Friday, 24 March 2023

मेडीगड्डा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लकभूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार

 मेडीगड्डा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लकभूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार


- मंत्री दादाजी भुसे.

            मुंबई, दि. 23 : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तेलंगणा सीमावर्ती भागात गोदावरी नदीवर मेडीगड्डा प्रकल्प तेलंगणा सरकारने उभारला आहे. या प्रकल्पातील महाराष्ट्र हद्दीतील बुडीत क्षेत्रातील भूसंपादन शिल्लक असलेल्या क्षेत्राबाबत शेतकरी आणि दोन्ही राज्यांचे सरकार यांच्यामध्ये आपसमजुतीने दर निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.


            विधानपरिषदेत सदस्य रामदास आंबटकर यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती.


            मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गोदावरी नदी पात्रातील बुडीत क्षेत्रातील 235 हे. आर.जमीन थेट खरेदीने ताब्यात घेतल्या आहेत. सद्य:स्थितीत भूसंपादन अधिनियमानुसार प्रक्रिया सुरु होऊन ती अंतिम टप्प्यात आहे. तसेच उर्वरित 128 हेक्टर करीता भूधारकांस वाजवी व न्याय मोबदला देण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी तेलंगणा सरकारला कळविण्यात आले आहे. या संदर्भात योग्य तो समन्वय जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्यामार्फत केला जात आहे. या संदर्भात एक आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.


            मेडीगड्डा बॅरेजच्या वरील भागात मुगापूर गावापर्यंत 11.3 किमी लांबीची संरक्षक भींत बांधण्यात आली आहे. तसेच बॅरेजच्या खालील भागात जमीन खरडून जाण्याचा प्रकार होत असल्यामुळे बॅरेजच्या खालील बाजूस संरक्षक भिंत बांधण्याबाबत जलसंपदा विभागाकडून उचित कार्यवाही करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi