Thursday, 11 May 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका,

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका,

शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

 

            लातूरदि. 10 (जिमाका) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाघडीपत्रिका आणि मनरेगा योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळावरील कक्षात करण्यात आले.

            लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजनमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलवन मंत्री सुधीर मुनगंटीवारबंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यावेळी उपस्थित होते.

            राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाची माहिती देणारी भित्तीपत्रिकाघडीपत्रिका लातूर जिल्हा परिषदेने तयार केली असून त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. तसेच मनरेगा योजनेवर आधारित रवींद्र इंगोले लिखित माझा गाव माझी जबाबदारीमी समृद्ध तर गाव समृद्ध’ या माहितीपुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

*****

औसा येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श लोकप्रतिनिधींनी घ्यावा

 औसा येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श लोकप्रतिनिधींनी घ्यावा.




- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


• आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 25 जोडप्यांचा सामुदायिक विवाह


• आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून आयोजन


            लातूर, दि. 10, (जिमाका) : आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून एक आदर्श विवाह सोहळा आज औसा येथे होत आहे. आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 25 जोडप्यांचा विवाह अत्यंत भव्यदिव्य करून आदर्श निर्माण केला आहे. इतर लोकप्रतिनिधींनी आ. पवार यांचा आदर्श घेतल्यास सर्वसामान्य कुटुंबातील विवाह सोहळे दिमाखात होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आमदार अभिमन्यू पवार आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे कौतुक करून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.


            आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशनने औसा येथील उटगे मैदानावर आयोजित केलेल्या औसा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, कष्टकरी व आर्थिक दुर्बल कुटुंबातील 25 जोडप्यांच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. आ. अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अ‍ॅड. परिक्षीत व डॉ. उदय मोहिते पाटील यांची कन्या डॉ. चैताली यांचा विवाह याच सामुदायिक विवाह सोहळ्यात पार पडला.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खनिकर्म व बंदरे विभागाचे मंत्री दादा भुसे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री, लोकसभा सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य, गहिनीनाथ महाराज औसेकर यावेळी उपस्थित होते.


            आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न दिमाखात व्हावे, हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, कष्टकरी कुटुंबातील 25 जोडप्यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा घडवून आणून हे स्वप्न साकार केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.


            आपल्या मुलाला जे कपडे तेच कपडे सामुदायिक विवाह सोहळ्यातील 25 वरांना, यासह सर्व गोष्टी सारख्या करून आमदार अभिमन्यू पवार यांनी अत्यंत चांगला पायंडा पाडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपले कुटुंब समजून आ. पवार यांनी 25 मुलींचे कन्यादान केले. आहेर केले, संसार उपयोगी वस्तू दिल्या. आपल्या आनंदात इतरांचा आनंद बघणारे आ. पवार म्हणूनच वेगळे आहेत. हा लग्नसोहळा अत्यंत सुनियोजित, दिमाखदार होत असून हा या 25 कुटुंबांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा क्षण असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.


            विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावेळी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. लातूर जिल्ह्याच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. आमदार अभिमन्यू पवार यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामागील संकल्पना सांगताना, हा सर्व विवाह सोहळा घडवून आणण्यात कार्यकर्ते, स्नेही यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.


****

*


गुलकंदाचे हे ६ फायदे, आरोग्य आणि सौंदर्यही!*

 *गुलकंदाचे हे ६ फायदे, आरोग्य आणि सौंदर्यही!* 


                   उन्हाळा आला की ‘अन्न, वस्त्र, निवारा’ यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते, ती म्हणजे थंडावा! थंड गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. थोडक्यात काय, तर थंडावा मिळवण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते सगळे करायचे प्रयत्न सुरु असतात. या सगळ्या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ अनेकदा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे गुलकंद!

                  गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या प्रेमात जसा गोडवा असतो, तसाच गोडवा गुलाब पाकळ्यांपासून बनलेल्या गुलकंदातही असतो.


 *१. थंडावा मिळण्यासाठी उत्तम पर्याय* 

                     शरीर थंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी गुलकंदात असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद खाणं कधीही चांगलंच ठरतं. कमी करण्याची क्षमता असणारे गुलकंद, थकवा, अंगदुखी, खाज अशा उन्हाळ्यातील त्रासांवर गुणकारी ठरते. याशिवाय अतिउष्णतेमुळे स्ट्रोकचा धोका संभवतो. अशावेळी गुलकंद सुद्धा कांद्याइतकंच गुणकारी ठरतं. चवीला उत्तम असल्याने, कांद्याचा पर्याय म्हणून गुलकंदाचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.


 *२. बद्धकोष्ठतेवर गुणकारी* 

                      हालचाल कमी झालेल्या हल्लीच्या जीवनात बद्धकोष्ठ हा सामान्य आजार होऊ लागला आहे. त्यातच वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे, ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडणे सुद्धा बंद झालंय. अशावेळी, गुलकंद खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोटातून बाहेर पडत असलेलं मल, फार घट्ट राहू नये यासाठी गुलकंद उपयोगी आहे. मल योग्य प्रमाणात नरम होण्यास आणि मलविसर्जन चांगल्यारितीने होण्यास गुलकंदाचे सेवन उपयोगी ठरते.


 *३. अल्सरवर गुणकारी* 

                    शरीरातील अति उष्णतेचा परिणाम म्हणून तोंडाचा अल्सर होणं, हा त्रास सुद्धा अनेकांना होतो. उष्णतेवर रामबाण उपाय ठरणारा गुलकंद तोंडाच्या असल्सवर सुद्धा गुणकारी ठरतो. तसेच गुलकंद आम्लपित्त नियंत्रणासाठी सुद्धा उपयुक्त आहे. दोन जेवणांच्या मधल्या वेळात अर्धा चमचा गुलकंदाचे सेवन आम्ल्पित्ताचे नियंत्रण करते असा उल्लेख आयुर्वेदातही केला आढळतो.


 *४. मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी करते* 

                   मासिक पाळीदरम्यानचा रक्तस्राव कमी करण्यासाठी गुलकंद खाणे फायदेशीर आहे. स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या स्नायूंवरीला तणाव कमी करण्यास गुलकंद मदत करते, हे वैद्यकीय शास्त्रानुसार सिद्ध करण्यात आले आहे.


 *५ . जळजळ कमी होणे* 

                   अति उष्णतेमुळे होणारी त्वचेची जळजळ नियंत्रणात आणण्यासाठी गुलकंदाचे सेवन मदत करते. म्हणजेच त्वचा तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी गुलकंद खाणे उत्तम!


 *६. शांत झोप लागण्यासाठी* 

                    चांगली झोप लागायला हवी असेल, तर रात्रीच्या वेळी गुलकंद घातलेलं दूध पिणं कधीही चांगलं. दूध आणि गुलकंद हे दोन्ही पदार्थ उष्णतेवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळेच दिवसभराचा थकवा, ताणतणाव दूर ठेवण्यासाठी हे पेय उपयोगी आहे. मनाला आणि शरीराला मिळालेल्या या शांततेमुळे, रात्री उत्तम झोप लागणं शक्य होतं.


 *Nutritionist & Dietitian* 

 *Naturopathist* 

 *Dr. Amit Bhorkar* 



 🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

Wednesday, 10 May 2023

अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसींसाठींच्याशैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता ठेवावी

 अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसींसाठींच्याशैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता ठेवावी


- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. 10 : अनुसूचित जाती, जमाती,ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन खूप सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या चारही संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता असावी आणि विद्यार्थ्यांना समान लाभ देण्यासाठी या चारही संस्थांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.


            आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीआय या शासकीय संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.


            यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, नियोजनचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव व्यय ओ.पी.गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सारथीचे चेअरमन अजित निंबाळकर, टीआरटीआयचे आयुक्त राजेंद्र भारुड, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी),आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), या संस्थांकडून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती, नियमावली एकसूत्रता राहावी यासाठी आज यामध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी या चारही संस्थाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये वसतिगृह योजना, परदेशी शिक्षणासाठी राबविण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना आणि पीएचडीसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समान लाभ कसा देता येईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.


            सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटीआय या चारही संस्थांनी शैक्षणिक योजनांचा समान लाभ विद्यार्थ्यांना देण्यासाठी निकष, शैक्षणिक अर्हता, देण्यात येणाऱ्या लाभाची मर्यादा इत्यादीबाबींचा समावेश असणारा सर्वकष असा प्रस्ताव तयार करून विभागास सादर करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


0000

अंधेरी पूर्व येथे कंटेनर अंगणवाडीसाठी निधीची तरतूद करावी

 अंधेरी पूर्व येथे कंटेनर अंगणवाडीसाठी निधीची तरतूद करावी


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात ८६ तक्रारींचे निराकरण


 


               मुंबई, दि. 10 : अंधेरी पूर्व येथे कंटेनर अंगणवाडी साठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. 


            अंधेरी येथील मुंबई महापालिकेच्या के पूर्व वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले, अंधेरी पूर्व एमआयडीसी येथे जागा उपलब्ध नसल्यामुळे गणपती मंदिरात अंगणवाडी सुरू केली आहे अशी महिलांनी तक्रार केली असून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी तत्काळ जिल्हा नियोजन समितीमधून कंटेनर अंगणवाडीसाठी निधीची तरतूद करावी. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात ५०० तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच ८६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.


            यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.      


            कांदिवली येथील आर दक्षिण वॉर्ड येथे दिनांक 11 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजता सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.


****



रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे

 रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे.


आढावा बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना


            मुंबई, दि. 10 : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे; यानिमित्त २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. संपूर्ण जगातील लोक या सोहळ्याकडे कुतुहलाने बघत असून राज्य शासन करत असलेल्या तयारीत शिवप्रेमींना सोबत घेऊन हा सोहळा भव्यदिव्य आणि देखणा व्हावा यासाठी शिस्तबद्ध तयारी करावी, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.


            श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार भारत गोगावले, महेंद्र थोरवे, गोपीचंद पडळकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, चित्रपट महामंडळाचे व्यवस्थपकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांच्यासह रायगडावर दरवर्षी हा सोहळा आयोजित करणारे शिवप्रेमी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


            यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कार्यक्रमाच्या संदर्भात एका समितीची स्थापना करण्यात यावी या समितीमध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी असावेत. समिती तयार केल्यानंतर समितीची उपसमिती तयार करुन जबाबदाऱ्या निश्चित करण्यात याव्यात. कामाचे योग्य पद्धतीने वाटप करुन पूर्ण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या.


            हवामान खात्याच्या माध्यमातून ०१ ते ०७ जूनपर्यंत हवामानाबद्दल माहिती घेऊन तसे नियोजन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आवश्यक असल्यास गडावर बॅटरी ऑपरेटेड वाहने, समाधीची उत्कृष्ठ सजावट, आरोग्यविषयक सर्व सोयी-सुविधा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता योग्य प्रमाणात करावी, अशा सूचना दिल्या.


            प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा सोहळा कसा असेल याचे सादरीकरण केले. राज्याभिषेक करण्यासाठी १००८ जल कलश पूजनाचे आणि रथाचे नियोजन या बाबत देखील बैठकीत चर्चा झाली.


००००

मुंबईतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’

 मुंबईतील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’


- पालकमंत्री दीपक केसरकर


            मुंबई दि. 10 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मधील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या फेरीवाले, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच गटारांची स्वच्छता, घरातील स्वच्छतागृहे आदी समस्या तातडीने सोडविल्या जाणार आहेत. रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या दारी आले असून रहिवाशांना आता यासाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, या शब्दात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना आश्वस्त केले. रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देऊन रहिवाशांना आपल्या समस्यांचा पाठपुरावा मंत्री कार्यालयात देखील करता येईल, असेही त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री. केसरकर यांनी 'सरकार आपल्या दारी', 'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी वॉर्ड मधील नागरिकांशी आज संवाद साधला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रभारी जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, सर्व संबंधित विभागांचे शासकीय, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी स्थानिक रहिवाश्यांनी आपल्या समस्या मांडल्या.


मुंबईला गत वैभव प्राप्त करून देणार


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई अधिक चांगली व्हावी म्हणून कटाक्ष आहे. या अनुषंगाने मुंबईतील समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबईतील तरूण शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. त्याचबरोबर महिला, बालक यांच्यासह सर्व नागरिकांना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून मुंबईला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.


            श्री. केसरकर म्हणाले, मुंबई हे विविध वैशिष्ट्यांनी नटलेले जागतिक दर्जाचे शहर आहे. येथे मंदिरे, चर्च, मशिदीही आहेत. येथील मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली, बाणगंगा आदी परिसरांचे सुशोभीकरण करण्याबरोबरच या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याचप्रमाणे कोळीवाड्यांचा विकास करून तेथे फूड प्लाझा उभारण्याचे नियोजन आहे. नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देताना सार्वजनिक स्वच्छतागृहे नव्याने बांधण्यात येतील. मुंबईत अंमली पदार्थाविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असल्याने विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण थांबले असल्याचे सांगून या मोहिमेत पोलिसांसह शिक्षकांनीही सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. मुंबईत महिला आणि तरूणांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणे यावरही शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी वॉर्ड मध्ये अधिक प्रमाणात घाऊक व्यापार चालतो. यामुळे येथे वाहतुकीची समस्या असल्याने मुंबईत दोन मोठे वाहनतळ उभारण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई करून पादचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.


            या सुसंवाद कार्यक्रमात १७६ रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिले.


0

Featured post

Lakshvedhi