासनाचा उद्योग विभाग महाराष्ट्रातील या क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी लवकरच नवीन एरोस्पेस आणि संरक्षण धोरण जाहीर करणार आहे. तसेच500 कोटी रुपयांचा संरक्षण उपक्रम निधी (डिफेन्स व्हेंचर फंड) असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या क्षेत्रातील 15 पेक्षा जास्त स्टार्टअप्सना या उपक्रमातून निधी दिला असून यापैकी काही स्टार्टअप्सने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. नवीन धोरणामध्ये हा निधी आणखी वाढवला जाईल.

००००

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान

 धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 

20 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान

            मुंबई, दि. 26 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त, नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी 20 हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार असल्याबाबतचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आज काढला केला आहे.


            या शासन निर्णयानुसार हे अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान फक्त पणन हंगाम सन 2023-24 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागू राहील. खरीप पणन हंगाम सन 2023-24 मधील किमान आधारभूत किंमतीवर प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे असल्याने पणन हंगाम सन 2023-24 साठी धान, भरडधान्य खरेदीबाबतच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी सर्व अटी व शर्तीनुसारच नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी.


            हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे असणार आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोदंणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पहाणीद्वारे खातरजमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील. शेतकऱ्यांना (धान विक्री केली असो वा नसो) धान उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे. धान उत्पादक हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असावा. प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही. ई-पीक पहाणी ॲपद्वारे संकलीत माहितीच्या आधारे सात बारा उताऱ्यावरील धान लागवडीच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोस्ताहनपर अनुदान निश्चित करण्यात येईल. एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) त्यास प्रोत्साहनपर अनुदान देय राहील.


00000

कृषी विभागासंदर्भातील विविध विषयांचा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

 कृषी विभागासंदर्भातील विविध विषयांचा

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

 

            मुंबई दि. 26 : शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा त्याचे राहणीमान सुधारण्यासाठी विभागामार्फत जे काही बदल करता येतील ते कृषी विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            मंत्रालयामध्ये किसान संघ प्रतिनिधींच्या निवेदनासंदर्भात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमारकृषी आयुक्त प्रवीण गेडामस्मार्टचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर (दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे)सहसचिव गणेश पाटीलकिसान संघाचे चंदन पाटीलबळीराम सोळुंकेराहुल राठी  आणि विविध कृषी विद्यापीठाचे व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणालेकृषी विभागाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कृषी विभागाच्या शेतकरी मासिकाद्वारे विविध कृषी योजनांची आणि आधुनिक पद्धतीच्या शेती तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी विभागामार्फत हे मासिक सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

               नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे तसेच त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोकणातील नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.

               यावेळी किसान संघ प्रतिनिधींच्या निवेदनातील 32 विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात कृषी विभागांशी संबंधित विषयाबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच पणनकामगारउद्योग आणि ऊर्जा विभागांशी संबंधित विषयांवर त्या विभागांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/


 

शॉक संदेश


 कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की आपले जेष्ठ समाजबांधव श्री दिवाकर कुलकर्णी वय 82 , रा रिंगरोड जळगांव यांचे आज दुपारी 1.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता राहत्या घरून रिंगरोड ललित कला भवन समोर लक्ष्मी निवास येथून वैकुंठधाम येथे निघेल ते सुनिल भाऊ सीए अनिलभाऊ आणि नितीन भाऊ यांचे वडील होत


हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा

 हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची  सुविधा

- आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते २७ जिल्ह्यांतील हिमोफिलिया डे-केअर सेंटर्सचे उद्घाटन

आता राज्यातील  सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे केअर सेंटर

 

            मुंबईदि. २६ :- हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होती. मात्र आता नव्याने २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा मोफत उपलब्ध झाली असून रुग्णांना दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहेअसे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी आज केले. 

               हिमोफिलिया रुग्णांना रक्त गोठविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्स राज्यातील सर्व जिल्ह्यांत उपलब्ध करून देण्यासाठी नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे आज (दि. २६ फेब्रुवारी) आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या हस्ते मंत्रालयीन दालनात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

            या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावर आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरआरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक धीरज कुमारसंचालक डॉ. नितीन अंबाडेकरसहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रेसहसंचालक डॉ. विजय बाविस्कर उपस्थित होते. तर  सर्व जिल्ह्यांतील जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीनवीन हिमोफिलिया सेंटर्सचे अधिकारी कर्मचारीरुग्ण दूरदृष्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते.

            कार्यक्रम प्रसंगी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी हिमोफिलिया रुग्णांशी संवाद साधला. ही सेवा जिल्हा स्तरावर घराजवळ  उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांनी आरोग्य मंत्र्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. म्हैसकर यांनी या उपक्रमाविषयी महिती दिली.

            हिमोफिलिया डे केअर सेंटर या उपक्रमाबाबत जिल्हास्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले,  सेंटरच्या बाहेर संपूर्ण तपशीलवार माहिती असणारा फलक लावण्यात यावा.  याबाबत समाज माध्यमे तसेच प्रसारमाध्यमांमधून जनजागृती करावी. सेंटरमधील औषध साठ्याची  उपलब्धतेनुसार ताबडतोब मागणी नोंदवावी.  या ठिकाणी औषधांचा तुटवडा कुठल्याही परिस्थितीत निर्माण होणार नाहीयाची काळजी घ्यावी.

            राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१३ पासून हिमोफिलिया रुग्णांसाठी एकूण ९ हिमोफिलीया डे- केअर सेंटर्स सुरू आहेत. मात्र आता आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा सुरु करण्यात आली आहे. हिमोफिलिया आजाराच्या रुग्णांमध्ये रक्तातील रक्त गोठविणाऱ्या फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे स्नायूसांध्यांमध्येदातामधूननाकपुड्यातून तसेच मेंदूत रक्तस्त्राव होतो. फॅक्टरच्या कमतरतेच्या तिव्रतेमुळे वारंवार रक्तस्त्राव होऊ शकतो. ही फॅक्टर्स इतर औषधांच्या तुलनेने महागडी आहेत. रक्तस्त्राव होत असलेल्या परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी प्रवास करावा लागतोही बाब लक्षात घेऊन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले फॅक्टर्स सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार उर्वरित सर्व जिल्ह्यांत नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत.

            हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव होतो. हा आजार वाय गुणसूत्राच्या दोषामुळे होत असल्याने प्रामुख्याने पुरुष हे या आजाराने ग्रस्त आढळतात. मात्र स्त्रिया या आजाराच्या वाहक आढळतात. राज्यात अशा आजाराचे अंदाजे ४,५०० रुग्ण आहेत.

            रायगडपालघरधुळेबीडपुणेसोलापूरनंदुरबारकोल्हापूरजळगांवसिंधुदुर्गरत्नागिरीजालनापरभणीसांगलीहिंगोलीबुलढाणानांदेडलातुरधाराशीवअकोलावाशिमयवतमाळवर्धाभंडारागोंदियाचंद्रपूरगडचिरोली या जिल्ह्यांत नवीन हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्यामुळे रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच मोफत व वेळेत उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांतील रुग्णांना याचा लाभ होणार असून सहज उपचार मिळणार आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

 


बारामतीमधील 2 आणि 3 मार्चच्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे

 बारामतीमधील 2 आणि 3 मार्चच्या विभागस्तरीय

नमो महारोजगार मेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

·       मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 मार्चला बारामतीत होणाऱ्या

विविध कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा आढावा

            मुंबईदि. 26 :- पुणेसातारासांगलीकोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणाऱ्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासह इतर कार्यक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मार्च रोजी बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगारस्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठीकार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बारामती येथे होणाऱ्या विभागास्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस कौशल्यरोजगारउद्योजकतानाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तापोलीस महासंचालक रश्मी शुक्लानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयराज्य नाविन्यता व कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरीपुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवाररोजगार आयुक्तालयाचे उपायुक्त डी. डी. पवारमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीपुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुखमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरविविध जिल्ह्यांचे व विभागांचे क्षेत्रीय अधिकारीबारामती येथील स्थानिक अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीबारामतीत २ मार्चला नमो महारोजगार मेळाव्याबरोबरच बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटनपोलिसांसाठीच्या घरांचे लोकार्पणपोलीस विभागाला देण्यात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पणसीसीटीव्ही प्रकल्पाचा आरंभअतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटनबारामती बसस्थानकाचे लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारकआद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या ठिकाणीही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलसहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय महसूल आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीसार्वजनिक बांधकाम विभागउच्च व तंत्रशिक्षण विभागएसटी महामंडळनगरपालिका आदी संस्थांनी या सर्व कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावेअसे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीबारामती येथे २ मार्च रोजी एकदिवसीय नमो महारोजगार मेळावा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्रइतर विभागस्तरीय मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता बारामती येथील पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आता २ आणि ३ मार्च असा दोन दिवस आयोजित करण्यात यावा. मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्याकरिता बंदिस्त दालनविविध स्टॉल्सपिण्याचे पाणीकार्यक्रमस्थळी स्वच्छतेच्या सुविधावाहनतळअल्पोपहारबैठक व्यवस्थासीसीटीव्हीएलईडी डिस्प्लेजनरेटर आदी सुविधांची उत्तम व्यवस्था करावी. या मेळाव्यामध्ये रोजगार इच्छुक दहावीबारावीआय.टी.आय.पदविकापदवीधरपदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्यासाठी नावनोंदणी करून रोजगार संधींचा लाभ घ्यावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

            मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी आणि औद्योगिक संस्थांनी आजच नोंदणी करावी. या मेळाव्यामध्ये युवक व युवतींनी सहभागी होण्यासाठी (for candidate registration) https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नियोक्तांसाठी (For Employer registration)                         https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहेअशी माहितीही या बैठकीत देण्यात आली.

---------०००००---------

संध्या गरवारे/विसंअ/

मुंबई शहर जिल्ह्याच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी मार्शल रॅलीचे आयोजन

 मुंबई शहर जिल्ह्याच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी मार्शल रॅलीचे आयोजन


 


            मुंबई, दि.24 : मुंबई शहर जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदार नोंदणी करीता व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.मुंबई शहर जिल्हा कार्यालय आणि लाला लजपतराय महाविद्यालयातील राष्ट्रीयसेवा योजनेच्या वतीने मार्शल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


            एअर इंडिया बिल्डिंग, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यत ही मार्शल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सामजिक संस्था मार्क युवर प्रेझेन्स (MYP) सोबत मुंबई शहरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजतील विद्यार्थी,प्राध्यापक विविध विद्या शाखेचे विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्वीप नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, मुंबई शहर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक क्रांती इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ही रॅली यशस्वीपणे पार पडली.


            मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाही मध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.


            लोकशाहीला अधिक समृद्ध करण्यात मतदानाचे महत्त्व आणि युवा वर्गाचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण मतदारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम, निवडणूक साक्षरता याबाबत मतदारांना ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने मतदान नोंदणी प्रक्रियेची व EVM/VVPAT मशीन व Mock Poll कशा पध्दतीने हाताळावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच नव मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा अधिक सहभाग असेल असे या रॅलीत सहभागी तरुणांनी आश्वासन दिले.


000

Featured post

Lakshvedhi