Tuesday, 14 March 2023

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान

 राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान

- चंद्रकांत पाटील


            मुंबई दि. 13 : देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जे नेतृत्च लागते ते तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत करण्यात येते. या योजनेच्या स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यासाठी स्वयंसेवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन नेतृत्च गुणांचा विकास गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी केले.


            उच्च व तंत्रशिक्षण विभाग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या वतीने नागपूर विद्यापीठातील सभागृहात पाच दिवसीय राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले.


            नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दूधे, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सोपानदेव पिसे, राज्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रँड ॲम्बेसिडर नेहा पाठक तर दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी रामेश्वर कोठावळे यावेळी उपस्थित होते. 


            मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आजच्या युवकांमध्ये आहे. भारतात कौशल्य धारण केलेले सर्वाधिक गुणी विद्यार्थी आहेत.समाजाप्रती निष्ठा असणारा युवा वर्ग तयार करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे. युवकांनी पर्यावरण, कौशल्य विकास, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासारख्या विषयांवर काम करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. प्रशासनाच्या बरोबरीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काम व्हावे यासाठी संख्या वाढविणे निधी उपलब्ध करून देणे यासारखे सर्व सकारात्मक सहकार्य करण्याची ग्वाही श्री पाटील यांनी यावेळी दिली.


            राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरामुळे स्वच्छता, व्यक्तीमत्व विकास, नेतृत्व विकास, व्यावहारीक शिक्षण, जी-20 चे नेतृत्व, जगाचे नेतृत्व, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक बांधीलकीची शिकवण स्वयंसेवकांना मिळणार असल्याचे रामेश्वर कोठावळे यांनी सांगितले. 


या कार्यक्रमास राज्यातील विविध महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            यामध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठातले राष्ट्रीय सेवा योजनेचे निवडक विद्यार्थी सहभागी होते. हे शिबीर दि. 13 ते 17 मार्च 2023 या कालावधीत सुरू असणार आहे.

*आजच्या महिला दिनानिमित्त ..!*

 *


*आपल्या भारतातील, महाराष्ट्रातील, तेही पुण्यातील, तेही बिबवेवाडीतील एक मुलगी युक्रेन-रशिया युद्धात एक वर्षापासून युक्रेन सैनिकांची सेवा करीत आहे, तिची ही कहाणी ,,,,,!* 


*आजच्या महिला दिनानिमित्त ..!* 


(पोस्ट मोठी पण भारतीय नागरिकांसाठी, महिलांसाठी अभिमानास्पद आहे.)

        ------🙏-----


*नाव आहे --- चि. वैभवी विनायक नाझरे* 


वैभवी पुण्यातील बिबवेवाडी मध्ये जन्मली, वाढली. बिबवेवाडी रहाणारे *श्री.विनायक नाझरे व सौ.कुमुदिनी नाझरे* यांची ही कन्या.

शाळेमध्ये ती एक हुशार मुलगी म्हणून परिचित होती. लहानपणापासून तिची डॉक्टर होण्याची इच्छा. बारावीत असताना तिचे आई-वडिलांनी तुला ९५% च्या वर मार्क्स मिळवलेस तरच तुझी ही इच्छा पूर्ण होईल असे सांगितले होते. कारण मेडिकल प्रवेशासाठी लागणारे प्रचंड डोनेशन ते मुळीच देऊ शकत नव्हते. वैभवीला याची जाणीव होती. म्हणून खेळात भाग घेऊन जिल्हा-राज्य स्तरावर खेळल्यास ५% मार्क्स वाढत असलेने तिने दहावीपासूनच बुद्धिबळ खेळात भाग घेतला. कोणतेही कोचिंग न घेता ती राज्यस्तरावर पुणे जिल्हयाकडून बुद्धिबळ स्पर्धेत खेळली. दहावीला ९२% मार्क्स पडले व स्पोर्टसचे ५% मिळून ९७% मार्क्सने ती उत्तीर्ण झाली. फर्ग्युसन कॉलेजला बारावीसाठी प्रवेश मिळाला. सीईटी नंतर तिला निगडीच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. पण तिला ससून किंवा आर्मी कॉलेज मध्येच प्रवेश हवा होता. तिने तो प्रवेश नाकारला. 

 

*तिने डायरेक्ट युक्रेनमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी अर्ज केला.* तिला युक्रेनच्या वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश मिळाला. तेथील वैद्यकीय शिक्षण भारतातील तुलनेने स्वस्त असलेने तिने युक्रेनला जाण्याचा निर्णय आई-वडिलांना सांगितला. *काळजावर दगड ठेऊन आई-वडिलांनी तो स्वीकारला.*

 तिचे वडील बिबवेवाडीमध्ये टू-व्हीलरचे एक छोटेसे गॅरेज ३० वर्षापासून चालवत होते. गाडीच्या फायरिंगच्या नुसत्या आवाजावरून ते गाडीतील फॉल्ट लगेच ओळखत, अशी त्यांची ख्याती. आता त्यांनी ते भाड्याने एकास चालवायला दिले आहे. आई वकील आहे. हुशारीचे सद्गुण वैभवीला दोघांकडून जन्मजात मिळालेले. 


७ ऑक्टोबर २०१७ रोजी आईवडिलांनी वैभवीला दिल्ली विमानतळावर सोडले. *आणि वैभवी युक्रेनला गेली....!*


 तेथील वैद्यकीय शिक्षणासाठी तिचा संघर्ष सुरू झाला. 


तिला ज्या यूनिव्हर्सिटिमध्ये प्रवेश मिळाला होता ती युक्रेन मधील एक नंबरची व जगातील ३ ऱ्या नंबरची युनिव्हर्सिटी आहे.


 देशाची राजधानी किव्हमध्ये ती उतरली. सर्व बर्फाळ प्रदेश, -१४ डिग्री तापमान, भाषा वेगळी, जेवणाची चव वेगळी. सर्व वातावरणच वेगळे. ती युनिव्हर्सिटीत पोहोचली. होस्टेल मिळाले. शिक्षण सुरू झाले. वातावरणाशी जुळवून घेण्याचा तिचा संघर्ष चालूच होता.

आणि.. 

*थोडेच दिवसात तिला रॅगिंगचा सामना करावा लागला.* तोही उत्तर भारतीय विद्यार्थ्यांकडून. श्रीमंत आईबापाची ही मूले. 


एकदा असाच एक प्रसंग घडला. वैभवी एकदा आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत टॅक्सीने युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये गेली होती. तिथे ही मुले बसलेली होती. टॅक्सीचा दरवाजा उघडा ठेवला म्हणून यापैकी एका मुलाने, वैभवी व तिचे मित्र-मैत्रिणी टॅक्सीमधून उतरत असताना, टॅक्सीच्या दरवाजावर जोरात लाथ मारली. वैभवीच्या मैत्रिणीची बोटे दरवाजात सापडली. चांगलीच जखमी झाली. *वैभवीला हे सहन झाले नाही.*

 तिने त्यांना याचा जाब विचारला. ती मूले तिच्याच अंगावर धावून आली. आता वैभवीला त्यांचा रोजचा त्रास सुरू झाला. असं किती दिवस सहन करायचे या विचाराने वैभवीला रात्रभर झोप लागली नाही. तिने पुण्यात आई-वडिलांना फोन केला. दोघांनी धीर दिला. कॅम्पस मध्ये CCTV कॅमेरे आहेत का याची तिच्याकडे चौकशी केले. तिने आहेत असे सांगताच हॉस्टेलच्या रेक्टरकडे तिला तक्रार करण्यास सांगितले. त्यांनी नेहमीच्याच घटना म्हणून दुर्लक्ष केले. वैभवी निराश झाली. आपले वैद्यकीय शिक्षण कसे पूर्ण होणार व सोडून द्यावे लागते की काय या विचाराने तिला रडू कोसळले. पण.., *वैभवी घाबरली नाही.*

 तिने आई -वडिलांना पुन्हा फोन केला. वडिलांच्या व वकील आईच्या सल्ल्याने व त्यांनी दिलेल्या धीरामूळे तिने पोलिसात तक्रार नोंदवली. युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये पहिल्यांदाच पोलीस तिच्या तक्रारीमुळे आले. यूनिव्हर्सिटीचा स्टाफ हादरला. प्रकरण पोलिसांनी भारतीय Embassyला कळवले. त्या मुलांना सज्जड दम दिला गेला. पुन्हा असे कृत्य केल्यास युक्रेनमधून कायमचे भारतात हाकलून दिले जाइल अशी तंबी त्यांना देणेत आली. 

*त्या प्रकरणानंतर वैभवी जणू यूनिव्हर्सिटीतील सर्व विद्यार्थ्यांची व स्टाफची लाडकी झाली.* त्या मुलांनीही तिची माफी मागितली. 

 तिला हॉस्टेलमध्ये स्वतंत्र व्यवस्था देणेत आली. तिचे सर्व लक्ष अभ्यासावर आता केंद्रित झाले. 


*आणि आणखी एक घटना घडली.*


त्याच यूनिव्हर्सिटीमध्ये एम.डी.चे शिक्षण घेत असलेला युक्रेनचा ‘ डॉ. टीमोफ़ि’ नावाचा एक तरुण हा वैभवीच्या प्रेमात पडला. तो अंतिम वर्षात शिकत होता. तेथे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. तो त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. हे शिकवणे चालू असतानाच दोघांमध्ये प्रेम फुलले. *त्याला हुशार व संस्कारित वैभवी आवडली.* डॉ. टीमोफ़ि सुद्धा हुशार विद्यार्थी म्हणुन प्रसिद्ध होता. 


वैभवीचे आई-वडील इकडे आधीच तिच्या काळजीत असत. त्या काळजीत आणखी एक भर पडली. 


पण डॉ. टीमोफ़ि चांगल्या घरातील मुलगा निघाला.. त्याची आई लेक्चरर व वडील ऑटोमोबाईलचा व्यवसाय करत आहेत. टीमच्या मोठ्या भावाची युक्रेन मध्ये स्वत:ची आय. टी.कंपनी आहे. धाकटा भाऊ आय. टी. इंजीनियरचे शिक्षण घेत आहे.. त्या संपूर्ण कुटुंबाला वैभवी खूप आवडली होती. घरी मुलगी नसल्याने व टीमही मेडिकल प्रॅक्टिस युक्रेनमध्ये करीत असल्याने त्यांना टीमचे लग्न लवकर करावयाचे होते. त्या कुटुंबाने लग्नाचा विषय वैभवीच्या आईवडिलांना कळवला. खूप विचारांती त्यांनी होकार कळवला. 


 डॉ. टीमोफ़ि वैभवीला घेऊन पुण्यात आले. जुलै २०१९ मध्ये आळंदी येथे लग्न झाले. टीमोफ़ि यांनी हिंदू धर्म स्वीकारला. लग्नातील सात फेरे मारताना त्या पाठीमागची भावना, शास्त्र ऐकून त्यांना खूप आनंद झाला. कॅम्पमधील रामकृष्ण हॉटेल मध्ये रीसेप्शन झाले. 


*नवदाम्पत्य आनंदाने युक्रेनला परतले.* 

वैभवीचे शिक्षण व डॉ.टीममोफ़ि यांची प्रॅक्टिस यूक्रेन मध्ये सुरू होती. 


*आणि आणखीन एक घटना घडली.*

 

रशियाने युक्रेनवर हल्ला केला. *युद्ध सुरू झाले.* परिस्थिति अवघड झाली. 

डॉ.टीमोंफ़ि व वैभवी राजधानी किव्ह मध्ये राहतात. टीमचे आई-वडील बेलारूसच्या सीमेजवळील लुटस येथे रहातात. 

दरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मधून परत आणण्याचे धोरण भारत सरकारने यशस्वीपणे राबवले.


 वैभवीच्या आईवडिलांना जावईसह तिने भारतात यावे असे वाटू लागले. त्यांनी प्रयत्न सुरू केले. 

*पण वैभवीने भारतात येण्यास नकार दिला.*

 कारण देश संकटात असताना टीमोफ़ि यांनी देश सोडण्यास दिलेला नकार. मात्र त्यांनी वैभवीला भारतात परत जाण्यास व युद्ध संपल्यावर परत येण्यास सांगितले होते. *पण वैभवीने आपल्या पतीला ही भारतात जाण्या साठी नकार दिला.* ती यूक्रेन देशाची नागरिक होती. पण भारतात परत येण्यास तिला कोणतीच अडचण नव्हती. 


 दरम्यान युक्रेन सरकारने १८ ते ६० वर्षाच्या नागरिकांना देश सोडण्यास बंदी घातली. 


 सर्व भारतीय विद्यार्थी आज भारतात परत आले आहेत. *आता युक्रेन मध्ये एकमेव भारतीय विद्यार्थिनी आहे, ती म्हणजे वैभवी.*


   *देशसेवेसाठी टीम व वैभवीने स्वत:ला झोकून दिलेले आहे. दोघेही जखमी सैनिकांची शुश्रूषा करीत आहेत. सर्जरी करीत आहेत.*


 सायरनचे आवाज, विमानांचे, बॉम्बचे आवाज ऐकत, महागाईशी टक्कर देत, आपला संसार सांभाळून देशसेवेसाठी १८-१८ तास काम करीत आहेत. त्यांच्या निवासस्थानजवळ बॉम्ब पडत आहेत. जीव मुठीत धरून बेडरपणे वैभवी जखमी सैनिकांची सेवा करीत आहे. 


  *युक्रेन सरकारने तिच्या शौर्याबद्दल २८ फेब्रुवारी रोजी बेस्ट सर्जनचा किताब वैभवीला दिला असून तिचा सन्मान केला आहे.*👍


 आपल्या भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहेच.

पण

 *आजच्या जागतिक महिला दिनी ---- भारताची एक सुकन्या युक्रेन देशाची सून बनून, आपले सासर हेच आपले घर मानते व भारतीय परंपरेचे, भारतीय संस्कारांचे जतन करत, आपला युक्रेन देश संकटात असताना, आपला संसार सांभाळत स्वत:चे संपूर्ण योगदान देते--- ही भारतीयांसाठी व भारतीय महिलांसाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.* 

                                     

              (लेखक -- राउ)

🙏

छोटे मोठे

 


राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता जन-सुविधा केंद्राची उभारणी करणार

 राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता

जन-सुविधा केंद्राची उभारणी करणार


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            मुंबई, दि. १३ : "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रमांतर्गत राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता जन-सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या जनसुविधा केंद्रात पुरुष-महिला स्वच्छतागृह, शिशू काळजी केंद्र, अल्पोपहार केंद्र इत्यादी सोयीसुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबत सदस्य संग्राम थोपटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील ३८७ स्मारकांच्या ठिकाणी क्यूआर कोडसह त्या-त्या स्मारकाची पूर्ण माहिती असणारे फलक लावण्यात येणार आहेत. जेणेकरून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना त्या स्मारकाची माहिती मिळेल. गड किल्ल्याचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पावित्र्य भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर स्मारकांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांची माहिती सांगणाऱ्यांना बक्षीस देखील देण्यात येणार आहे.


            केंद्र संरक्षित शिवनेरी, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांसाठी सर्वंकष स्थळ विकास आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी राज्य शासनामार्फत सादर करण्यात आला आहे. किल्ल्यांच्या ठिकाणी राज्य पुरातत्व विभागास जतन व संवर्धनाचे काम तसेच पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम करण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.येत्या काळात महावारसा योजना राबविण्यात येणार असून सामाजिक उत्तरदायित्व निधी, ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे मत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर ,सुभाष धोटे यांनी सहभाग घेतला.

कुलाबा तालुका क्रीडांगणाचे काम गतीने पूर्ण करावे

 कुलाबा तालुका क्रीडांगणाचे काम गतीने पूर्ण करावे

-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर.

            मुंबई, दि. १३ : कुलाबा परिसरासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या कुलाबा तालुका क्रीडांगणाचे काम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश विधानसभा ॲड. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.


            कुलाबा तालुका क्रीडांगण कफ परेड येथे प्रस्तावित आहे. या प्रस्तावित तालुका क्रीडांगणाच्या कामकाजाबाबत विधानभवन येथे आयोजित बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री गिरीश महाजन, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, कुलाबा तालुका क्रीडांगणाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. दर्जेदार क्रीडांगण निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. हे क्रीडांगण कुलाबा परिसरातील नागरिक, युवा खेळाडूंसाठी महत्वाचे केंद्र असणार आहे. कुलाबा परिसरातील नामांकित खेळाडू या क्रीडांगणामुळे उदयाला येतील. या क्रीडांगणामुळे कुलाबा परिसराच्या वैभवात भर पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


            यावेळी क्रीडांगणाच्या उभारणीबाबतच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

दिलखुलास' कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया.

 दिलखुलास' कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया.

            मुंबई,दि.13: यंदाच्या अर्थसंकल्पामुळे राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार निर्मिती, पर्यावरण, पर्यटन क्षेत्राला गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची ही अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲप वर मंगळवार दि. 14 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत 'दिलखुलास' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.


            विधिमंडळात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली आहे.राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा, पायाभूत सुविधा भक्कम करणारा पंचामृत अर्थसंकल्प राज्याला प्रगतिपथावर नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

 संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय

कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार


- सचिव सुमंत भांगे.

            मुंबई, दि. १३ : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  


            राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


            महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही- वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने आज १३ मार्च २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.


            राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे, असेही सचिव श्री. भांगे यांनी म्हटले आहे.


०००००

Featured post

Lakshvedhi