Tuesday, 6 June 2023

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्यांचा वर्धापन दिन

 महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्यांचा वर्धापन दिन


महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे त्रिभाजन होऊन दि. ६ जून २००५ मध्ये तीन कंपन्या स्थापन झाल्या. यामध्ये महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या कंपन्यांची सुरुवात झाली. आज या तिन्ही कंपन्यांचा वर्धापन दिवस आहे.


महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या कंपन्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात चांगलं काम करत आहेत. देशातील सर्व शहरात, गावात व खेड्यातल्या वस्तीत वीज पोहोचली पाहिजे; प्रत्येकाच्या घरात विकासाचा प्रकाश पोहोचला पाहिजे, या ध्येयाने या तिन्ही कंपन्या कार्यरत आहेत.


देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मुंबईजवळील घारापुरी बेटावर वीज नेण्याचा उपक्रम केला गेला. घारापुरी बेटावर हजारहून अधिक कुटुंबे गेली ७० वर्षे दिवाबत्तीवरच आपलं जीवन जगत होती. त्यांच्या आयुष्यात यामुळे नवा प्रकाश पडला.


समुद्र तळातून केबल टाकून वीज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. न्हावाशेवा बंदरातून विजेची केबल समुद्राखालून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावर पोहोचवण्यात आली. त्यामुळे दरवर्षी १४ लाखांहून अधिक पर्यटक येणाऱ्या या बेटावर पर्यटनालाही यानिमित्ताने चालना मिळाली.


देशातील कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात, डोंगराळ भागातही वीज पोहोचविण्याचे काम या कंपन्यांनी केले आहे. सर्वांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा झाला पाहिजे, यासाठी उर्जा विभाग नेहमी प्रयत्नरत असतो. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कुसूम योजना कार्यान्वित केली आहे. सौरऊर्जेसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.


महापारेषणच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे अतिशय वेगाने सुरू असून ती प्रगतिपथावर आहेत. जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई देण्यासाठी सुधारित वहिवाटीचा रस्ता (RoW) धोरण दि. २ नोव्हेंबर २०२२ पासून व त्यासाठीचा सविस्तर निर्णय १ डिसेंबर २०२२ रोजी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे.


पॉवरग्रीड तसेच देशातील इतर राज्य पारेषण उपक्रमांचा दर तसेच पध्दतीचा अभ्यास करून सुधारित दरपत्रक दि. १६ सप्टेंबर २०२२ मध्ये महापारेषणने जारी केले आहे. महापारेषणच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपविभाग स्तरापासून सांघिक कार्यालय स्तरापर्यंत पुरस्कार योजना सुरू केली आहे.


विजेच्या माध्यमातून सर्वांच्या घरी आनंदाचा, विकासाचा प्रकाश पडावा, अशी वर्धापनदिनानिमित्त महापारेषण, महानिर्मिती व महावितरण या तिन्हीही कंपन्यांना 

शुभेच्छा.


***


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi