सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 24 March 2023
दुसऱ्या चे भले करा
🌿🌹दुसऱ्या चे भले करा🌹🌿
*एकदा श्री कृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले. वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला. अर्जुनाला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला सुवर्णमुद्रांनी भरलेले एक पोते दिले.*
*या अचानक धनलाभाने तो माणूस अतिशय प्रसन्न झाला. मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. पण त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. वाटेत चोरांनी त्याला अडवले आणि सुवर्णमुद्रांनी भरलेले ते पोते चोरून घेऊन गेले.*
*तो माणूस दुःखी मनाने आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.*
*अर्जुनाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.*
*सर्व हकिकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्याची दया आली. आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिले. ते घेवून तो घरी पोहोचला. त्याच्या घरात एक जुने मडके होते. त्याचा वापर गेल्या कित्येक दिवसात झाला नव्हता. चोरीच्या भीतीने त्याने ते माणिक त्या मडक्यात लपवून ठेवले.*
*अजूनही त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. दमल्यामुळे त्याला गाढ झोप लागली. त्याच वेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. वाटेत धक्का लागून तिचे मडके पडून फुटले.*
*तिने विचार करुन घरी असलेले जुने मडके घेऊन पाणी भरायला नदीवर गेली. मडके स्वच्छ धुऊन चांगले पाणी भरून घरी आली. माणिक पाण्यात पडले.*
*माणसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला.*
*चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.*
*अर्जुन आणि श्री कृष्णाला जेव्हा तो भीक मागतांना दिसला तेंव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.*
*सर्व हकिकत ऐकल्यानंतर त्यांना वाटले की यांच्या नशिबात सुख नाही आहे. आपण काही तरी करुया की जेणे करुन हा यातून बाहेर पडेल.*
*आता यापुढे देवाची कृपा सुरु झाली. श्रीकृष्णाने त्या माणसाला दानात फक्त दोन रुपये दिले.*
*अर्जुन म्हणाला "प्रभू मी दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक या माणसाचे दारिद्रय घालवू शकले नाही तर या दोन रुपयांनी काय होणार?"*
*हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मागावर जायला सांगितले.*
*तो माणूस चालता चालता विचार करू लागला की दोन रुपयात धड एका माणसाचे जेवण पण होत नाही आणि देवाने असे कसे केले? ही देवाची कसली कृपा?*
*चालत असतांना त्याची नजर एका मासे मा-यावर गेली. त्याच्या जाळ्यात एक छोटा मासा तडफडत होता. माणसाने* *विचार केला की दोन रूपयात आपले पोट भरणार नाही पण या माश्याचा जीव वाचू शकतो.*
*सौदा करुन त्याने दोन रूपयांना तो मासा विकत घेतला. त्याला आपल्या कमंडलूत घेतले. त्यात पाणी भरले आणि त्याला नदीत सोडायला निघाला.*
*प्रभूची लीला पाहा.... माश्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले. निर्धन माणसाने ते पाहिले तर काय आश्चर्य, माश्याने गिळलेला तोच माणिक होता तो की जो त्याने मडक्यात ठेवला होता.*
*तो माणूस अत्यानंदाने ओरडू लागला "सापडला, सापडला"*
*नेमका त्याबाजूने तो चोर चालला होता ज्याने याच्या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या.*
*त्याने माणसाला "सापडला सापडला" असे ओरडताना पाहिले. चोर घाबरला.* *चोराने विचार केला की याने मला ओळखले आहे आणि आता हा राजाकडे माझी तक्रार करील. घाबरुन त्याने चोरलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमा मागू लागला.*
*हे पाहाताच अर्जुनाने श्रीकृष्णाला नमस्कार केला. अर्जुन म्हणाला "जे काम पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान* *माणिक करू शकले नाही ते आपल्या दोन रुपयांनी करुन दाखवले"*
*श्रीकृष्ण म्हणाले “अर्जुना हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जेंव्हा तू पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्याला दिलेस तेंव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला पण दोन रुपये दिल्यानंतर त्याने दुस-याचा विचार केला. म्हणून जेंव्हा आपण दुस-याच्या दुःखाचा विचार करतो, दुस-याचे भले करतो तेंव्हा आपण देवाचे काम करतो. आणि तेंव्हा देव आपल्या सोबत असतो".*
*तात्पर्यः*
*"दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते; परंतु दान देण्याने जे सुख प्राप्त होते ते जीवनभर पुरत असते".*🌹🌿🌾
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानेघेतलेल्या प्रश्नमंजुषेला भरघोस प्रतिसाद.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानेघेतलेल्या प्रश्नमंजुषेला भरघोस प्रतिसाद.
मुंबई, दि. 23 : यंदाच्या महिला दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. या प्रश्नमंजूषेत स्त्री (२४४८), पुरुष (२३४९) आणि पारलिंगी (Transgender) (१७) यांनी सहभाग घेतला, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
ऑनलाईन घेतलेल्या या प्रश्नमंजूषेत स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांनी विवाहानंतर नाव बदलावे की नाही, पारलिंगी महिला (Transwoman), पारलिंगी पुरुष (Transman) या घटकासंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते.
या प्रश्नमंजुषेनुसार, समाजात स्त्री-पुरुष समानता येण्यासाठी पुरुषांनी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे ९५ टक्के स्त्री-पुरुषांनी, तर ८२ टक्के पारलिंगीं व्यक्तींना वाटते. तर पुरुषांना बदलण्याची गरज नाही असे पाच टक्के स्त्री-पुरुषांनी आणि १८ टक्के पारलिंगिंनी म्हटले आहे. विवाहानंतर स्त्रीने स्वतःचे नाव आणि आडनाव बदलावे, असे ६५ टक्के स्त्रियांना आणि ५१ टक्के पुरुषांना, आणि ५३ टक्के पारलिंगी व्यक्तींना वाटते.
विवाहानंतर नाव बदललेल्या स्त्रियांनी मतदार यादीतही आपले नाव बदलले आहे, असे ७५ टक्के स्त्रियांनी म्हटले आहे, तर विवाहानंतर नाव बदललेल्या कुटुंबातल्या स्त्रियांची मतदार यादीतही नावे बदलली आहेत, असे ७८ टक्के पुरुषांनी आणि ७७ टक्के पारलिंगी व्यक्तींनी म्हटले आहे.
पारलिंगी महिला (Transwoman) व पारलिंगी पुरुष (Transman) यांच्याविषयी माहिती असल्याचे ७३ टक्के स्त्रियांनी, ७८ टक्के पुरुषांनी आणि विशेष म्हणजे ७१ टक्के पारलिंगी व्यक्तींनी म्हटले आहे, तर पारलिंगी महिला व पारलिंगी पुरुष यांच्याविषयी माहीत नसल्याचे २७ टक्के स्त्रियांनी, २२ टक्के पुरुषांनी आणि २९ टक्के पारलिंगींनी म्हटले आहे, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी दिली आहे.
000
मेडीगड्डा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लकभूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार
मेडीगड्डा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लकभूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार
- मंत्री दादाजी भुसे.
मुंबई, दि. 23 : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तेलंगणा सीमावर्ती भागात गोदावरी नदीवर मेडीगड्डा प्रकल्प तेलंगणा सरकारने उभारला आहे. या प्रकल्पातील महाराष्ट्र हद्दीतील बुडीत क्षेत्रातील भूसंपादन शिल्लक असलेल्या क्षेत्राबाबत शेतकरी आणि दोन्ही राज्यांचे सरकार यांच्यामध्ये आपसमजुतीने दर निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
विधानपरिषदेत सदस्य रामदास आंबटकर यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती.
मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गोदावरी नदी पात्रातील बुडीत क्षेत्रातील 235 हे. आर.जमीन थेट खरेदीने ताब्यात घेतल्या आहेत. सद्य:स्थितीत भूसंपादन अधिनियमानुसार प्रक्रिया सुरु होऊन ती अंतिम टप्प्यात आहे. तसेच उर्वरित 128 हेक्टर करीता भूधारकांस वाजवी व न्याय मोबदला देण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी तेलंगणा सरकारला कळविण्यात आले आहे. या संदर्भात योग्य तो समन्वय जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्यामार्फत केला जात आहे. या संदर्भात एक आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.
मेडीगड्डा बॅरेजच्या वरील भागात मुगापूर गावापर्यंत 11.3 किमी लांबीची संरक्षक भींत बांधण्यात आली आहे. तसेच बॅरेजच्या खालील भागात जमीन खरडून जाण्याचा प्रकार होत असल्यामुळे बॅरेजच्या खालील बाजूस संरक्षक भिंत बांधण्याबाबत जलसंपदा विभागाकडून उचित कार्यवाही करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.
नवी मुंबईतील सुधारित विकास योजनेत नेरूळ स्थानकाजवळीलवाहनतळाच्या समस्येवर उपाययोजना करणार
नवी मुंबईतील सुधारित विकास योजनेत नेरूळ स्थानकाजवळीलवाहनतळाच्या समस्येवर उपाययोजना करणार
-मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २३ : नवी मुंबईतील सुधारित विकास योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा आराखडा अंतिम करताना नेरूळ स्थानकाजवळ असणाऱ्या वाहनतळाच्या समस्येवर उपाय योजना करण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री.सामंत म्हणाले, नवी मुंबई येथे सिडकोची विकास योजना १ मार्च १९८० पासून अमलात आहे. त्यावेळी लोकसंख्या तीन लाख होती. आता लोकसंख्या सुमारे १६ लाख इतकी आहे. ही योजना सुधारित करणे आवश्यक असल्याने प्रारूप विकास योजना तयार करून सूचना व हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केलेली आहे. ही योजना अंतिम करताना नेरूळ स्थानकाजवळील वाहनतळाची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नदीलगतच्या गावामध्ये संरक्षक भींत बांधण्यात येणार
नदीलगतच्या गावामध्ये संरक्षक भींत बांधण्यात येणार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई, दि.23 : कन्नड -सोयगाव परिसरामध्ये मागील तीन वर्षांमध्ये सातत्याने अतिवृष्टी झाल्याने काही प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिसरातील नदीलगतच्या गावामध्ये संरक्षक भींत बांधण्याची मागणी होत असून येथे या संरक्षक भिंत बांधण्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य उदयसिंग राजपूत यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, कन्नड-सोयगाव परिसरातील 20 ठिकाणांपैकी 11 ठिकाणच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षक भिंत बांधण्याची अंदाजपत्रके तयार केलेली असून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही क्षेत्रीयस्तरावर सुरू आहे. तसेच उर्वरित 9 ठिकाणची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडे, बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.
००००
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात
देशात महाराष्ट्र आघाडीवर
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. २३ : देशभरातील विद्यार्थी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये (एबीसीआयडी) आपले खाते उघडत आहेत.आत्तापर्यंत देशातील १ हजार १६० शैक्षणिक संस्थांनी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये सहभाग घेतला आहे.यात राज्यातील ११० शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. देशात सक्रिय असलेली पहिले चारही राज्याचे विद्यापीठ यात आघाडीवर राहिले आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि कौशल्याभिमुख अभ्यासक्रमाच्या दृष्टीने श्रेयांकासाठी (क्रेडिट) एक बँक तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांच्या व्यवहारासाठी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट आहे. परीक्षेद्वारे दरवर्षी प्राप्त होणारे क्रेडिट या बँकेत साठवले जातील. विद्यार्थी अथवा शैक्षणिक संस्था पदवी बहाल करताना या क्रेडिटचा वापर करतील. दोन वेगवेगळ्या महाविद्यालयात जरी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले तरी क्रेडिट मात्र याच एबीसी आयडीवर जमा होतील.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार जेव्हा क्रेडिट ट्रान्सफर करावे लागतील तेव्हा विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. संस्थेबाबत प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, दुसऱ्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विद्यापीठ आहे. तर चौथ्या क्रमांकावर जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा क्रमांक आहे. विद्यापीठातील विद्यार्थी संख्या पाहिली तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ५ लाख ४हजार ९३६ सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ ४ लाख ४५ हजार ४५३ मुंबई विद्यापीठ २ लाख १४ हजार ५६०, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठ १ लाख १९हजार ९३६ एवढी आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत उच्च शिक्षण संचालक यांनी यासाठी कार्यशाळा, अभियान घेऊन विशेष मोहिम राबविली आणि जनजागृती केली. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे, असे म्हणता येईल, असे सांगून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील आणि त्याचे अभिनंदन केले आणि यामध्ये संस्था आणि विद्यार्थी यांनी अधिक सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
