Thursday, 3 August 2023

रस्ते सुरक्षेसाठी जनजागृती अभियान राबवावे

 रस्ते सुरक्षेसाठी जनजागृती अभियान राबवावे

- सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

            मुंबई, दि. 2 : वेगावर नियंत्रण नसणे, नियमांचे पालन न करणे या कारणांमुळे वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतुकीच्या नियमांबाबत अभियान स्तरावर जनजागृती अभियान राबवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या.


            सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या महामार्गावरील वाहतूक वेग नियंत्रण, निर्धारित मार्गिकेची शिस्त तसेच एस.टी. बसस्थानकाची व बसची स्वच्छता, दुरूस्ती इत्यादी संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी अपघात नियंत्रणासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.


            महामार्ग वाहतूकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदींसह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री भुसे म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते सुरक्षेसंदर्भात नुकतीच रस्त्यांची पाहणी करून दिलेल्या सूचनांचे पालन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीस विलंब होत असल्याने ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


            मुंबई-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्गासमवेत इतर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, महामार्गावर थांबे तसेच टोलनाका येथे वाहन चालकांचे प्रबोधन करण्यासाठी अभियान राबविण्यात यावे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण तसेच निर्धारित मार्गिकेची शिस्त पाळण्यासंदर्भात महिनाभर अभियान राबविण्यात यावे. 


            तसेच, वाहनांमध्येच वेगावर नियंत्रण करण्यासाठीची यंत्रणा बसविणे, महामार्गावर पोर्टल लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याबाबत अभ्यास करून आखणी करण्यात यावी. पोलीस प्रशासन, आरटीओ, परिवहन, सार्वजनिक बांधकाम या विभागांनी एकत्रितरित्या समन्वयाने हे अभियान राबवावे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.


            एस.टी.बस थांब्यांची रंगरंगोटी, एसटी बसची डागडुजी आणि बस थांब्यावर सुविधा देण्यासाठीच्या कामास गती द्यावी. किमान ५०० बसथांब्यांची तत्काळ रंगरंगोटी करावी. एसटी तसेच खासगी बस चालकांच्या संघटनांच्या वाहन चालक – वाहकांनाही अपघात नियंत्रणासंदर्भातील प्रशिक्षण द्यावे. महामार्गावर हेल्थ टॅक्रिंग प्रणाली लावण्यात यावी. आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे आणि एसटीच्या नवीन बसेस घेण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देशही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिले.


०००

राज्यातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करीत सुस्थितीत आणावेत

 राज्यातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करीत सुस्थितीत आणावेत

- सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

            मुंबई, दि. 2 : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करीत ते सुस्थितीत आणावेत. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.


            मंत्री श्री. भुसे यांच्या दालनात राज्यातील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणअंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील पथकर नाका, महामार्गावरील खड्डे, मार्गिकेची शिस्त, वेग याबाबत चर्चा, उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंघल (वाहतूक), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी ए. श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, रस्त्यांवरील अपघातात मानवी व वित्त हानी होते. ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित सर्व विभागांनी पुरेशा उपाययोजना कराव्यात. त्यासाठी वाहन चालक, नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी टोलनाक्यांवर सुद्धा जनजागृतीपर उद्घोषणा करण्यात याव्यात. रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असेल, तर वाहन चालकांच्या सजगतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. वाहन चालकांच्या माहितीसाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्यांना रिफलेक्टर्स लावावेत. नादुरुस्त वाहने वेळीच उचलून बाजूला करावीत.


            ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. लेन कटिंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी. त्यासाठी परिवहन विभाग आणि पोलीस दलाची मदत घ्यावी. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच या समितीच्या बैठका नियमितपणे घेवून संबंधित सर्व विभागांनी या बैठकीला हजर राहणे अनिवार्य असल्याचेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार केलेले रस्ते व टोल वसुलीची माहिती सह व्यवस्थापकीय संचालक श्री. यादव यांनी दिली. यावेळी अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर, अपर पोलीस महासंचालक श्री. सिंघल, परिवहन आयुक्त श्री. भीमनवार यांनी विविध सूचना केल्या.

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मप्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवणार

 सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मप्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवणार


गुन्हेगारीच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबणार


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

            मुंबई, दि. 2 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित असून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म निर्माण केला जात असून राज्यात 43 सायबर लॅब सुरु करण्यात येणार आहेत. महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असलेला शक्ती कायदा केंद्राने लवकरात लवकर मंजूर करावा, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. प्रतिबंधात्मक कारवाईंच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला जात आहे. अंमली पदार्थ, अवैध दारु विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबण्याच्या सूचना दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.


            नियम 101 अन्वये झालेली अल्पकालीन चर्चा आणि नियम 293 अन्वये सत्तारुढ आणि विरोधी पक्षांकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सविस्तर आणि तपशीलवार उत्तर दिले.


            ते म्हणाले की, महिलांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांच्या घटना ही नक्कीच गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. अर्थात, महिला आता अन्यायाविरोधात पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. महिलांविषयीच्या संदर्भातील तक्रार आपण तात्काळ प्रथमदर्शनी अहवाल (एफआयआर) म्हणून त्याची दखल घेतो. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांच्या संख्येत महाराष्ट्र हे 12 व्या क्रमांकावर असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            राज्य बाललैंगिक गुन्ह्यांमध्ये राज्य 17 व्या क्रमांकावर आहे. महिलांचे घरातून निघून जाणे, गायब होणे यासारख्या प्रकरणी 72 तासांच्या आत दखल घ्यावी लागते. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. मात्र, अशा प्रकरणांमध्ये परतीचे प्रमाण अधिक आहे. सन 2021 मध्ये अपहरण अथवा गायब होणे या स्वरुपाचे 87 टक्के गुन्हे उघडकीस आले. सन 2022 मध्ये हे प्रमाण 80 टक्के तर यावर्षी हे प्रमाण आतापर्यंत 63 टक्के इतके असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. राष्ट्रीय गुन्हे अभिलेखानुसार देशाच्या सरासरीपेक्षा राज्यात असे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 10 टक्के अधिक असल्याचे ते म्हणाले.


             बेपत्ता अल्पवयीन मुलांचेही परतीचे प्रमाण राज्यात अधिक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात आपण ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम पोलीसांमार्फत राबविली. जवळपास 30-40 हजार मुलांना आपण त्यांच्या घरी पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. त्याची नोंद संसदेनेही घेतल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. राज्याने वार्षिक गुन्ह्यात खून, दरोडे, चोरी, जबरी घरफोडी यामध्ये चालू वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत घट नोंदविल्याची माहितीही त्यांनी दिली.


            गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवायांचे प्रमाण वाढविण्यात आले. यामध्ये तब्बल 32 हजार 602 ने वाढ झाली. तडीपारीच्या 1651, संघटीत गुन्हेगारीच्या 3132, फसवणुकीच्या 1 लाख 66 हजार 428, मोका अंतर्गत 92 प्रकरणे दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे संयुक्त पथकाची स्थापना, मूळ स्त्रोतांपर्यंत जाऊन गुन्हेगारांचा छडा लावण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            सायबर गुन्ह्यात राज्य 5 व्या क्रमांकावर आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आपण 43 ठिकाणी सायबर लॅब सुरु केल्या आहेत. सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सोशल मीडिया, बॅंका, वित्तीय संस्था यांना एकत्रित करुन याप्रकरणातील गुन्ह्यांची लवकर उकल होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. नवनवे बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता बाह्यस्त्रोतांद्वारे संस्थांची मदत घेतली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


            वाळूमाफियांविरुद्ध एकीकडे कडक धोरण अवलंबण्यात येत असून दुसरीकडे सर्वसामान्यांना किफायती दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. राज्यात जातीय-धार्मिक तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलाचा 1960 नंतर पहिल्यांदाच पदांचा नवा आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. राज्यात सध्या 18 हजार पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महिला आणि युवतींच्या सुरक्षेसाठी शाळा/महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथके, महिला सहायता समुपदेशन केंद्र, याशिवाय, पोलीसांच्या डायल 112 क्रमांकावर आता कमी कालावधीत प्रतिसाद अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नक्षलवादाविरोधात गडचिरोली पोलीसांनी केलेले काम अभिनंदनीय आहे. याशिवाय, विविध ठिकाणी पोलीसांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. चांगले उपक्रम सर्व ठिकाणी राबविण्याबाबत पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            महिला पोलीसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात निश्चितपणे कार्यवाही केली जाईल. तसेच पोलीस स्थानकांच्या ठिकाणी असलेल्या महिला पोलीसांसाठीच्या सुविधांबाबतचा अहवाल तयार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


            राज्यात महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. कोणाला पाठिशी घालण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 


‘कुसुम’ योजनेत आता महाराष्ट्र मॉडेल


            शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. सध्या 2 हजार मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले असून 7 हजार मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प निविदास्तरावर आहेत. तर, येत्या 3 वर्षात 17 हजार मेगावॅट वीज सौर प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.


            सध्या राज्यात 100 टक्के फीडर सौर ऊर्जेवर आणण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध आहेत, तर ज्याठिकाणी जागा नाहीत, तेथे स्थानिक शेतकऱ्यांकडून जागा उपलब्ध होत आहेत. सौर उर्जेमुळे प्रतिमेगावॅट दर 2.90 रुपये ते 3.10 रुपये इतका मिळणार आहे. त्यामुळे आपला आर्थिक भार कमी होणार असून उद्योगांवरील भारही काही प्रमाणात कमी होणार आहे. आपल्या राज्याने हे धोरण अवलंबल्यानंतर केंद्राने कुसुम योजनेत बदल करुन महाराष्ट्र मॉडेल स्वीकारले असून इतर राज्यांना तशी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.


            देशात सौर ऊर्जा प्रकरणात काम करणाऱ्या मोठ्या संस्था या योजनेत काम करण्यासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


            सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. वीजेच्या संदर्भातील तक्रारी दूर करुन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.


            या चर्चेत सदस्य सर्वश्री जितेंद्र आव्हाड, नीतेश राणे, वर्षा गायकवाड, यामिनी जाधव, अबू आझमी, अतुल भातखळकर, रवींद्र वायकर, रईस शेख, मनीषा चौधरी, बाळासाहेब थोरात, सुनील प्रभू, अनिल देशमुख, संजय केळकर, बळवंतराव वानखेडे, राजेश टोपे, संग्राम जगताप, रवींद्र धंगेकर, विश्वजित कदम, रोहित पवार आदींनी भाग घेतला.


0000

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थ सहाय्याच्यादृष्टीने

 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थ सहाय्याच्यादृष्टीने

बेदाण्याचा शालेय पोषण आहारातील समावेश पूरक


- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे


            मुंबई, दि. 2 : द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणे निर्मितीही मोठ्या प्रमाणात करतात. शालेय पोषण आहारात बेदाण्यांचा समावेश हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने पूरक ठरणारा असल्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य बबनराव शिंदे यांनी उपस्थित केलेल्या यासंदर्भातील लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.भुमरे बोलत होते.


            मंत्री श्री.भुमरे म्हणाले, राज्यात द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्ष उत्पादनातून अपेक्षित योग्य लाभ मिळण्यासाठी शेतकरी द्राक्षातून बेदाणे निर्मितीही करतात. शालेय पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात एक दिवस बेदाण्यांचा समावेश द्राक्ष शेतकऱ्यांसाठी पूरक ठरणारा आहे.


            प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त रु.१०.०० लाख इतके अनुदान देय आहे. तसेच मुख्यमंत्री कृषि अन्न प्रक्रिया योजनेंतर्गतही बेदाणा प्रक्रिया प्रकल्पासाठी अनुदान देय असून या योजनेंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३० टक्के किंवा जास्तीत जास्त ५० लाख एवढे योजनेतील तरतूदीनुसार अनुदान दोन समान हप्त्यात देय आहे.


            एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेंतर्गत सन २००५-०६ पासून सन २०२२-२३ पर्यंत राज्यात एकूण १८३ शीतगृहांची उभारणी करण्यात आली असून त्यांची एकूण साठवणूक क्षमता ४०९७६३ मे.टन एवढी आहे. त्यामध्ये अतिरिक्त बेदाण्यांची साठवणूक केली जाते. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत आहार शिजविणाऱ्या यंत्रणेमार्फत नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून किमान एक दिवस विद्यार्थ्यांना फळे, सोयाबिस्कीट, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गूळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे इ. स्वरुपात आहार देण्यात येतो. बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहार योजनेत यापूर्वीच करण्यात आला आहे.


0000



मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेअभिव्यक्ती मताची' स्पर्धेचे आयोजन

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेअभिव्यक्ती मताची' स्पर्धेचे आयोजन

वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 2 :- सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.


             या स्पर्धेत जाहिरातनिर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तीनही स्पर्धाचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर स्पर्धाचे विषय असे आहेत : (१) युवा वर्ग आणि मताधिकारी, (२) मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, (३) एका मताचे सामर्थ्य, (४) सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, (५) लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. या स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.


या बक्षिसांचे स्वरूप असे आहे.


            जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक रु. १ लक्ष, दुसरे पारितोषिक रु. ७५ हजार, तिसरे पारितोषिक रु. ५० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १० हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ५० हजार रु., दुसरे पारितोषिक २५ हजार रु. आणि तिसरे पारितोषिक १० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५ हजार रु., दुसरे पारितोषिक १५ हजार रु व तिसरे पारितोषिक १० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५,००० रुपयांची आहेत.


            महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

भटक्या - विमुक्त समाजाच्या अडचणीसोडविण्यासाठी शासन सकारात्मक

 भटक्या - विमुक्त समाजाच्या अडचणीसोडविण्यासाठी शासन सकारात्मक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. 2 : भटक्या व विमुक्त समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भटक्या- विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज विधानभवन येथे झाली.


            बैठकीला इतर मागास व बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा आदी उपस्थित होते.


            यावेळी भटके- विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींमार्फत विविध प्रश्न मांडण्यात आले. यात शैक्षणिक प्रश्न, घरांची उपलब्धता यासह भटके- विमुक्त समाजातील लोककलावंतांच्या अडचणींची माहिती देण्यात आली. महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या लोककला जोपासणाऱ्या लोककलावंताना राज्य शासनाकडून देण्यात येणारे मानधन ५ हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली.


            या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले.


0000



 

Wednesday, 2 August 2023

जेवण झाले की पोट फुगल्यासारखे वाटते? बडीशोपेचा १ उपाय, पचन सुधारते लवकर.....*

 *जेवण झाले की पोट फुगल्यासारखे वाटते? बडीशोपेचा १ उपाय, पचन सुधारते लवकर.....*


आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवणांतर बडीशेप खाण्याची सवय असते. खरंतर बडीशेपमध्ये, अनेक औषधी गुणधर्म असतात. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन - सी चं प्रमाण भरपूर असतं. तसंच यामध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज आढळतात. शरीर निरोगी राहण्यासाठी बडीशेप खाणे आवश्यक असते, कारण बडीशेपमुळे फक्त एक नाहीतर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. बडिशेपमध्ये सुगंध आणि अँटीबॅक्टिरियल गुणधर्म दोन्ही असतात. बडीशेपमध्ये अनेक जीवनसत्त्वांसोबत विविध खनिजे देखील असतात. पोटभर जेवण केल्यानंतर बडीशेप खाल्ल्याने जेवण लगेच पचण्यास मदत होते. 


आजकाल चुकीची जीवनशैली, अयोग्य, आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास जाणवताना दिसतो. काही लोकांना पोटांत गॅस होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. काहीवेळा खूप हेव्ही जेवण झाल्यानंतर आपल्याला करपट ढेकर, पोटात गॅस, पोटदुखी, पोटात जळजळ होणे यांसारख्या विविध समस्या उद्भवतात. मुखवास म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या या बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत हे आपल्यातील अनेकांना कदाचित माहित नसते. जेवणानंतर पोटात गॅस होणे ही एक सर्वसामान्य समस्या आहे. अनेकांना रोज जेवणानंतर पोटात गॅस होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यासाठी आपण आपल्या रोजच्या बडीशेपमध्ये काही खास पदार्थ मिसळून अशी बडीशेप रोज खाल्ल्यास गॅसची ही समस्या लगेच दूर होण्यास मदत होते(Gas And Bloating Troubling You? Try Home Remedy For Gas).


*साहित्य...* 

*१. ओवा - २ टेबलस्पून, 

*२. जिरे - २ टेबलस्पून,

*३. बडीशेप - २ टेबलस्पून,

*४. जवस - २ टेबलस्पून,

*५. काळ मीठ - १ टेबलस्पून.


*कृती...* 

*१. सर्वप्रथम एक पॅन घेऊन त्यामध्ये ओवा, जिरे, बडीशेप, जवस घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर कोरडे भाजून घ्यावेत.


*२. ५ ते ६ मिनिटे हे मिश्रण कोरडे भाजून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात काळं मीठ घालावे.


*३. आता हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे. 


*४. त्यानंतर हे मिश्रण संपूर्ण गार होईपर्यंत तसेच ठेवावे.


*५. ही बडीशेप गार झाल्यावर एका हवाबंद डब्यांत व्यवस्थित भरुन स्टोअर करून ठेवावी. 


जेवण झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित पचन व्हावे, जेवणानंतर पोटात गॅस होऊ नये म्हणून एक चमचा ही बडीशेप जेवणानंतर खावी.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार,*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

Featured post

Lakshvedhi