Thursday, 16 March 2023

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्येआवश्यक सोयी-सुविधा देणार

 सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्येआवश्यक सोयी-सुविधा देणार


- मंत्री संजय राठोड


            मुंबई, दि. १५ :- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, ग्रंथालय, संगणक कक्ष, जेवण, स्वच्छता गृह, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा असणे अपेक्षित आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन राज्यातील ४४१ शासकीय वसतिगृहांची तत्काळ तपासणी करण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री संजय राठोड यांनी आज विधान परिषदेत दिली. 


            विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात कसूर केल्याप्रकरणी आतापर्यंत ४९ वसतिगृहांतील गृहपालांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            शासकीय वसतिगृहांमध्ये अनियमितता झाल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.राठोड बोलत होते.


            मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहात ३ हजार ३५८ विद्यार्थी असून, त्यांना विविध सोयी सुविधा देण्यात येतात. मात्र, प्राप्त तक्रारीनुसार ५४ वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४९ वसतिगृहांत तक्रारीत तथ्य आढळून आले. सर्व गृहपालांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. २८ गृहपालांवर विभागीय चौकशी सुरू आहे, तर पाच गृहपालांना निलंबित करण्यात आले आहे. या वसतीगृहांतील भोजन ठेकेदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य इत्यादी अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.


             ज्या तालुक्यात वसतिगृहांची आवश्यकता आहे तेथे नव्याने वसतिगृह उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना असून, याअंतर्गत वसतिगृहाप्रमाणेच सोयी सुविधा देण्यात येत असल्याची माहितीही मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी दिली.


यावेळी सदस्य निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, अनिकेत तटकरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.


000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi