Wednesday, 7 June 2023

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्येमहाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्था

 राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्येमहाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्था


        नवी दिल्ली, 6 : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन 2023 चा अहवाल केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी जाहीर केला.


            शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट 850 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय संस्थात्मक रॅकिंगमध्ये महाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.


सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या 11 संस्था


            संस्थात्मक रँकिंगच्या यादीत देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था,मुंबई 30 व्या स्थानावर आहे. पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन या संस्थेस 34 वे स्थान मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (35), रासायनिक तंत्रज्ञान संस्था-मुंबई(41), सिम्बायोसिस इंटरनॅशनल – पुणे (59), डॉ.दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था- वर्धा (75), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठ – पुणे (81), विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- नागपूर (82), नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (88), मुंबई विद्यापीठ – मुंबई (96) 


 विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 10 विद्यापीठे


            देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. होमी भाभा राष्ट्रीय संस्था- मुंबई हे विद्यापीठ रँकिंगमध्ये 17 व्या स्थानावर आहे. पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठास 19 वे स्थान मिळाले आहे, तर रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई ला 23 वी रँकिंग देण्यात आली आहे. सिम्बायोसिस इंटरनॅशनल –पुणे (32), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था –वर्धा (39), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठातील–पुणे (46), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई (47), मुंबई विद्यापीठ –मुंबई (56), भारती विद्यापीठ – पुणे (91), आणि मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस 98 व्या क्रमांकावर आहे.   


संशोधन संस्थांच्या रॅकिंग मध्ये राज्यातील 5 संस्था


            संशोधन संस्थांच्या रँकिंग मध्ये देशातील 50 संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 5 संस्थांचा समावेश आहे. मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे 4 व्या स्थानावर आहे . तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई 10 व्या स्थानावर असून होमी भाभा राष्ट्रीय संस्था – मुंबई 15 व्या , भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे 27व्या आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- मुंबई 37 व्या स्थानावर आहे.   


अभियांत्रिकी संस्थांच्या रँकिंगमध्ये राज्यातील 8 संस्था


            अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 8 संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेला 37 वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 41 वी रँकिंग प्राप्त झाली आहे. डिफेंस इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी-पुणे (57), तर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग- पुणे (73) क्रमांकावर आहे.    


महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये राज्यातील तीन महाविद्यालये


            महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 100 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई येथील कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन 57 व्या स्थानावर आहे . तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) 79 व्या आणि नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था 83 व्या स्थानावर आहे.   


उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 9 व्यवस्थापन संस्था


            देशातील 100 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 9 संस्थांचा समावेश आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई ही संस्था 7 व्या स्थानावर तर मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 10 व्या स्थानावर आहे. सिंबायोसीस इस्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट-पुणे (17), आणि एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई (20) , SVKM नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- मुंबई (21) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – नागपूर (43), के.जे.सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च –मुंबई(45), प्राचार्य एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च –मुंबई (73) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट –पुणे (76)


औषधीय संस्थांमध्ये राज्यातील 18 संस्था


            देशातल्या उत्कृष्ट 100 औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 16 संस्थांचा समावेश आहे. पहिल्या 10 औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पाचव्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज-मुंबई 11 व्या स्थानावर तर पुना कॉलेज ऑफ फार्मसी 29 व्या स्थानावर आहे. एसव्हीकेएम डॉ. भानुबेन नानावटी एज्युकेशन ऑफ फार्मसी –मुंबई(38), डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासीट्युकल सायन्स अँड रिसर्च –पुणे (45, आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मासीटयुकल एज्युकेशन अँड रिसर्च –शिरपूर (50), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ -नागपूर(51), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी –मुंबई (55), श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी –नागपूर (68), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी –नवी मुंबई (79), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी –औरंगाबाद (80), प्रिन्सिपल के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (91), ए.आय.एस.एस.एम.एस. कॉलेज ऑफ फार्मसी-पुणे (93), डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी -पुणे (94), सी.यू.शाह कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (95), आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी- पुणे 96 व्या स्थानावर आहे.


वैद्यकीय महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 2 महाविद्यालय


            वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ 15व्या स्थानावर आहेत तर दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा 25व्या स्थानावर आहे.  


दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 7 महाविद्यालय


            दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सात महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ तिस-या स्थानावर आहे. शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर 15व्या स्थानावर आहे. दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था-वर्धा (17), नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज-मुंबई (19), शासकीय दंत महाविद्यालय-मुंबई (29), पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ –मुंबई (38) आणि भारती विद्यापीठ (डिम्ड युनिव्हर्सिटी) डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल-पुणे 39 व्या स्थानावर आहे.


            देशातील 30 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये राज्यातील पुण्याच्या सिम्बायोसिस विधी माहाविद्यालयाला 6 वे रँकिंग प्राप्त झाले आहे. देशातील 30 सर्वोत्कृष्ट वास्तुकला आणि नियोजन महाविद्यालयांमध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर 12 वा क्रमांक पटकाविला आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रे या श्रेणीमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, फिशरीज युनिव्हर्सिटी-मुंबई 7 व्या क्रमांकावर तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 36व्या क्रमांकावर आहे. तसेच नाविन्य श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई 7 व्या क्रमांकावर आहे.


0000

दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचामुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बुधवारी शुभारंभ

 दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचामुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बुधवारी शुभारंभ


   


            मुंबई, दि. ६ : दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजना थेट दिव्यांगांच्या दारी पोहचविण्यासाठी शासन स्तरावरून दिव्यांग कल्याण विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाचा बुधवार दिनांक ७ जून २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे.


            या कार्यक्रमास सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक (मंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार श्रीमती विद्या ठाकूर उपस्थित राहणार आहेत.


             दिव्यागांचे शिबीर दिनांक ७ जून २०२३ बुधवार रोजी, वेळ सकाळी १०:०० ते ०३:०० स्थळ:- हॉल क्र. ५, नेस्को एक्झीबीशन अॅण्ड ट्रेड सेंटर, गोरेगांव (पूर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.


            मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालये, विविध महामंडळे व इतर संस्था यांच्याकडून दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, रोजगार नोंदणी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्याकरीता त्यांच्या मागण्या घेऊन त्यांच्या सोयीकरिता उपकरणे व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत व त्या मागण्यांची नोंद करुन घेण्यात येणार आहे. दिव्यांगांनी सोबत येताना दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी (UDID) कार्ड व आधार कार्ड घेऊन यावे, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.


****

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

 शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विशेष सुवर्ण आणि रौप्य मुद्रा


काढण्याबाबत विचार व्हावा


- राज्यपाल रमेश बैस


 


            मुंबई, दि. ६ : लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे महानायक होते. महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त सुवर्ण आणि रौप्य मुद्रा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.


            सांस्कृतिक कार्य विभाग आणि राजभवन, महाराष्ट्र यांच्यावतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर,सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपाल महोदयांचे प्रधान सचिव संतोषकुमार, मुंबई परिक्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा दूरदर्शीपणा, न्यायप्रियता, सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि त्यांच्यात नवचेतना जागवणारे राजे होते. स्वतःचे आरमार तयार करून त्यांनी स्वराज्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्रातून विविध नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. त्यांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न व्हावेत तसेच १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळी विशेष सुवर्ण आणि रौप्य पदक काढण्यात आले होते. आता राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त तसे प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले.


विशेष टपाल तिकीट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला वंदन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिट अनावरण हे महाराजांच्या कर्तृत्वाला वंदन आहे. महाराजांनी रयतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी राज्याभिषेक केला. लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा त्यांनी घालून दिलेल्या आदर्श समोर ठेवून राज्य शासन काम करत आहेत. 'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध लाभ देत आहोत. रायगडाचे जतन, संवर्धन करतोय. त्यासोबत शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील गड किल्ल्याच्या जतनासाठी प्राधान्य देत आहे. त्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व करणार असल्याचे ते म्हणाले.


            छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याला किल्ले रायगडावर उपस्थित राहता आले हे भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा, कुशल संघटक, कुशल प्रशासक होते. ते असामान्य युगपुरुष होते. त्यांच्याबरोबर जीवाला जीव देणारे मावळे होते. त्यामुळे त्यांनी इतिहास घडवला, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.


            राज्य शासन सातासमुद्रपार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याचे काम करीत आहे. येत्या वर्षभरात त्यासाठी विविध कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. राज्य शासनाने सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            ते म्हणाले, औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर असे केले. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. कष्टकरी, शेतकरी, महिला या घटकांना मदतीची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. राज्यातील २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली त्यामुळे सहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे काम राज्य शासन करत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्याची वाटचाल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आजच्या दिवशी विशेष टपाल तिकिट निघतेय ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. अनेक जण मुघलांचे मांडलिकत्व पत्करून काम करीत असताना त्याकाळी छत्रपतींनी स्वकियांसाठी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले. 


            ते म्हणाले की, साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यानंतर मराठी माणूस थांबलाच नाही. मराठी साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकवत ठेवण्याचे काम त्याकाळी झाले. छत्रपतींनी बीजारोपण केलेल्या विचारांमुळे आज देशात महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. आपल्याला शक्ती, ऊर्जा देणारे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ‘टॉकिंग बुक’ - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जगातील १९३ देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प दिन या राज्याभिषेक सोहळा वर्षाच्या निमित्ताने आपण केला आहे. आमच्या विभागाने वर्षभरात विविध कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'टॉकिंग बुक ' (Talking book) आपण करत आहोत. देशासह जगाच्या विविध भागात आज राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत.


            छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे, जगदंब तलवार भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, शिवकालीन नाणी संग्राहक प्रवीण मोहिते, इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचा सत्कार करण्यात आला.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. यावेळी श्रीमती पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आज प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीटाची किंमत पाच रुपये इतकी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेका वेळी असलेले सुवर्ण चलन होन हे या टपाल तिकिटावर घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ सहा दिवसात ही टपाल तिकिट प्रकाशित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.


            या विशेष टपाल तिकिट अनावरण कार्यक्रमानंतर शिववंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.


000


दीपक चव्हाण/पवन राठोड/विसंअ


Governor releases postage stamp on 350th year of Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj


 


      Maharashtra Governor Ramesh Bais released a special postage stamp on the occasion of the 350th Year of the Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj at Raj Bhavan, Mumbai on Tue (6 June).


      Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Speaker Rahul Narwekar, Minister of Culture Sudhir Mungantiwar, Ministers Mangal Prabhat Lodha, Deepak Kesarkar and Dadaji Bhuse, Principal Secretary, Culture Vikas Kharge, Postmaster General, Mumbai Region Swati Pandey and senior officers were present.


      A cultural programme 'Shiv Vandana' depicting the life and work of Chhatrapati Shivaji Maharaj and his Coronation Ceremony wa

s presented on the occasion.


००००


फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे

 फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संघर्षनगर, चांदिवली येथे सुपर स्पेशालिटी इस्पितळाचे भूमीपूजन


 


        मुंबई, दि. 6 : नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.


         संघर्षनगर, चांदिवली, साकीनाका येथे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी इस्पितळ आणि क्रीडा संकुलाचा पायाभरणी व भूमीपूजन सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप लांडे, आमदार भरत गोगावले उपस्थित होते.


           मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईत परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यानुसार मुंबई शहराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्याबरोबर मुंबई महनगरपालिकेच्या तिजोरीत ११ हजार कोटींची भर पडली आहे. महाराष्ट्रात पायाभूत सोयी सुविधांचे सर्वाधिक प्रकल्प सुरू आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत.


          महाराष्ट्रात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक होत आहे. त्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. संघर्ष नगर परिसरात मूलभूत सोयीसुविधा पुरवून ते सुंदर नगर करण्यात येईल. राज्य सरकार सर्व सामान्य जनतेचे हे सरकार असून त्यांच्यासाठी आतापर्यंत विविध निर्णय घेतले आहेत. असाल्फा व्हीलेज येथील ४८ कुटुंबांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            आमदार श्री. लांडे म्हणाले की, चांदिवली परिसराचा विकास घडवून आणणार आहे. शिधा वितरण कार्यालय लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील रस्त्यांचा विकास केला आहे. नागरी सेवा- सुविधा पुरविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. गरिबांच्या घरांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हिंदी भाषिकांसाठी शाळा सुरू केली. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी इस्पितळासाठी केंद्र सरकारची परवानगी आणून दिली, असेही त्यांनी सांगितले.


             यावेळी नंदेश उमप व सहकाऱ्यांनी नंदेश रजनी हा कार्यक्रम सादर केला. यावेळी लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


०००००

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; तर डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे

 रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; तर डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती


डॉ. संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु


 


            मुंबई, दि. ६ : डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


            राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी व डॉ. सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.


            राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.   


            डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.


००००


 


Dr Ravindra Kulkarni to be new Vice Chancellor of University of Mumbai ; Dr Suresh Gosavi to be VC of SPPU


Dr Sanjay Bhave appointed as Vice Chancellor of Konkan Krishi Vidyapith


 


            Dr Ravindra Dattatray Kulkarni has been appointed as the Vice-Chancellor of the University of Mumbai; while Dr. Suresh Wamangir Gosavi has been appointed as the Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University.


            Maharashtra Governor and Chancellor of public universities in the State Ramesh Bais announced the appointment of Dr Ravindra Kulkarni and Dr Suresh Gosavi.


The Governor has also declared the appointment of Dr. Sanjay Ghanshyam Bhave as the new Vice-Chancellor of Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli.


            Dr Ravindra Kulkarni is a Senior Professor at Institute of Chemical Technology while Dr Suresh Gosavi is a Senior Professor at the Department of Physics, Savitribai Phule Pune University.


            Dr. Sanjay Bhave is the Head of Department of Agricultural Botany at Dr. Balasaheb Sawant 

Konkan Krishi Vidyapeeth.


0000


कायम रात्रीच का येतो दम्याचा अटॅक? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय.....*

 *कायम रात्रीच का येतो दम्याचा अटॅक? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय.....*


दमा (Asthama) हा श्वसनाचा आजार आहे. यामध्ये श्वसननलिकेला सूज येते. त्यामुळे श्वास घेण्यात अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे त्याला दमा असंही म्हटलं जातं. जगभरातील मोठ्या संख्येने लोक दम्याच्या आजारानं त्रस्त आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांना मध्यरात्री दम्याचा अटॅक येतो. रात्री दम्याचा अटॅक येण्यास कारणीभूत घटकांपैकी एक म्हणजे सर्कॅडियन रिदम. हे रात्रीच्या वेळी हार्मोन्सच्या पातळीत कमी झाल्यामुळे होते.


दम्याचा त्रास अचानक कधीही होऊ शकतो. काही लक्षणांसह दीर्घकाळापर्यंत अनेकदा या आजाराचे संकेतही मिळतात. परंतु त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. बोलण्यात अडचण येणे आणि नीट झोप न येणे हा देखील दम्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे. अशी लक्षणे दिसू लागल्यावर, आपण आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे सुरू केलं पाहिजे.


*यापासून कसा बचाव केला पाहिजे...?*

तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ज्यांना याचा त्रास होतो त्यांनी आपली औषधं वेळेवर घेतली पाहिजेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी असे काही उपाय करावेत, ज्यामुळे दम्याचा अटॅक टाळता येतो. रात्रीच्या वेळी दम्याचा अटॅक येऊ नये म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमची खोली स्वच्छ ठेवावी. पंख्यांची पाती आणि कपाटांचा वरचा भाग देखील स्वच्छ ठेवा. बेडरुममधील धुळीचे कण कमी करण्यासाठी गादी आणि उशांवर कव्हर घालणे हा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. डॉक्टर म्हणतात की जर तुम्हाला सायनसचा त्रास होत असेल तर कधीही सरळ स्थितीत झोपू नका. यामुळे पोस्टनेसल ड्रिप वाढू शकते. ज्यामुळे दम्याचा झटका येऊ शकतो. झोपताना मऊ उशी डोक्याखाली घेऊन डोके थोडे वर ठेवा.


*उपाय काय कराल...*


दम्याचा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपायही करता येतात. यासाठी लेमनग्रास खूप फायदेशीर मानले गेले आहे. त्यात अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्यात व्हिटॅमिन सी असते. हे पोषक तत्त्व वायुमार्गाची जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. लेमनग्रासचे सेवन दम्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे.


*ओवा...*

ओव्याचा वापर भजी सारख्या डिशेस बनवण्यासाठी मोठ्या प्रामाणात केला जातो. ओवा हा दम्यासाठी फायदेशीर मानला जातो. ओवा भाजून खाल्ल्यानं श्वसननलिकेची सूज कमी होते.


*आलं...*

आल्यातही अनेक औषधी गुणधर्म सापडतात. यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म दम्याच्या त्रासासाठी उपयुक्त आहेत. आल्याचा काढा किंवा चहासारख्या गोष्टींनी दम्याचा त्रास कमी होऊ शकतो.


*लसूण...*

लसणात असलेले गुणधर्म फुफ्फुस मजबूत करण्यासाठी वापरले जातात. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाल्ल्याने दम्यामध्ये आराम मिळतो.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Tuesday, 6 June 2023

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्यांचा वर्धापन दिन

 महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्यांचा वर्धापन दिन


महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे त्रिभाजन होऊन दि. ६ जून २००५ मध्ये तीन कंपन्या स्थापन झाल्या. यामध्ये महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या कंपन्यांची सुरुवात झाली. आज या तिन्ही कंपन्यांचा वर्धापन दिवस आहे.


महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या कंपन्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात चांगलं काम करत आहेत. देशातील सर्व शहरात, गावात व खेड्यातल्या वस्तीत वीज पोहोचली पाहिजे; प्रत्येकाच्या घरात विकासाचा प्रकाश पोहोचला पाहिजे, या ध्येयाने या तिन्ही कंपन्या कार्यरत आहेत.


देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मुंबईजवळील घारापुरी बेटावर वीज नेण्याचा उपक्रम केला गेला. घारापुरी बेटावर हजारहून अधिक कुटुंबे गेली ७० वर्षे दिवाबत्तीवरच आपलं जीवन जगत होती. त्यांच्या आयुष्यात यामुळे नवा प्रकाश पडला.


समुद्र तळातून केबल टाकून वीज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. न्हावाशेवा बंदरातून विजेची केबल समुद्राखालून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावर पोहोचवण्यात आली. त्यामुळे दरवर्षी १४ लाखांहून अधिक पर्यटक येणाऱ्या या बेटावर पर्यटनालाही यानिमित्ताने चालना मिळाली.


देशातील कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात, डोंगराळ भागातही वीज पोहोचविण्याचे काम या कंपन्यांनी केले आहे. सर्वांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा झाला पाहिजे, यासाठी उर्जा विभाग नेहमी प्रयत्नरत असतो. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कुसूम योजना कार्यान्वित केली आहे. सौरऊर्जेसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.


महापारेषणच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे अतिशय वेगाने सुरू असून ती प्रगतिपथावर आहेत. जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई देण्यासाठी सुधारित वहिवाटीचा रस्ता (RoW) धोरण दि. २ नोव्हेंबर २०२२ पासून व त्यासाठीचा सविस्तर निर्णय १ डिसेंबर २०२२ रोजी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे.


पॉवरग्रीड तसेच देशातील इतर राज्य पारेषण उपक्रमांचा दर तसेच पध्दतीचा अभ्यास करून सुधारित दरपत्रक दि. १६ सप्टेंबर २०२२ मध्ये महापारेषणने जारी केले आहे. महापारेषणच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपविभाग स्तरापासून सांघिक कार्यालय स्तरापर्यंत पुरस्कार योजना सुरू केली आहे.


विजेच्या माध्यमातून सर्वांच्या घरी आनंदाचा, विकासाचा प्रकाश पडावा, अशी वर्धापनदिनानिमित्त महापारेषण, महानिर्मिती व महावितरण या तिन्हीही कंपन्यांना 

शुभेच्छा.


***


Featured post

Lakshvedhi