Tuesday, 14 March 2023

जल जीवन मिशनच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करणार

 जल जीवन मिशनच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करणार


- मंत्री गुलाबराव पाटील


मुंबई, दिनांक 14: जल जीवन मिशन योजनेची रायगड जिल्ह्यात विविध कामे सुरू

आहेत. या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या आणि मुदतीत कामे पूर्ण न

करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य जयंत पाटील यांनी यासंदर्भात

प्रश्न उपस्थित केला होता.


मंत्री श्री. पाटील म्हणाले की, रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत

1430 योजना मंजूर आहेत. एकूण 1259 कोटी रुपयांची ही कामे आहेत. नुकतेच

यातील बहुतांशी कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तसेच कामांची

संख्या जास्त आणि कंत्राटदार संख्या कमी अशी स्थिती असल्याने एकच

कंत्राटदाराला अनेक कामे दिल्याचे रायगडसह इतर जिल्ह्यांतही दिसते. मात्रकार्यारंभ आदेश असूनही कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यातयेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनीसहभाग घेतला.


गंगापूर तालुक्यातील वैयक्तिक स्वच्छतागृह अनुदान वाटप अनियमितता प्रकरणीचौकशी

 विधानपरिषद प्रश्नोत्तरे :

गंगापूर तालुक्यातील वैयक्तिक स्वच्छतागृह अनुदान वाटप अनियमितता प्रकरणीचौकशी


                                               - मंत्री गुलाबराव पाटील.


मुंबई, दिनांक १४: गंगापूर तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाच्या टप्पा - २

अंतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामात अनियमितता झाल्याचे दिसून येत

असून, याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व

स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मात्र, या प्रकरणात अनुदान

संबंधितांना प्रदान करण्यात आले असल्याने अपहार झाला नसल्याचे त्यांनी

स्पष्ट केले. विधानपरिषदेत सदस्य सतिश चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न

उपस्थित केला होता.


मंत्री श्री. पाटील म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा-२

अंतर्गत पंचायत समिती गंगापूर मधील १३४६ लाभार्थ्यींनी वैयक्तिक

शौचालयासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ११४९ अर्जदारांनी वैयक्तिक

शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्याच्या नोंदीही घेण्यात आल्या असून

आज अखेर ९५० लाभार्थ्यींच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले आहे.


या अनुदान वाटपासंबंधी विविध बाबींची तपासणी करण्यासाठी जिल्हा

परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ५ सदस्यीय चौकशी समिती गठीत

केली होती. या समितीने प्रोत्साहन अनुदानाचा अपहार अथवा गैरव्यवहार झाला

नसल्याचा अहवाल दिला असल्याची माहितीही मंत्री           श्री. पाटील यांनी दिली.


0000

महाराष्ट्र राज्यातील OBC / VJNT तसेच विशेष मागास प्रवर्गातील 10 वी चे ज्यांचे पेपर सुरू आहेत

 महाराष्ट्र राज्यातील OBC / VJNT तसेच विशेष मागास प्रवर्गातील 10 वी चे ज्यांचे पेपर सुरू आहेत त्यांनी नक्कीच हा फॉर्म भरा...

MHT CET/JEE /NEET 2025 ची तयारी करुन घेणार आहेत. तसेच मोफत टॅब सुद्धा देणार आहेत. सर्व ओबीसी भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा...🙏🏻


नंदुरबारला पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह५० उपकेंद्रांचे काम लवकरच सुरू करणार

 नंदुरबारला पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह५० उपकेंद्रांचे काम लवकरच सुरू करणार

- आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

            मुंबई, दि. १३ : दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देणारी केंद्रे उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नंदूरबार जिल्ह्यात २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५० उपकेंद्रे आदिवासी आरोग्य योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. या केंद्रांचे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) नकाशे तयार झाले असून, एका आठवड्यात पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली.


            नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भागात आरोग्य संस्थांची पुनर्बांधणी करणेबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी मांडली होती. यास उत्तर देताना मंत्री डॉ. सावंत बोलत होते.


            मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात आरोग्य सेवांबाबत दौरा करण्यात येईल. वस्तुस्थितीनुसार तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. सद्यस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात एक जिल्हा रूग्णालय, एक स्त्री रूग्णालय, दोन उपजिल्हा रूग्णालये, १२ ग्रामीण रूग्णालये तसेच ६१ प्राथमिक आरोग्य केंद्र, सात आयुर्वेदीक दवाखाने, आठ प्राथमिक आरोग्य पथके, चार आश्रमशाळा पथके व २९० उपकेंद्रे कार्यरत असून यामार्फत ग्रामीण जनतेस आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.


            सन २०१८ -२०२२ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्राची पुनर्बांधणी डीपीडीसी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध निधीतुन करण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रे इमारती व २ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी निवासस्थान इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट जिल्हा परिषदेमार्फत करण्याची कार्यवाही सुरू आहे. सन २०१५-२०२० या कालावधीत ग्रामपंचायतीच्या जागेत अथवा इतर ठिकाणी इमारतीमध्ये कार्यरत असलेले १३ प्राथमिक आरेाग्य केंद्रास शासकीय जागा प्राप्त करून नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असल्याची माहिती, मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.


            यावेळी सदस्य एकनाथ खडसे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यात ‘एमटीडीसी’चे दालन.

 आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यात ‘एमटीडीसी’चे दालन.

            मुंबई, दि. १३ : महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी सात ते नऊ मार्च, २०२३ या कालावधीत प्रतिष्ठित आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात राज्याच्या पर्यटन विभागाने सहभाग घेतला. परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे.


            राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा आणि पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विभाग आयटी बी बर्लिन व्यापार मेळावा २०२३ मध्ये सहभागी झाले. महाराष्ट्र पर्यटन पॅव्हेलियनचे औपचारिक उद्घाटन भारत पर्यटन विभागाचे सचिव अरविंद सिंग आणि भारताचे जर्मनी येथील राजदूत पार्वथनेनी हरीशजी यांच्या हस्ते झाले.


            यावर्षी आय टी बी बर्लिन व्यापार मेळाव्यामध्ये जवळ जवळ १६१ देश तसेच १०,००० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. त्याठिकाणी महाराष्ट्र राज्याची वैभवशाली संस्कृती, समृद्ध इतिहास, निळे समुद्रकिनारे असलेल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये सर्वांसमोर मांडण्यात आली. तसेच आयटीबी बर्लिन हे व्यापारासाठी योग्य असे व्यासपीठ ठरले, कारण प्रवास आणि व्यापार उद्योगाच्या बाबतीत ते जगातील प्रमुख व्यापार मेळाव्यांपैकी एक आहे. दीर्घ काळापासून प्रवास आणि पर्यटन परिसंस्थेतील व्यवसायासाठी हा मेळावा उत्प्रेरक ठरला आहे.


            आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने एक सुसज्ज पॅव्हेलियन उभारले होते. या वर्षी महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहप्रदर्शकांना भागधारकांची भेट घेता यावी यासाठी ८३ चौ. मी. इतक्या आकाराचे प्रशस्त व लक्षवेधी दालन उभारले होते तसेच दर्शकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव घेता यावा यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.


            महाराष्ट्र पर्यटन विभागाबरोबरच अनेक सह-प्रदर्शक देखील या मेळाव्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खासगी ट्रॅव्हल्स ट्रेडच्या प्रतिनिधींमध्ये फाजलानी नेचर नेस्ट, गोवर्धन इको व्हिलेज बॉलीवुड पार्क, कॅप्टन निलेश हॉलिडेज, एबिक्स ट्रॅव्हल अँड हॉलिडेज लिमिटेड (डेक्कन ओडिसी), नमस्ते टूर्स प्रा. लि., स्वदेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि वीणा वर्ल्ड अशा पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्था सामील झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि अधिकारी मानसी कोठारे यांनी परिश्रम घेतले.


0000

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या नऊ महिन्यात पूर्ण होईल

 मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या नऊ महिन्यात पूर्ण होईल


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण


            मुंबई, दि. १३ : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्याने कामाला विलंब होत होता. परंतु हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच शासनाची भूमिका आहे. येत्या ९ महिन्यांत या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्या आदिती तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, महामार्गाचे पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर हे सुमारे ८४ किमीचे रखडलेले काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. भूसंपादन, विविध खात्याची परवानगी मिळवणे, परवानग्या घेऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणे यासाठी बराच कालावधी उलटून गेला आहे. या कामासाठी वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील अडचणी प्रत्यक्षात समजावून घेऊन जलद गतीने काम करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अमित साटम, सुनील प्रभू, वैभव नाईक यांनी सहभाग घेतला.

वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील

 वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील


-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि.१३ :वीज निर्मितीकरीता लागणारे कोळशाचे दर वाढले आहेत.वीज दर ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसून तरीही शासन वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            याबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वीज वितरण परवानाधारक कंपनीस आपल्या कंपनीच्या कार्यक्षेत्रातील ठराविक भागांचा वीज वितरण कारभार सांभाळण्यासाठी फ्रेंन्चाइझी नियुक्ती करण्याची तरतूद आहे. ज्या विभागांत वीज गळतीचे प्रमाण जास्त आहे, वीजबील वसूलीचे प्रमाण कमी आहे तसेच वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, अशा व इतर सर्वसमावेशक बाबींचा विचार करुन असे विभाग फ्रेंन्चाइझी तत्वावर खाजगी कंपनीस ठराविक कालावधीकरीता देण्याचा धोरणात्मक निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यानुसार महावितरणच्या भिवंडी मंडळांतर्गतची विद्युत वितरण व देखभाल व्यवस्था मे. टोरंट पॉवर कंपनी लिमीटेडला वितरण फ्रेंन्चाइझी म्हणून हस्तांतरीत करण्यात आलेली आहे.


            वीज मीटर रिडींग घेणारे कंत्राटदार कर्मचारी यांना ड्रेस कोड ,ओळखपत्र देण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात येतील.कंत्राटदार कर्मचारी जबरदस्ती करीत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच रमजान सणाला लोडशेडिंग करण्यात येवू नये अशा सूचनाही देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य अबू आझमी,मुक्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिफ,अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.


000000



Featured post

Lakshvedhi