Wednesday, 15 March 2023

आदिवासींना जमिनींचा मोबदला देतांनाहोणारी फसवणूक टाळण्यासाठी कँम्प घेवून वितरण

 आदिवासींना जमिनींचा मोबदला देतांनाहोणारी फसवणूक टाळण्यासाठी कँम्प घेवून वितरण


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. १४ : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, वसई, पालघर व वाडा या पाच तालुक्यातील ७१ गावांमधून जात असून यासाठी भुसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या ७१ गावांमध्ये आदिवासींच्या जमिनी असून त्यांना मोबदला देतांना आदिवासींची होत असलेली फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी शासकीय स्तरावर कँम्प घेण्यात येवून त्यांच्या मोबदला आणि इतर कागदपत्रे त्यांना वितरित करण्यात येतील असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबत विधानसभा सदस्य विनोद निकोले यांनी लक्षवेधी सूचना मांडणी होती.


            महसूल मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, आदिवासी बांधवांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह एक बैठक बोलविण्यात येऊन आदिवासी बांधवांना येणाऱ्या अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. नियमांचे उल्लंघन झाले असेल तर चौकशी करण्यासाठी आवश्यकता असल्यास एस आय टी मार्फत चौकशी करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.


            या चर्चेत विधानसभा सदस्य नाना पटोले, मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

मद्य विक्रीची अनुज्ञप्ती विहीत कार्यपध्दती अनुसरुन बंद करण्यात येणार

 विधानसभा लक्षवेधी :


मद्य विक्रीची अनुज्ञप्ती विहीत कार्यपध्दती अनुसरुन बंद करण्यात येणार


- मंत्री शंभुराज देसाई


            मुंबई, दि.१४ : एखाद्या वार्डामध्ये स्थानिकांना दारुबंदी करावयाची असल्यास नगरपरिषद, महानगरपालिका क्षेत्रातील एखाद्या वार्डातील २५% पेक्षा अधिक महिला मतदार किंवा एकुण मतदार यांनी लेखी निवेदन देऊन संबंधित वार्डातील मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याची मागणी केल्यास, अशा अर्जाची पडताळणी करण्यात येईल. यानंतर विहीत कार्यपध्दती अनुसरुन गुप्त पध्दतीने मतदान घेण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. संबंधित वार्डातील एकुण मतदार किंवा महिला मतदारांच्या संख्येच्या किमान ५० % पेक्षा अधिक अनुक्रमे एकुण मतदार किंवा महिला मतदार यांनी मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याच्या बाजुने मतदान केल्यास त्या क्षेत्रात मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबत विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले, महानगरपालिकेच्या ठरावाद्वारे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद करण्याची तरतूद सदर आदेश व अधिसुचनेमध्ये नाही. तसेच, परवाना कक्ष अनुज्ञप्ती मंजूर करतेवेळी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील ना-हरकत घेण्याची तरतूद प्रचलित नियमात नसल्याने पुर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायतीमध्ये हद्दीमध्ये दारुबंदी नियमानुसार करण्यात येणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.


००००

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'जाणता राजा' महानाट्याचा प्रयोग

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'जाणता राजा' महानाट्याचा प्रयोग

'जाणता राजा' महानाट्य पाहिल्यावर शिवकाळात जगण्याचा अनुभव


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. १४ : पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा या महानाट्यातून शिवकाळ जिवंत केला आहे. हे महानाट्य पहात असतांना आपण शिवकाळात जगत असण्याचा अनुभव येतो. जाणता राजा हे महानाट्य पाहायला मिळणे ही सर्वांसाठी एक पर्वणीच आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.


            दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठाण, पुणे निर्मित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित 'जाणता राजा' या महा नाट्याचे प्रयोग १९ मार्च २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत. या महानाट्याच्या आजच्या पहिल्या प्रयोगाची सुरुवात उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी रंगमंचावर आमदार ॲड आशिष शेलार, ईस्रायल देशाचे कौन्सिल जनरल कोब्बी शोशानी आदींसह मान्यवर उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या मावळ्यांची फौज उभारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग शिवरायांनी प्रेरित केले. शिवछत्रपती महाराजांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्र व भारत पुढे जात आहे. शिवछत्रपतींचे मावळे होवून आपण काम करूया असेही ते यावेळी म्हणाले.


             या महानाट्याची सुरुवात विधिवत पूजेने झाली. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. प्रयोगाच्या शुभारंभाला लोकप्रतिनिधी, महनाट्याचे कलाकार व चमू उपस्थित होती.

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी

 नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी

तीन सदस्यीय समिती


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


समिती तीन महिन्यात अहवाल देणार


            मुंबई, दि.14 : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला आपला अहवाल सादर करणार आहे.


            या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. तसेच लेखा व कोषागारे विभागाचे संचालक हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती तीन महिन्यात उपाययोजनेबाबतची शिफारस-अहवाल शासनास सादर करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व त्यांच्याशी संलग्नित असणाऱ्या वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाला निवेदन देऊन जुनी निवृत्तीवेतन योजना त्वरित लागू करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याबाबत विधानसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी संघटनांनी पुकारलेला संप मागे घ्यावा, असे आवाहन केले.


            निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले की, संघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित, सन्मानजनक व आरोग्य संपन्न जीवन व्यतित करता यावे, याकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येतील हे शासनाने तत्वत: मान्य केले आहे. संघटनेच्या मागणीनुसार या बैठकीमध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती नेमून, समितीने त्या अनुषंगाने शासनास अहवाल सादर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 


            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले की, शासन कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत पूर्णपणे चर्चेला तयार असून सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे. हे लक्षात घेऊन या संपामुळे नागरिकांची ज्या काही अत्यावश्यक सेवा असतील त्या सेवांवर परिणाम होऊ नये, आरोग्य विभागातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हा संप मागे घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

महाराष्ट्राचा महासंकल्प मिशन वर्ल्ड कपयुवा खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे

 महाराष्ट्राचा महासंकल्प मिशन वर्ल्ड कपयुवा खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे.


- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि. १४ : जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत. मुंबई येथे एम सी ए क्लब येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


            जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन आणि एफ सी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल क्लब तसेच टिव्ही ९ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचा महासंकल्प: मिशन वर्ल्ड कप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, जर्मनीचे भारतातील वाणिज्य दूत किम वुथ यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन पुढे म्हणाले, फुटबॉल हा जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे. या खेळाला चालना देण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. खेळाडूंच्या शारिरिक आणि बौद्धिक क्षमतेच्या सुदृढतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा पिढीला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


            जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन आणि एफ सी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल क्लब यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. या मधून २० विद्यार्थी निवडले गेले.


            राज्यातील सर्व भागातून हे विद्यार्थी निवडले गेले आहेत आणि त्यांना प्रशिक्षण दिले गेले. नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांची ही चमु आता एप्रिलमध्ये जर्मनी येथे खेळाचे प्रशिक्षण घ्यायला जाणार आहे.


            आयुक्त डॉ. दिवसे यांनी क्रीडा विभागाचे उपक्रम आणि दिशा याबद्दलची माहिती दिली. यामध्ये राज्याने मिशन लक्ष्यवेध हाती घेण्यात आले आहे. यात आलिम्पिक स्पर्धेसाठी स्पर्धक आणि प्रशिक्षक यांच्या साठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. बालेवाडी येथे स्टेट ऑफ आर्ट असे क्रीडा संकुल होत असल्याचे त्यांनी सांगितले.


            जर्मनीचे भारतातील वाणिज्य दूत किम वुथ यांनी राज्याच्या पुढाकाराबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य बघुन प्रभावित झालो असल्याचे सांगुन उपस्थित विद्यार्थ्याना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

निवड झालेले विद्यार्थीः-


            आदित्य गुप्ता, मोहम्मद झेनुलाबुद्दीन, निथांग वाज, आदित्य लेकामी, रायन परेरा, स्वराज सावंत, ख्वैराखपम सिंग, युग झिंजे, वेद पटेल, युवराज कदम, सर्वेश यादव, राजवीर गुरव, धृव गणोरे, शौरजीत पाटील, शिवम सिंग, सचिन सोनिस, पार्थ तलकोकुल, राधव कनोडीया, सम्राट मोरबाले , रियो पेन.


         क्रीडा विभागातर्फे काही महत्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती यावेळी क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी टिव्ही ९ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. जिल्हा नियोजनाच्या निधीतून ३० टक्के रक्कम ही क्रीडा विकासासाठी वापरणार, खेळाडूंना विमान प्रवास सवलत, जेवणाचा खर्च किंवा इतर आवश्यक गोष्टी तात्काळ पुरविण्याच्या सूचना, अर्थसंकल्पात क्रीडा विकासासाठी भरघोस तरतूद करण्यात आली असल्याची माहिती, मंत्री श्री.महाजन यांनी दिली.



००००

शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांच्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार20 मार्चपर्यंत नामांकन प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

 शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांच्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार20 मार्चपर्यंत नामांकन प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

नांदेड,- विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यात लोकप्रिय ठरलेल्या साप्ताहिक ज्ञानविश्व ला सहा वर्ष पूर्ण होत असून सातव्या वर्षात पदार्पण होत आहे. शिक्षण या विषयाला समर्पित असलेल्या या साप्ताहिकाच्या सहा वर्षांच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त प्राथमिक/माध्यमिक शाळातील शिक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच महाविद्यालयांचे ग्रंथपाल यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासोबतच एका वरिष्ठ शिक्षकाला द.तु.मस्के शिक्षक जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी नामांकन प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

शिक्षणाचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा, आवड निर्माण करण्यासाठी शिक्षक सातत्याने कार्यरत असतात. आपल्याकडील ज्ञानाला अनुभवाची जोड देत वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा अवलंब करणारे शिक्षक नेहमीच कौतुकास पात्र ठरतात. या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 2023 मध्ये वितरीत होणार्‍या या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील केवळ पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षकांची ज्ञानरचनावादावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांची नामांकने मागवत आहोत.

पुरस्काराचे स्वरूपः सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे आहे.

नामांकनासाठीचे निकष व नियमः

* नामांकन पाठवणार्‍या शिक्षकाचे कमाल वय 45 वर्षे असावे. (दि. 1 मार्च 2023 पर्यंत)जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे.

(उपक्रमशील मुख्याध्यापक, प्राचार्य व जीवनगौरव पुरस्कारासाठी वयाची अट नाही.)

* किमान 3 वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.

* नामांकन पाठवण्याचा अंतिम दिनांक सोमवार, 20 मार्च 2023

* निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

प्रस्ताव/नामांकन पाठवण्याचे स्वरूपः

आपल्या उपक्रमाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे पाठवावी. शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणीवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन. उपक्रमासंबंधीची छायाचित्रे. वपूरर्पींळीर्हींरऽसारळश्र.लेा या मेल आयडीवर पीडीएफ स्वरुपात पाठवावी.

संपर्क: 9604466601, 8830425121.

इमेल केल्यानंतर संपर्क क्रमांकावर मेसेज करावा असे आवाहन ज्ञानविश्व साप्ताहिकाचे संपादक रमेश मस्के यांनी केले आहे.



रिक्त पदांचा आढावा घेऊन शिक्षक पदभरतीची कार्यवाही

 रिक्त पदांचा आढावा घेऊन शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू


                                                  - मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. 13 : शाळांची संचमान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असते. त्यामुळे एकूण विद्यार्थी आणि त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तरीही सध्याची रिक्त पदे लक्षात घेता शिक्षक पद भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.


            प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्यात शिक्षक पद भरती करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. एकूण मान्यतेच्या 50 टक्के शिक्षक पद भरती केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. शिक्षकभरती नंतर शिक्षकेतर भरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            पदभरतीनंतर रिक्त पदांचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. तसेच शाळांमध्ये नियमित कामकाज सुरळीत होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.


            संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असल्याने आधार जोडणीचे काम सुरू आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्या कळू शकेल आणि शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.


            यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सुधाकर अडबाले, आमशा पाडवी, अभिजित वंजारी, जयंत पाटील, कपिल पाटील, अरुण लाड आदींनी सहभाग घेतला.


0000

Featured post

Lakshvedhi