Thursday, 22 February 2024

सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही

 सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती

पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार

मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 21 : राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता विकासकांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून विकासक त्यांच्याकडे धावत येतीलअशी परिस्थ‍िती निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील मराठी माणसाची स्वप्नपूर्ती होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

            गृहनिर्माण सहकार परिषदेतील स्वयंपुनर्विकास, पुनर्विंकासाच्या निर्णयाबाबात अभ्युदयनगर येथे आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरपालकमंत्री दीपक केसरकरगृहनिर्माण मंत्री अतुल सावेकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार सर्वश्री प्रवीण दरेकरआशिष शेलार आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणालेराज्य शासनाने घेतलेल्या स्वयंपुनर्विकासाच्या निर्णयामुळे किमान 25 हजार वसाहती म्हणजेच साधारणपणे 5 लाख घरांची निर्मिती होणार आहे. तीन पिढ्यांपासून घराचे स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणसांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. बीडीडी चाळींचा विकासकांकडून नव्हे तर म्हाडाकडून विकास करण्याचा निर्णय घेतला. 100 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्यांना 560 स्क्वेअर फुटांचे घर दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

            अभ्युदयनगरच्या सीएनडीच्या विकासाचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांच्या विविध मागण्यांचाप्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेउपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान 17 पोलीस वसाहती म्हाडाकडून विकासित केल्या जाणार असून बांद्रा रिक्लमेशनआदर्शनगर वरळीपीएमजीपी कॉलनी पुनमनगरअंधेरीतील वसाहतींच्या विकासाचे प्रश्न लवकरच मार्गी लावले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

***

छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने पूर्ण करावे

 छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने पूर्ण करावे

- मंत्री संजय बनसोडे

            मुंबई दि. 21 : छत्रपती संभाजीनगरमधील तालुकास्तरावरील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

            आज मंत्रालयात जिल्हाविभागतालुकाक्रीडा विद्यापीठ स्तरावरील क्रिडा संकुलाच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री बनसोडे बोलत होते.

            मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीसोयगावखुलताबादगंगापूरकन्नडपैठणसिल्लोडवैजापूर येथील क्रीडा संकुलाच्या कामाबाबत आढावा घेतला.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीप्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. क्रीडा खेळपट्टी बांधण्यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय निकष वेगळे करण्यात यावेत.  एखादी इमारत बांधकामप्रेक्षागॅलरीसाठीचे नियम, हॉकीचे मैदानफुटबॉलबॅडमिंटनचे सिंथेटीक रोलींग कोर्ट यासाठी तांत्रिक मान्यतेबाबतचे सुधारित धोरण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. लातूर येथील उदगीर क्रीडा संकुल आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त, खेळाडूंना उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देणारे उभारण्यात यावे. त्यासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

आपत्तीमुळे शेतीपीकांसह मालमत्ता नुकसान बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधीस मान्यता निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा

  आपत्तीमुळे शेतीपीकांसह मालमत्ता नुकसान बाधितांना

मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधीस मान्यता

निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा

- मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि. २१ :-  सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपये निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.  याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याने  या निर्णयामुळे बाधितांना जलद मदत मिळेलअसा विश्वास मंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

            सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत पीक व मालमत्ता नुकसानाच्या मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी व नागरिकांकडून मागणी होत होती. प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात  आली. यामुळे संबंधित शेतकरी व बाधितांना  दिलासा मिळणार आहेअशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली

            राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या बाधितांना मदत करण्यासाठी  विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे.

            कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर  कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानासाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.

            त्यानंतरही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून  काही प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित होते. या प्रस्तावांना मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली व  निधी मंजुरीस मान्यता देण्यात आली.

००००

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1792 कोटी निधी वितरणास मान्यता

 नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी

1792 कोटी निधी वितरणास मान्यता

- धनंजय मुंडे

राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी 2 हजार जमा

 

            मुंबई दि. 21 : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

            या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल. ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मुंडे यांनी दिली आहे.

            राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6 हजार याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे.

            एप्रिल ते जुलै 2023 या पहिल्या हप्त्यामध्ये 1 हजार 720 कोटी रुपये निधीचे राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या दुसऱ्या हप्त्यासाठी आता 1 हजार 792 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून याचा लाभ राज्यातील जवळपास ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिना अखेर पर्यंत या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मुंडे यांनी दिली आहे.

            राज्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर श्री. मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करण्यात आली, यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे 13 लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

बुलढाणा जिल्ह्यात विषबाधा झालेल्यांना उपचार करून घरी सोडले आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले शेकडो लोकांचे प्राण

 बुलढाणा जिल्ह्यात विषबाधा झालेल्यांना उपचार करून घरी सोडले

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले शेकडो लोकांचे प्राण

            मुंबईदि. 21 : बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील सोमठाणा व खापरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात जेवणातून 208 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती.  विषबाधा झालेल्या सर्वांवर वेळेत उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. तर चार रुग्णांना ग्रामीण रुग्णालय बीबी (ता. लोणार) आणि तीन रुग्णांना ग्रामीण रुग्णालयमेहकर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेअशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारीबुलढाणा यांनी दिली आहे.

            या घटनेची माहिती मिळताच नजीकच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर्सनर्सेस आणि रुग्णवाहिका प्रत्यक्ष घटनास्थळावर पाठवण्यात आल्या. त्यामुळे जिथे हरिनाम सप्ताह सुरू होतातत्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात तात्काळ रुग्णांना उपचार पुरविण्यात आले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

            विषबाधा झाल्याने उलटी जुलाब होऊन रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागेवरच उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून अनेकांचे सर्वांचे प्राण वाचविले. खापरखेडा आणि सोमठाणा येथील पाणी नमुने तपासणी करिता उपजिल्हा अनुजीव तपासणी प्रयोगशाळा  देऊळगाव राजा येथे पाठविण्यात आले आहेत.

            गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले.  201 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.

००००

निलेश तायडे/विसंअ/

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

 मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश;

मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

 

            मुंबईदि. 21 :- मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यादृष्टीने पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी. तसेच मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा १ व २ च्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर अंमलबजावणी करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा एक व टप्पा दोन मधील अडचणी दूर करण्यासाठी बैठक झाली. बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्तापाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मालाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णापाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रहाणेटाटा पॉवर कंपनीचे अधिकारी प्रभाकर काळेतसेच बाबुराव चांदोरे आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेपीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी सकारात्मक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमुळशी व पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास अतिरिक्त  पाणी उपलब्ध होऊ शकते. यासह धरणाच्या मृतसाठ्यामधील पाण्याचा वापर करता आल्यास पाण्याची वाढीव मागणी पूर्ण होईल. टाटा पॉवर कंपनीच्या सहकार्याने या कामांस प्राधान्य देण्यात यावे.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेहिंजवडीसह कोळवण खोऱ्यातील गावांमध्ये येत्या तीन वर्षात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी. त्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यात यावी. उंची वाढविल्यामुळे पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीपैकी ८० टक्के जमीन टाटा पॉवर कंपनीच्या क्षेत्रातील असून ती विनामोबदला देण्याची विनंती करण्यात यावी. उर्वरित २० टक्के जमीन शासनाच्या वतीने अधिग्रहण करावी. यासाठी जमीनधारकांना योग्य मोबदला देण्यात यावाअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

            मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत मंजूर कामांबाबत टाटा पॉवर कंपनीने हरकत घेतल्याने काम थांबले होते. या कामांना वेग देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलसंपदा विभागास प्रस्ताव द्यावा. जलसंपदा विभागाने आवश्यक पाण्याचे आरक्षण जाहीर करून याबाबत टाटा पॉवर कंपनीला लेखी कळवावे. तसेच पौड येथील पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पीएमआरडीएने एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी पुरेशा क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी शेजारी असणाऱ्या आणखी चार एकर जागेची आवश्यकता आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पीएमआरडीएने ही जागा अधिग्रहण करून उपलब्ध करून घ्यावीअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

बारामतीमध्ये ‘ईएसआयसी’च्या 200 खाटांच्या रुग्णालयासाठी ‘एमआयडीसी’मार्फत वाढीव जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश

 बारामतीमध्ये ईएसआयसीच्या 200 खाटांच्या रुग्णालयासाठी

एमआयडीसीमार्फत वाढीव जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश

- उपमुख्यमंत्री अजित पवार

पणदरे एमआयडीसीतील वीज समस्या सोडविण्यासाठी

ढाकाळीमुढाळे येथे एमआयडीसीमार्फत वीज उपकेंद्र उभारणार

 

            मुंबईदि. 21 :- केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने बारामतीसाठी 100 खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. भविष्यातील वाढत्या औद्योगिक वसाहतीची गरज लक्षात घेता येथे 200 खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी अतिरिक्त जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात बारामती औद्योगिक वसाहत संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंतबारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदारमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्लाराज्य कर आयुक्त आशिष शर्माउद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळेवित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीबारामती औद्योगिक क्षेत्र टप्पा 2 येथे राज्य कामगार विमा रुग्णालयासाठी पाच एकर जागेची मागणी करण्यात आली होती. तथापि भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन येथे 200 खाटांचे रुग्णालय होणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. यासाठी निकषानुसार अधिक जागा आवश्यक असल्याने एमआयडीसीच्या माध्यमातून अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

            बारामतीसह परिसरातून औद्योगिक व कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. त्याअनुषंगाने येथे ड्रायपोर्ट निर्माण करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केली. बारामती एमआयडीसीमधील अग्निशमन केंद्रात लवकरात लवकर आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात यावी. एमआयडीसीमधील भूखंडाचे हस्तांतरण करताना  राज्य शासनाचा रेडी रेकनर मूल्यांकनाचा दर आणि एमआयडीसीच्या मूल्यांकनाच्या दरापैकी जास्त असणाऱ्या रक्कमेवर मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्यामुळे उद्योजकांवर अतिरिक्त बोजा पडतो. ही तफावत दूर करण्याच्या मागणीची दखल घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईलअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            बारामती औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीचे वापराविना पडून असलेले सभागृह दीर्घ कराराने बारामती औद्योगिक वसाहत संघटनेला वापरण्यासाठी देण्यात यावेपणदरे एमआयडीसीमधील लघुउद्योजकांच्या वीज पुरवठ्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक्सप्रेस फीडरद्वारे वीजपुरवठा करावा. त्यादृष्टीने ढाकाळी आणि मुढाळे येथे वीज उपकेंद्र उभारण्याच्या कामास गती द्यावी. पुनर्स्थापित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत ही उपकेंद्र उभारण्यास लागणारा वेळ पाहता एमआयडीसीने स्वत:च्या निधीतून त्यांची उभारणी करावी. उद्योग विभागाला ऊर्जा विभागामार्फत या निधीचा परतावा करण्यात येईलअसा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संघटनेच्या इतर मागण्यांबाबतही चर्चा करण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

00000

Featured post

Lakshvedhi