Wednesday, 9 August 2023

आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा

 आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा पाड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी


रस्त्यांचे जाळे तयार करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पालघर, दि. 9 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या.


            आज पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.


            आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, श्रीमती कुमुद गावित, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खा. राजेंद्र गावित, आ.शांताराम मोरे, आ.श्रीनिवास वनगा, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास हे व्यासपीठावर उपस्थित होते. 


               मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शासनाने २५० आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट केला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. 100 विद्यार्थ्यांना पीचडीसाठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे. तिथे १७ संवर्गातील भरती ही स्थानिकांमधूनच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रस्त्यांची उभारणी करण्यात येत आहे.


            समाजातील प्रत्येक घटकाला मान, सन्मान आणि विकासाची संधी देण्याचे काम प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या प्रेरणेने होत आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. तसेच ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांचा शुभारंभही झाला आहे. भारताच्या स्वतंत्र चळवळीत आदिवासी बांधवांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी शहीद आदिवासींना नमन केले.


देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


आदिवासींची प्राकृतिक परंपरा जपणारी जीवनशैली आहे. देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मूल निवासींसाठीचा हा दिवस असल्याचे सांगितले. भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.


देशाच्या अर्थसंकल्पात आदिवासींसाठी पाचपट आर्थिक तरतूद वाढविली आहे. आदिवासी विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या मदतीने प्रत्येक पाडा हा रस्त्याने जोडणार आहे. पालघर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल भागात प्राधान्याने रस्त्याचे जाळे विकसीत केले जाणार आहे. शबरी योजनेची तरतूद तीन पटीने वाढविली आहे. प्रत्येक आदिवासी बांधवास पक्के घर मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सुमारे दोन लाख आदिवासींना वनहक्काचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. शासकीय रूग्णालय, उत्तम शाळा, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.


आदिवासींच्या विकासासाठी निधी तातडीने देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार


            आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने वितरीत केला जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आदिवासी बांधव हे खऱ्या अर्थाने निसर्गाचे तसेच संस्कृतीचे संवर्धन करित आहेत. बहुसंख्य आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आठ तालुका असलेल्या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. पालघरमधील पर्यटन, खाद्यपदार्थ आणि कलेच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.


            पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, आदिवासी पाडे हे मुख्य रस्त्यांना जोडणे आवश्यक आहे. या कामाला प्राधान्य देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. जिल्हात ५६१ विकास कामं सुरू असून ८० अमृत सरोवर तयार होत असल्याचेही मंत्री श्री चव्हाण यांनी सांगितले.


आदिवासींच्या पाड्यांना जोडणारे रस्ते,त्याच्यासाठी घरे, शिक्षणाच्या सुविधा, धान खरेदी, दाखले वितरण या सर्व योजना पारदर्शकपणे राबवून आदिवासींना जास्तीत जास्त लाभ देणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.


आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपणा, मानवतेबद्दल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर ०९ ऑगस्ट हा "जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस महाराष्ट्रातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.


या कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांचा मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदिवासी बांधवांचा गुण गौरव करण्यात आला. यावेळी चाळीस प्रकारचे पारंपरिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जव्हार श्रीमती नेहा भोसले यांनी केले.


माजी आमदार रवींद्र फाटक, आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, विवेक पंडीत, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, अपर आयुक्त आदिवासी विकास बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, डहाणू प्रकल्प अधिकारी संजीता महापात्रा, जव्हार प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब फटांगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थ‍ित होते. 


०००



 

वास्तव सत्य.* 💧💧💧💧💧

 *वास्तव सत्य.*

💧💧💧💧💧💧💧💧


*वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, " पृथ्वीवरील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. "*


       *कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला असेल तर समजून घ्यावे कि, आपण आता कौटुंबिक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.*

  

   *बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा ,असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.*


     *वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवू नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाचे फाळणीबरोबरच संपुष्टात आले , नातेवाईक पैसे देणे / घेणे वादातून संपले, पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला , कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो ,फारशी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता , ह्याला मी किती मदत केली होती.*

 

      *सगळे कटू अनुभव जमा झाले असतील , कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.*


         *नाती बिघडली, सबंध बिघडले , वाट्याला एकटेपण आले , आता कुणाचे फोन येत नाहीत , दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही.*


    *तरीपण एक नात अजून टिकलेलं आहे , एक फोन चालु आहे , ते नातं मुलीचं, तितक्यात मुलीचा फोन येतो , ती विचारते--- पप्पा गेले होते का दवाखान्यात ? औषधं घेतलीत का ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झाल काय ? नाना प्रश्न काळजीचे , आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात.* 


         *थोडा पश्चातापही होत असतो , मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार त्यांचे ?*


     *लोक मुलगा झाला कि, स्वतःला भाग्यवंत समजतात, मला असे वाटते ,ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होत. एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्यावरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते. मुलगी म्हणते काळजी करू नका मी आहे.* 

           💐💐💐💐

  *रिटायर्ड सदस्यांना समर्पित*


*Join us on WhatsApp Humbaa 

मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण प्रतिज्ञा

 




मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण प्रतिज्ञा

            मुंबई, दि. 9 : “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू", अशी पंचप्रण शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांना दिली.


            "माझी माती, माझा देश" या अभियानांतर्गत आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘माझी माती माझा देश’ अभियानाचे नोडल अधिकारी (ग्रामीण) एकनाथ डवले आणि नोडल अधिकारी (शहरी) गोविंद राज, पोस्ट मास्तर जनरल अभिकांत सिंग तसेच मंत्रालयातील प्रशासकीय व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करत आहोत. लोकाभिमुख निर्णय घेण्याचे तसेच जनतेला न्याय देण्याचे काम हे शासन करत आहे. 2023- 24 च्या अर्थसंकल्पात नमूद विकासाच्या पंचसूत्रीनुसार देशातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपले सरकार करत आहे. ज्या वीरांनी आपल्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या शौर्याला स्मरण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले की, देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. वीर शहिदांची महती त्यांनी वर्णित केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी चालविलेला राज्यकारभार, त्यांचे प्रशासन याबाबतही श्री.मुनगंटीवार यांनी आपले विचार मांडले.


            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला एक विशेष टपाल तिकीट किंवा विशेष आवरणाचे विमोचन करण्यात येते. याप्रसंगी भारतीय टपाल विभागाने तयार केलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या विशेष टपाल आवरणाचे विमोचन सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.


            13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या "घरोघरी तिरंगा" या अभियानाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांना कापडी तिरंगा ध्वज देऊन यावेळी करण्यात आली.


            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी 2 ते 3 मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.45 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. याही उपक्रमाची सुरुवात आजपासून मंत्रालयात करण्यात आली.


            यावेळी राज्य शासनाच्या लाभात असलेल्या दोन महामंडळांनी आपापला लाभांश धनादेशाद्वारे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना सुपूर्द केला. यात वन विकास महामंडळाचे 3 कोटी 27 लाख 50 हजार रुपये आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाचे 1 कोटी 34 लाख 15 हजार 733 रुपयांचा समावेश आहे.


            सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले असून हे प्रमाणपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आले.


            सुरुवातीला "माझी माती, माझा देश" या उपक्रमाची रूपरेषा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विषद केली.


000

बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा-वसंत मुंडे --------

 बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा-वसंत मुंडे                                          

------------------------------

मुंबई (प्रतिनिधी):- देशात ओबीसीला आरक्षण 1990 पासून बी.पी. मंडल आयोगामुळे लागू करण्यात आले. भाजप सरकारने आरएसएसच्या मनुवादी संस्कृतीच्या दबाव तंत्रामुळे ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मोहीम आखल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला.

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी जनगणना करण्यात आली. त्यामध्ये ओबीसीचा डाटा देण्यासंदर्भात वेळ काढून धोरण महाराष्ट्रातील बीजेपी सरकारने स्वीकारल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी जनगणनेचा डाटा मुद्देनिहाय उपलब्ध नाही तसे राज्य सरकारने शपथपत्र सादर करून महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य मतदार संघातील ओबीसी आरक्षणावर गदा आली असून आरक्षणासंदर्भात वास्तव्य दर्शन माहिती संकलित केल्याशिवाय ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षणाच्या जागा राज्य निवडणूक आयोगाला देताना अडचण निर्माण खंडपीठाने स्पष्ट आदेश केल्यामुळे झाली. 13 डिसेंबर 2021 च्या जातीने जनगणना संदर्भात एसीपीसी संदर्भ देऊन ओबीसी जातीची कच्ची यादी देण्याकरता महाराष्ट्र सरकारने केंद्रीय प्राथमिक प्राधिकरणाकडे पत्रावर केलेला आहे. मनमोहन सिंग सरकारने ओबीसीच्या जनगणना संदर्भात पाच हजार कोटी रुपये खर्च करून व ओबीसीचा डाटा हे राष्ट्रीय संपत्ती असून ती सर्वशी जबाबदारी भारत सरकारची आहे.

परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी 12 जून 2018 ला केंद्र सरकारकडे पत्र देऊन गुपित माहिती ठेवण्याचे सूचना आरएसएस च्या विचारधाराचे बीजेपी सरकारने त्यांना दिली. बीजेपीचे धोरण भारत देशामधील संपूर्ण आरक्षण मुक्त करण्यासाठी डावपेच चालू आहेत. देशामध्ये पशुपक्षी जनगणना होते परंतु ओबीसीची जनगणना केली जात नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या बिहार राज्य प्रमाणे जातीनिहाय सवैक्षणातून प्रमाणिक विश्वासार्ह आणि शास्त्रशुद्ध आकडेवारी जनगणने मधून प्राप्त होईल. भारत देशामध्ये ओबीसी ची वेगवेगळ्या राज्यात लोकसंख्या 50 ते 70 टक्के आहे. त्यामुळे उद्या देशातील सर्वच निवडणुकीमध्ये ओबीसी जागा झाला तर उलथापालथ निवडणुकीमध्ये व सरकारमध्ये होऊ शकते असे दडपण भाजप आरएसएसच्या विचारधारेच्या सरकारमध्ये असल्यामुळे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात गुपित कारवाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला.

देशांमध्ये तीन हजार पेक्षा जास्त ओबीसी मध्ये जाती असून क्रिमिनल अट रद्द करून ओबीसी अंतर्गत सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासल्यापणाच्या आधारावर वर्गीकरण करून जातीनिहाय जनगणना आर्थिक सर्वेक्षणामध्ये नियमानुसार सर्व बाबी तपासून महाराष्ट्राचे मध्ये जनगणना करण्यात संदर्भात आदेश देण्याची मागणी काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी केली महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली.

प्रा. हरी नरके यांच्या निधनानेपुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गमावला

 प्रा. हरी नरके यांच्या निधनानेपुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गमावला

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि.९:- “महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            “महाराष्ट्राच्या विचार - व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. फुले - शाहू - आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन यांचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास - संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे,” असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


0000


वृत्त क्र. 2687

प्रा. हरी नरके यांच्या निधनानेओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 9 :- "ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालिन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धां

जली वाहिली आहे.


००००


बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणालीआणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे

 बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणालीआणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


 


            मुंबई, दि. ८ : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.


            राज्यातील बालगृहे, विशेष गृहे, खुले निवारा गृह, बालकांसाठी सुरक्षित ठिकाण, अनुरक्षणगृहे याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार श्रीवास्तव, आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव शरद अहिरे, सह आयुक्त राहुल मोरे बैठकीत उपस्थित होते.


            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ज्या संस्थांमध्ये बालकांसंदर्भात गैरप्रकार घडले आहेत अशा संस्थांची नावे काळ्या यादीत टाकण्यात यावीत.


            बालकांसाठी अशासकीय संस्था तसेच शासकीय अनुदानावर सुरू असलेल्या संस्थांच्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कार्यप्रणाली तयार करावी, त्यांची तपासणी करून दर तीन महिन्याला अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. बालकांना चांगल्या प्रतीचे खाद्य मिळावे यासाठी मानक कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा.


            कार्यरत असलेल्या बालगृहांच्या संस्थाद्वारे मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख करण्यावर जास्त भर देण्यात यावा, बालसंगोपन योजनांसंदर्भात जनजागृती करण्याच्या सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.


            तसेच, बालगृहांतील रिक्त जागांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


०००


श्रद्धा मेश्राम/ससं/

नारळी पौर्णिमे दिनी "शेतकरी दिन” साजरा करण्यात येणार

 नारळी पौर्णिमे दिनी "शेतकरी दिन साजरा करण्यात येणार

— पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


            मुंबईदि. ८ : यावर्षी ३० ऑगस्ट२०२३ रोजी म्हणजेच नारळी पोर्णिमा दिनी राज्यात 
शेतकरी दिन साजरा करण्यास येणार आहे.

            पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस "शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून यावर्षी ३० ऑगस्ट२०२३ या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
            शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालयाने निर्गमित करण्यात येणार आहेत. या दिवशी
वेबिनार संवाद / मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या
 www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Featured post

Lakshvedhi