Thursday, 16 March 2023

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचाबृहत आराखडा लवकरच अंतिम करणार

 मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचाबृहत आराखडा लवकरच अंतिम करणार


- मंत्री शंभुराज देसाई.

            मुंबई, दि. १५ : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी प्राप्त सूचना व सुधारणा यांचा विचार करून सल्लागारामार्फत संकल्पनात्मक बृहद आराखडा प्राधिकरणास दोन पर्यायासह सादर करण्यात आला आहे. लवकरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई विद्यापीठामार्फत संकल्पचित्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.


            मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा आराखडा तयार करण्यास विलंब होत असल्याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत डीडीएफ मेसर्स यांना सल्लागार म्हणून नेमले होते. १ कोटी १२ लक्ष ७० हजार इतक्या रकमेच्या कामाचा करारनामा केला आहे. अद्यापर्यंत पाच लक्ष रूपयेच अदा करण्यात आले आहेत. ॲकॅडमिक ब्लॉकसाठी ३० टक्के, प्रशासकीय ब्लॉकसाठी १० टक्के, खेळासाठी १८ टक्के, विद्यार्थी निवासी करिता १० टक्के, संशोधनाकरिता १२ टक्के, शिक्षक निवासासाठी ५ टक्के, रस्ते आणि इतर वापराकरता १५ टक्के असा एकूण १०० टक्के विनियोग दाखविण्यात आला आहे. मात्र, सल्लागारामार्फत दिलेल्या दोन पर्यायांपैकी एका पर्यायास विद्यापीठाने अद्याप संमती दिली नसल्याने विलंब झाला आहे. मात्र, लवकरच यासंदर्भात मंत्री स्तरावर बैठक घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मंजुरीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली.


००००

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्येआवश्यक सोयी-सुविधा देणार

 सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्येआवश्यक सोयी-सुविधा देणार


- मंत्री संजय राठोड


            मुंबई, दि. १५ :- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, ग्रंथालय, संगणक कक्ष, जेवण, स्वच्छता गृह, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा असणे अपेक्षित आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन राज्यातील ४४१ शासकीय वसतिगृहांची तत्काळ तपासणी करण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री संजय राठोड यांनी आज विधान परिषदेत दिली. 


            विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात कसूर केल्याप्रकरणी आतापर्यंत ४९ वसतिगृहांतील गृहपालांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            शासकीय वसतिगृहांमध्ये अनियमितता झाल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.राठोड बोलत होते.


            मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहात ३ हजार ३५८ विद्यार्थी असून, त्यांना विविध सोयी सुविधा देण्यात येतात. मात्र, प्राप्त तक्रारीनुसार ५४ वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४९ वसतिगृहांत तक्रारीत तथ्य आढळून आले. सर्व गृहपालांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. २८ गृहपालांवर विभागीय चौकशी सुरू आहे, तर पाच गृहपालांना निलंबित करण्यात आले आहे. या वसतीगृहांतील भोजन ठेकेदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य इत्यादी अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.


             ज्या तालुक्यात वसतिगृहांची आवश्यकता आहे तेथे नव्याने वसतिगृह उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना असून, याअंतर्गत वसतिगृहाप्रमाणेच सोयी सुविधा देण्यात येत असल्याची माहितीही मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी दिली.


यावेळी सदस्य निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, अनिकेत तटकरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.


000

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यासलगेचच उपचार करून घ्यावेत

 इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यासलगेचच उपचार करून घ्यावेत


- सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत.

            मुंबई, दि. १५ : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावेत अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.


            एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले.


            मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१ एन १ एच३एन२ इ. या आजाराची सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळून येतात. इन्फ्लूएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात. १३ मार्च २०२३ अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.


            राज्यात इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागात दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणे तसेच उपचार पध्दती याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांवर आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत असून आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.


०००




 

Wednesday, 15 March 2023

चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार

 चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी

कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार.


                                                - मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. 15 : चंद्रपूर शहरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्राचा कृती आराखडा चंद्रपूर महानगरपालिकेने तयार केला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.


            येत्या रविवारी मुंबईतील प्रदूषणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात चंद्रपूर शहराच्या विषयावर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.


            विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोळसा वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण खूप होते. त्यामुळे बंदिस्त कंटेनरमधून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. याशिवाय चंद्रपूर शहराच्या लगत एमआयडीसी, सिमेंट कारखाने आणि इतर औद्योगिक क्षेत्र आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्रांचा एकत्रित कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            या चर्चेत सदस्य सचिन अहिर आणि सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला. 

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा लवकरच भरणार

 अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा लवकरच भरणार


                                         - मंत्री गुलाबराव पाटील

            मुंबई, दि. 15 : अनुसूचित जमाती प्रवर्गातून नेमणूक होऊन शासकीय अधिकारी,कर्मचारी अनेक वर्षे कार्यरत होते. मात्र जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना अधिसंख्य पदावर नेमण्यात आले आहे. या नेमणुकीनंतर रिक्त झालेल्या जागा लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

            राज्यातील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना अधिसंख्य पदाचा पदभार दिल्यासंबंधी सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.


            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, राज्यातील अनुसूचित जमातीच्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.यावेळी सदस्य विक्रम काळे, जयंत पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची सुधारणासह स्वच्छता करणार

 बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची

सुधारणासह स्वच्छता करणार


                                                 - मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता आणि सुधारणा करण्याबाबत तातडीने संबंधितांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.


            विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, एस. टी.च्या वाहक आणि चालकांना रात्री बस मुक्कामी गेल्यानंतर तेथे विश्रांतीसाठी असणारी सुविधा अतिशय अपुरी आहे, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील आणि तातडीने तिथे सुधारणा करण्यात येईल.


            सध्याच्या परिस्थितीत वाहक आणि चालकांना मिळणाऱ्या रात्रीच्या वस्ती भत्त्यात सन 2018 मध्ये वाढ करण्यात आली आहे. गावपातळीवर 75 रुपये, जिल्हा पातळीवर 90 रुपये आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात रात्रीचा वस्ती भत्ता 100 रुपये इतका देण्यात येत आहे. अधिकृत संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा करून त्यात जसे ठरेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


            सध्या एस. टी.च्या वतीने 75 वर्षे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत, महिलांना बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बसस्थानकांचे नूतनीकरण करताना त्याठिकाणी चालक आणि वाहक यांना निवासाची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


            विविध विभागांकडून एस. टी.ला विविध सवलतीपोटी देण्यात येणारी रक्कम वेळेत मिळण्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


            या चर्चेत सदस्य सर्वश्री विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांच्यासह श्रीमती मनीषा कायंदे, श्रीमती उमा खापरे यांनी सहभाग घेतला.

पर्यटन स्थळ

 मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद;जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार


                                       - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि 15 :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.


       सदस्य दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक तसेच मालोजी राजेंच्या पादुकांसाठी दगडी मूळ स्वरुपाचा चबुतरा उभारण्यात यावे, याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी पर्यटनमंत्री श्री. लोढा बोलत होते. 


       मंत्री श्री. लोढा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी वास्तव्य केलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील भुईकोट किल्ला महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाच्या नोदींत मालोजीराजांच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या या ऐतिहासिक जुनी तहसील कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुज, गाव, वेस यांचे पुनरुज्जीवन करुन या कचेरीच्या जागेतच मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात येईल. मालोजीराजेंच्या पादुकांसाठीही दगडी मूळ स्वरुपाचा चबुतरा उभारुन त्यांचे जीवन चरित्र महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्न करेल.


       मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धनासाठी पर्यटन विभागामार्फत 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. तसेच येत्या 2 महिन्यांच्या आत ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. या ठिकाणची, वास्तूची देखभाल ज्या विभागाकडे असेल त्यांच्या समन्वयाने तेथील अतिक्रमणे काढण्यात येतील. यासाठी लवकरच पर्यटन, सांस्कृतिक कार्य, महसूल आणि गृह विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi