Friday, 10 March 2023

परभणीतील भाजीपाला विक्रेत्यांनी केलेल्यातक्रारीच्या अनुषंगाने फेर तपासणी करणार

 परभणीतील भाजीपाला विक्रेत्यांनी केलेल्यातक्रारीच्या अनुषंगाने फेर तपासणी करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि 10 : परभणी येथील भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलेले प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, यासंदर्भात सत्य परिस्थिती तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिन्याभरात फेर तपासणी करणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.


            परभणी येथील पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबाबत सदस्य अब्दुल्ला खान दुर्राणी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांवर खंडणीबाबत गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र या तक्रारीबाबत सखोल चौकशी एका महिन्याच्या आत करण्यात येईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. निर्दोष व्यक्तींवर अन्याय होणार नाही याची काळजी शासन घेणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत

 खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत

केंद्र सरकारला विनंती करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 10 : खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.


            यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलत होते.


            सांगली जिल्ह्यात शेतकरी रासायनिक खत खरेदी करत असताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. यामध्ये जातीचा उल्लेख आहे हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.


०००

नवीन 750 एकर च्या औद्योगिक वसाहतीची जागा निश्‍चिती लवकरचविभागीय कार्यालय, हॉस्पिटलसाठी

 नवीन 750 एकर च्या औद्योगिक वसाहतीची जागा निश्‍चिती लवकरचविभागीय कार्यालय, हॉस्पिटलसाठी जागा लवकरच

व्यापार मित्र समितीची स्थापना होणार


मुंबई ः जळगांव जिल्ह्यातील नवीन उद्योगांची गरज पुर्ण करण्यासाठी कुसुंबा जवळ 750 एकर जागेत नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी येत्या आठवड्यात जागा पाहणी करून अहवाल सादर करतील, तसेच एमआयडीसी चे स्वतंत्र विभागीय कार्यालय जळगांव येथे सुरू करण्यात येणार असून, कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटलसाठी आवश्यक 5 एकर जागा एक महिन्या निश्‍चित केली जाईल असे निर्णय गुरूवार दि. 9 रोजी मुंबई येथे उद्योग विभागात संपन्न बैठकीत झाल्याची माहीती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या एक्सप्रेस टॉवर येथील कार्यालयात संपन्न बैठकीत उद्योगमंत्री ऑनलाईन सहभागी झाले. आमदार सुरेश भोळे व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, सहसचिव उद्योग संजय देगांवकर, अवर सचिव उद्योग किरण जाधव, MIDC उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे, MIDC मुख्य अभियंता एस.आर.तुपे, प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, जळगांव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आमदार सुरेश भोळे यांनी उद्योजकांचे प्रश्‍न तातडीने निकाली निघावेत व यात कुचराई करण्यार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी केली.

औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र चेंबरच्या जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजिका संगीता पाटील, तसेच महेंद्र रायसोनी, नितिन इंगळे, किरण बच्छाव, अरविंद दहाड, दिलीप गांधी, किरण राने, सचिन चोरडीया, सुयोग जैन, रूपेश शिंदे, राजेंद्र चौधरी, महेंद्र सोनार, रमेश शिंदे, संजय जैन यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेऊन विविध प्रश्‍न मांडले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जळगांव शहरातील व्यापारी-उद्योजकांचे प्रश्‍न मांडून याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली तसेच, चोपडा, भुसावळ, भडगांव येथील औद्योगिक वसाहतींच्या पायाभुत सुविधांसाठी निधि देण्याची मागणी केली.

एमआयडीसी क्षेत्रातील फायर स्टेशन सुरू करण्याची मागणी केली असता महापालीकेतर्फे हे फायर स्टेशन सुरू करण्याची तयारी दर्शविण्यात आली.

दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी उद्योग मित्र समितीच्या बैठका नियमित घेतल्या जातील असे सांगुन, कामगार विमा योजना हॉस्पिटलसाठी जागेचा प्रश्‍न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

व्यापार्‍यांचे विविध विभागांशी संबंधित स्थानिक प्रश्‍न लवकर निकाली निघण्यासाठी ‘उद्योग मित्र समिती’ च्या धर्तीवर ‘व्यापार मित्र समिती’ नेमण्याची मागणी ललित गांधी यांनी केली त्यास मान्यता देण्यात आली.

दुकानगाळ्यांच्या भाड्याचा प्रश्‍न, दुहेरी कर आकारणी व अन्य धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला.

आमदार सुरेश भोळे यांनी जळगांवला नवीन मोठा उद्योग प्रकल्प येण्यासाठी उद्योग विभागाने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी केली. जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजिका सौ. संगिता पाटील यांनी जळगांव जिल्ह्याचा अपेक्षित विकास झाला नाही. आता जळगांव जिल्हाला विशेष प्राधान्य द्यावे अशी मागणी केली.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी यावेळी विमानसेवा, पायाभुत सुविधा, एपीएमसी कायदा, प्रोमोशनल टॅक्स यासंबंधीच्या मागण्याही सादर केल्या.

आजच्या बैठकीतील चर्चा व कार्यवाहीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षेखाली पंधरा दिवसात पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला.


फोटो कॅप्शन ः उद्योग विभागात संपन्न बैठकीमध्ये व्यापार-उद्योगाच्या प्रमुख मागण्याविषयी चर्चा करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी चर्चेत सहभागी आमदार सुरेश भोळे, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, सहसचिव उद्योग संजय देगांवकर, अवर सचिव उद्योग किरण जाधव, MIDC उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे, MIDC मुख्य अभियंता एस.आर.तुपे, प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, जळगांव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, सौ. संगिता पाटील, महेंद्र रायसोनी, नितिन इंगळे, किरण बच्छाव, अरविंद दहाड, दिलीप गांधी, किरण राने, सचिन चोरडीया, सुयोग जैन, रूपेश शिंदे, राजेंद्र चौधरी, महेंद्र सोनार, रमेश शिंदे, संजय जैन


लांजा ग्रामीण रुग्णालयातीलरिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू

 लांजा ग्रामीण रुग्णालयातीलरिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू


- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि 10 : ग्रामीण रुग्णालय लांजा येथे 28 मंजूर पदांपैकी 21 पदे भरण्यात आलेली असून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ग्रामीण रुग्णालय लांजा येथील अधीक्षक पद रिक्त आहे. याबाबत विभागामार्फत चौकशी करून अहवाल मागविण्यात येईल. राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, अनिल देशमुख, शेखर निकम, राम सातपुते, आदिती तटकरे, देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार

 विधानसभा प्रश्नोत्तरे :

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार


- मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि. 10 : राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत येणारे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य सुनील राणे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत केलेल्या कामांचे कंत्राटदारांकडून वस्तू व सेवाकराची रक्कम कपात न केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री.महाजन म्हणाले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाबाबत संबंधित कंत्राटदाराचे अंतिम देयक अदा करताना नियमानुसार वस्तू व सेवाकराची कपात करून कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. कंत्राटदारांना काम देण्याअगोदर त्यांची बीड कॅपॅसिटी किती आहे हे तपासली जाते.


            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, प्रशांत बंब, आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतला.


०००००

दिलखुलास' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री

 दिलखुलास' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री 


देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत


राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा, कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा भक्कम करणारा पंचामृत अर्थसंकल्प


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 9 : राज्याच्या विकासाला गती देणारा, कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा भक्कम करणारा पंचामृत अर्थसंकल्प आज सादर केला असून या अर्थसंकल्पामुळे राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार निर्मिती, पर्यावरण, पर्यटन अशा विविध घटकांना बळकटी मिळणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


            विधिमंडळात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीतून त्यांनी अर्थसंकल्पाविषयी विस्तृत माहिती दिली आहे.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील शेतकरी बांधव, महिला, अनाथ बालके, दिव्यांग बांधव, समाजातीलवंचित, उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा अर्थसंकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकरी बांधव विकासाचाकेंद्रबिदू असून शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


            ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲप वर शुक्रवार दि. 10 व शनिवार दि. 11 व सोमवार दि. 13 मार्च 2023 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत 'दिलखुलास' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आरे’साठी सर्वंकष विकास आराखडालवकरच तयार करण्यात येईल

 आरे’साठी सर्वंकष विकास आराखडालवकरच तयार करण्यात येईल


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

            मुंबई, दि. 10 : गोरेगाव येथील आरे कॉलनीच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.


            सदस्य रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी ‘आरे’च्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांचे डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करण्यात येईल. ‘आरे’ हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांतर्गत येत असल्याने या भागाचा विकास करताना पर्यावरण विभागाची परवानगी असणे आवश्यक आहे.


            गोरेगाव चेकनाका येथे उभारण्यात येत असलेल्या प्रवेशद्वाराचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र याबाबतचा प्रस्ताव का प्रलंबित आहे हे तपासून पाहण्यात येईल. आरे परिसरात अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या नागरिकांना हटविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत समिती गठित करण्यात येईल. ‘आरे’ येथील तलावांमधील गाळ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून काढण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


            आरे वसाहतीत होणारे निष्कासन रोखण्यासाठी आरे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने सातत्याने निष्कासनाची कारवाई करण्यात येते. आरे वसाहत ही केंद्र शासनाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनक्षम क्षेत्र म्हणून घोषित केल्याने आरे वसाहतीतील पर्यटन स्थळांचे सुशोभिकरण करण्यासाठी असणाऱ्या मर्यादा विचारात घेऊन आरे दुग्ध वसाहतीच्या सुशोभिकरणासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. विखे – पाटील यांनी सांगितले.


०००

 

Featured post

Lakshvedhi