Thursday, 21 September 2023

डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० मुळे होईल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ वर्ष २०२३-२४ सहलींचे आयोजन असे आहे

 डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० मुळे होईल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ  


- पर्यटन मंत्री गिरीश महाजन


डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० पर्यटकांसाठी उपलब्ध


          मुंबई, दि. 21 : डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या आलीशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


              छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या ट्रेनला पर्यटन मंत्री श्री. महाजन आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्यानंतर पर्यटन मंत्री श्री. महाजन बोलत होते. ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे व पनवेल ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावली. यावेळी पर्यटन व सांकृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्यासह भारतीय रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.


           मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या ट्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा आणि सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. डेक्कन ओडिसी (Ultra Luxury Train) ही राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वात आलीशान ट्रेन आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ट्रेनच्या माध्यमातून पंचतारांकित हॉटेलचा अनुभव घेता येतो. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना राज्यातील पर्यटन स्थळे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. जुन्या ट्रेनमध्ये आता विविध बदल केलेले असून या ट्रेनमध्ये एकूण २१ डबे आहेत. ४० डिलक्स सूट आणि दोन प्रेसेडेन्सियल सूट आहेत. तसेच १ कॉन्फरन्स हॉल आहे. याशिवाय हेल्थ स्पा, जनरेटर व्हॅन, जिम, केबल टीव्ही, इंटरनेट, ग्रंथालय, म्युझिक प्लेअर अशा सोयीसुविधा आहेत.


पर्यटन विकासाला मिळेल चालना - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर


           विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, देशातील प्रसिद्ध असणाऱ्या रेल्वेपैकी एक असलेली ही ट्रेन सुरु झाल्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासासाठी चालना मिळणार आहे. परदेशी पर्यटकामध्ये अत्यंत गाजलेली व पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती डेक्कन ओडिसी ट्रेन आता नव्या रूपात धावणार आहे. ही आपल्यासाठी अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे. पर्यटकांनी या ट्रेनच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद घ्यावा.


महाराष्ट्राला पर्यटन नकाशावर वेगळी ओळख करून देणारी ट्रेन


       डेक्कन ओडिसी या प्रकल्पास केंद्र शासन व राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेच्या चेन्नई येथील फॅक्टरीत सन २००३ मध्ये डेक्कन ओडिसी ही आरामदायी ट्रेन तयार करण्यात आली. सन २००४ मध्ये तत्कालिन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते डेक्कन ओडिसी ट्रेनचे उद्घाटन होऊन गाडीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता. सन २००४ -२०२० दरम्यान डेक्कन ओडिसी आलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. परंतु सन २०२०-२१ मध्ये आलेल्या ‘कोविड’मुळे अन्य रेल्वे प्रमाणेच डेक्कन ओडिसीची देखील सेवा बंद झाली. आता पर्यटन क्षेत्र पूर्व पदावर आले असून त्यामुळे आता डेक्कन ओडिसीची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटन महामंडळ सज्ज झाले असून नियुक्त केलेल्या ऑपरेटरद्वारे २१ सप्टेंबर २०२३ पासून डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयी सुविधेने पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरु होत आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातील अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.


वर्ष २०२३-२४ सहलींचे आयोजन असे आहे


  महाराष्ट्र स्प्लेंडर : मुंबई (सीएसएमटी)– नाशिक रोड – औरंगाबाद –पाचोरा - कोल्हापूर - मडगाव (गोवा) - सावंतवाडी,


इंडियन सोजन : मुंबई (सीएसएमटी) – वडोदरा – उदयपूर – जोधपूर – जयपूर – आग्रा – सवई माधोपूर – नवी दिल्ली.,


इंडियन ओडिसी : - नवी दिल्ली - सवईमाधोपूर – आग्रा - जयपूर- उदयपूर - वडोदरा - मुंबई सीएसएमटी.,


हेरिटेज ओडिसी : दिल्ली - आग्रा- सवई माधोपूर- उदयपूर - जोधपूर जैसलमेर - जयपूर – नवी दिल्ली.,


कल्चरल ओडिसी : दिल्ली - संवईमाधोपूर – आग्रा - जयपूर- आग्रा - ग्वाल्हेर झांशी –खजुराहो - वाराणसी - नवी दिल्ली.,


महाराष्ट्र वाईल्ड ट्रेन : मुंबई (सीएसएमटी)– छत्रपती संभाजी नगर – रामटेक – वरोरा – पाचोरा– नाशिक रोड - मुंबई (सीएसएमटी).,


दार्जिलिंग मेल : मुंबई (सीएसएमटी)– वडोदरा – उदयपूर- सवईमाधोपूर – जयपूर- आग्रा – बनारस –सिलीगुडी .,


दार्ज‍िलिंग मेल रिटर्न : सिलिगुडी – बनारस – आग्रा - सवईमाधोपूर- जयपूर – उदयपूर- वडोदरा - मुंबई (सीएसएमटी).,


डेक्कन ओडिसी ट्रेन विविध पुरस्कारांची मानकरी


    2014 मध्ये वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्सचा आशियातील आघाडीच्या लक्झरी ट्रेनचा पुरस्कार.,2015 नॉर्थ इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड्सचा भारतातील सर्वोत्कृष्ट लक्झरी ट्रेन पुरस्कार.,2015 वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्स - आशियातील आघाडीच्या लक्झरी ट्रेनचा पुरस्कार., 2016 वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्स - आशियातील आघाडीच्या लक्झरी ट्रेनचा पुरस्कार.,2016 टीटीजे ज्युरी चॉइस अवॉर्ड्स - इनोव्हेशनमध्ये उत्कृष्टता पुरस्कार.,2017 वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्स - आशियातील आघाडीच्या लक्झरी ट्रेनचा पुरस्कार.,2017 लोनली प्लॅनेट तर्फे आयोजित ट्रॅव्हल अॅण्ड लाइफस्टाइल अवॉर्ड - सर्वोत्तम प्रवासी अनुभव पुरस्कार


या नव्या ट्रेनमधील सोयीसुविधा


           पर्यटनस्थळे पाहताना पर्यटकांना महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेसा राजेशाही प्रवास अनुभवता यावा याकरीता डेक्कन ओडिसीमध्ये इंटरकॉम, म्युझिक सिस्ट‍िम, उच्च दर्जाचे फर्निचर, वातानुकूलन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाडीला एकूण 21 डब्बे असून 10 कारमध्ये प्रत्येकी 4 डिलक्स कॅबिन आहेत. इतर दोन पॅसेंजर कारमध्ये प्रत्येकी 2 प्रेसेडेंन्शियल सूटस् आहेत. उर्वरित 9 डब्ब्यांपैकी 1 डब्बा परिषद गृह, 2 डब्बे भोजन कक्ष, 1 डब्बा हेल्थ स्पा, 1 डब्बा बार, 2 डब्बे कर्मचारी वर्ग व उर्वरित 02 डब्बे जनरेटर कार व भांडारगृह अशा प्रकारच्या डब्यांच्या जोडणीने सुविधा निर्माण करण्यासाठी सजविलेले आहेत. आलिशान रेल्वेगाडी पेक्षाही ही गाडी 'चाकावरचे पंचतारांकित हॉटेल' वाटावे यादृष्टीने गाडीमध्ये अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.


         सहल आरामदायी होण्याकरिता प्रत्येक कोचमध्ये अग्नी संरक्षण यंत्र बसविण्यात आले आहे. पँट्री कारमध्ये एलपीजी गॅस ऐवजी इंडक्शन बसविण्यात आले आहे. आतील एसीचा परिणाम चांगला रहावा याकरीता सन 2018 मध्ये छतावर पेंट कोट देण्यात आला आहे. सन 2017 -18 मध्ये जुन्या कन्व्हेन्शनल ट्रॉलीज बदलून नवीन पद्धतीच्या एअर सस्पेन्शन ट्रॉलीज लावण्यात आल्या आहेत. जुन्या पद्धतीच्या ट्रॉलीजमध्ये चालू गाडीमध्ये डबे जास्त प्रमाणात हलून धक्के बसायचे नवीन एअर सस्पेन्शन ट्रॉलीजमुळे आता खूपच आरामदायी झाली आहे. सर्व डब्यांचे गँगवे बदलण्यात आले आहेत. जेणेकरून एका डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये जाणे सोयीचे झाले आहे. सर्व डब्यांचे फ्लोरींग बदलण्यात आले आहे. तसेच पडद्यांना विशिष्ट प्रकारचे केमिकल लावण्यात आले आहे. सर्व डब्यांच्या शौचालयांना जैव टाकी बसविण्यात आली आहेत. संबंधित रचना रेल्वेच्या लखनौतील संशोधन रचना आणि मानक संस्थेकडून प्रमाणित करण्यात आल्या आहेत.

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथीलस्मारक उभारण्याच्या कामाला गती द्यावी

 आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथीलस्मारक उभारण्याच्या कामाला गती द्यावी


- उपमुख्यमंत्री अजित पवार


            मुंबई, दि. 21 :- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांसह सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात वासाळी येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींची मागणी आहे. या मागणीचा विचार करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक प्रेरणास्थान तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा. यासंदर्भातील कामे गतीने पूर्ण करावीत, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिली.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखली आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आमदार सुनील शेळके, चंद्रकांत नवघरे, माणिकराव कोकाटे, अपर मुख्य सचिव (वित्त) नितीन करीर, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांच्यासह पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाशिकचे जिल्हाधिकारी आदी मान्यवर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची जागा इगतपुरी व कळसूबाई शिखर परिसराला लागून आहे. स्मारकापासून कळसूबाई शिखरापर्यंत रोप-वे च्या कामासाठी केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतून निधी मिळणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


            स्मारकाबरोबर आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्यास परिसरातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होवू शकतो. यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वापरून या परिसराचा विकास करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.


            सिध्देश्वर धरण परिसराचे सुशोभीकरण व विकास वृंदावन बागेच्या धर्तीवर करण्यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करीत आहे. पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या माध्यमातूनछत्रपती संभाजी नगर, लातूरमध्ये शासकीय दरात रूग्णांना मिळणार उपचार

 



आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या माध्यमातूनछत्रपती संभाजी नगर, लातूरमध्ये शासकीय दरात रूग्णांना मिळणार उपचार


- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ


 


            मुंबई, दि. २१ : छत्रपती संभाजी नगर आणि लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालयाचे परिचालन आणि व्यवस्थापन शासन आणि खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. याद्वारे रूग्णांना शासकीय दरामध्ये उपचार मिळणार आहेत. यासाठी रूग्णालयामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.


            मंत्रालयात छत्रपती संभाजी नगर, लातूर आणि नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर चालविण्यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.


            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती संभाजी नगर आणि लातूर येथे दवाखान्यासाठी इमारत तयार आहे. याठिकाणी रूग्णांना उपचारासोबत अत्याधुनिक निदान सेवा मिळणार आहेत. नागपूर येथील जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जागा निश्चिती करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणचे दवाखान्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून इमारत आणि वैद्यकीय सामग्री शासन पुरविणार आहे. दोन्ही दवाखाने खाजगी तत्वावर सुरू होणार असले तरी खाजगी रूग्णालयात असलेले शुल्क इथे स्वीकारले जाणार नाही. जनआरोग्यासाठीचे ५० टक्के खाटा पूर्ण झाल्या असले तरी येणाऱ्या रूग्णांना उपचार केले जाणार आहेत. ही भागीदारी १५ वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत राहणार असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.


            दवाखान्याजवळच अत्याधुनिक निदान केंद्रांची सोय करावी. एमआरआय, सीटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅबही भागीदारी तत्वावर सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ज्याठिकाणी पॅथॉलॉजी नाहीत, तिथे लॅब सुरू करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. यावेळी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या प्रतिनिधींनी सादरीकरणातून माहिती दिली.


            यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक अजय चंदनवाले, अवर सचिव महादेव जोगदंड, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेचे पंकज सिन्हा, हर्षा खूबचंदानी, सुहास पांडे आदी उपस्थित होते.


००००

लोणावळा पर्यटन विकासासाठी प्रकल्पअहवाल महिन्याभरात तयार करावा

 लोणावळा पर्यटन विकासासाठी प्रकल्पअहवाल महिन्याभरात तयार करावा


- उपमुख्यमंत्री अजित पवार


            मुंबई, दि. 21 :- लोणावळा येथील टायगर, लायन्स पॉइंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


             पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण, तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेला उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे.


            या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य द्यावे. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना काँक्रिट ऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल, अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. लोणावळा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. 4.84 हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून येथे झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, ॲम्पी थिएटर, खुले जिम आणि विविध खेळ आदी विविध सुविधा असणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.




कुसूर पठारावर जागतिक पर्यटन केंद्राचा जिल्हा आराखड्यात समावेश करावा


- उपमुख्यमंत्री अजित पवार


            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतरावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्ग संपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा. शासनामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करावी, लवकरच याबाबत पुणे येथे बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी.एन.पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानेश्वर दाभाडे उपस्थित होते.


            कुसवली पठार हे समुद्र सपाटीपासून 3 हजार मीटर उंचीवर असून साधारण 1 हजार 200 एकरचा हा परिसर आहे. परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी, तर दुसऱ्या बाजूस वडीवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत. पठाराच्या शेव

 सध्याच्या दुष्काळात कृत्रिम पाऊस उपयोगी पडेल?

- महाराष्ट्रातील पहिल्या प्रयोगाची गोष्ट

महाराष्ट्रात वीस वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (२० सप्टेंबर २००३) कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. या वर्षी निम्म्याहून अधिक महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे आता कृत्रिम पावसाची चाचपणी होत आहे. या पार्श्वभूमीवर, कृत्रिम पावसाच्या पहिल्या प्रयोगाच्या विमानात सहभागी असलेले "भवताल" चे संस्थापक श्री. अभिजित घोरपडे हे या प्रयोगाबाबत सांगताहेत- 
• कृत्रिम पाऊस म्हणजे काय असतो?
• प्रत्यक्षात त्याचा उपयोग किती होतो?
• त्यामुळे महाराष्ट्राचा दुष्काळ दूर होईल?
• त्यासाठी सरकारने काय करायला हवे?
• गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राने या प्रयोगाचे काय केले?

पाहा, " भवताल In-Depth " मध्ये.
यू-ट्यूब लिंक:

(आपल्या संपर्कात शेअरही करा.)

- भवताल टीम

--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

गणपती उत्सव

 




 



 







गणपति उत्सव, लोककला संस्कृती, नावगाव अलिबाग



 

Featured post

Lakshvedhi