द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थ सहाय्याच्यादृष्टीने
बेदाण्याचा शालेय पोषण आहारातील समावेश पूरक
- फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे
मुंबई, दि. 2 : द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणे निर्मितीही मोठ्या प्रमाणात करतात. शालेय पोषण आहारात बेदाण्यांचा समावेश हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने पूरक ठरणारा असल्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य बबनराव शिंदे यांनी उपस्थित केलेल्या यासंदर्भातील लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.भुमरे बोलत होते.
मंत्री श्री.भुमरे म्हणाले, राज्यात द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्ष उत्पादनातून अपेक्षित योग्य लाभ मिळण्यासाठी शेतकरी द्राक्षातून बेदाणे निर्मितीही करतात. शालेय पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात एक दिवस बेदाण्यांचा समावेश द्राक्ष शेतकऱ्यांसाठी पूरक ठरणारा आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त रु.१०.०० लाख इतके अनुदान देय आहे. तसेच मुख्यमंत्री कृषि अन्न प्रक्रिया योजनेंतर्गतही बेदाणा प्रक्रिया प्रकल्पासाठी अनुदान देय असून या योजनेंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३० टक्के किंवा जास्तीत जास्त ५० लाख एवढे योजनेतील तरतूदीनुसार अनुदान दोन समान हप्त्यात देय आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेंतर्गत सन २००५-०६ पासून सन २०२२-२३ पर्यंत राज्यात एकूण १८३ शीतगृहांची उभारणी करण्यात आली असून त्यांची एकूण साठवणूक क्षमता ४०९७६३ मे.टन एवढी आहे. त्यामध्ये अतिरिक्त बेदाण्यांची साठवणूक केली जाते. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत आहार शिजविणाऱ्या यंत्रणेमार्फत नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून किमान एक दिवस विद्यार्थ्यांना फळे, सोयाबिस्कीट, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गूळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे इ. स्वरुपात आहार देण्यात येतो. बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहार योजनेत यापूर्वीच करण्यात आला आहे.
0000
No comments:
Post a Comment