Tuesday, 7 March 2023

यंदाचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन नवी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 यंदाचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन नवी मुंबईत

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

            मुंबई, दि.७ :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३’ चे आयोजन करण्यात येत आहे. वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दि. ८ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत हे प्रदर्शन भरणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे, अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सिडको भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.


            ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळावी तसेच व्यवसायवृद्धी व्हावी, असा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे श्री.राऊत यांनी यावेळी सांगितले.


            दरवर्षी मुंबईतील वांद्रे या ठिकाणी भरविण्यात येणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा नवी मुंबईत भरविण्यात येत आहे. यामुळे नवी मुंबईकरांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२३ रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.


            महालक्ष्मी सरस प्रदर्शन अत्यंत नावीन्यपूर्ण आणि ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहोचविण्याचे अनोखे व्यासपीठ आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सुमारे ५११ स्टॉल असणार आहेत. यात महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून सुमारे ११९ स्टॉल असणार आहेत. तसेच नाबार्डचे ५० स्टॉल असतील. प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल्सचे भव्य फूड कोर्ट असणार आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसर, हातमागावर तयार केलेले कपड़े, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तू असणार आहेत. याशिवाय महिलांच्या आकर्षणाचे अनेक प्रकारचे दागिणे, लाकडी खेळणी, इतर राज्यातील दुर्मिळ वस्तू या प्रदर्शनात असणार आहेत. नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता यावा याकरिता संपूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असणार आहे. त्याचप्रमाणे सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी (प्ले एरिया) उभारण्यात आला आहे.


            आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष लक्षात घेऊन स्वतंत्र मिलेट दालन यात असणार आहे. खात्रीचे आणि प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ शहरवासियांना या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत.


            राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उमेद अभियान नेहमीच कार्यरत असते. महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करणे तसेच ग्रामीण भागातील महिलांना क्षमता विकास आणि कौशल्यवृद्धीसाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेद अभियानातून प्रशिक्षित महिला स्वयंसिद्ध व्हायला तयार आहेत. अनेक प्रकारचे व्यवसाय त्या करू लागल्या आहेत. या महिला स्वयंपाकघरातील गरजेच्या पदार्थांपासून ते एलईडी लाईट निर्मितीपर्यंत अनेक प्रकारची उत्पादने आता बाजारात आणत आहेत. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांना त्यांच्या वस्तू, उत्पादने, सहजपणे शहरी नागरिकांपर्यत पोहोचविता येतात. त्यांना हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची चांगली संधी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळते.


            ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांचे या प्रदर्शनाला नियमित स्वरुपात मार्गदर्शन लाभत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला हातभार लागावा यासाठी प्रदर्शनाला भेट देऊन शुद्ध खात्रीच्या वस्तू आणि पदार्थाची खरेदी करावी, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.


00000

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामेत्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामेत्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा


            मुंबई ७ : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.


            शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 


            ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.


            मुंबई, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.


000


 

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दर्जेदार मराठी चित्रपटांना उद्या अनुदान वाटप

 सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते

दर्जेदार मराठी चित्रपटांना उद्या अनुदान वाटप



            मुंबई, दि. ७ : मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या चित्रपट अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवार दि. ८ मार्च रोजी मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात येणार आहे.


            शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी ४१ चित्रपटांना पात्र ठरवले आहे. यातील चार चित्रपटांना ‘अ’ दर्जा आणि ३३ चित्रपटांना ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. तर चार चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार ‘अ’ दर्जा देऊन अनुदान वितरित करण्यात येणार आहे.


            या कार्यक्रमासाठी अनुदानप्राप्त चित्रपटाचा चमू उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाने दिली आहे.

स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे

 स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे

वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते उद्या उद्घाटन.

            मुंबई, दि.७: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन उद्या बुधवारी सकाळी ९ वाजता कामा व आल्ब्लेस रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.


            वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या या कक्षाच्या माध्यमातून पुढील काळात स्तन कर्करोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हा कक्ष प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत कार्यरत असेल.

जीवन ऐसे नाव

 










सण आयल्य रे होळी चां, कोळी नृत्य तर paha

 



होली आये रे, योगयोग से

 


Featured post

Lakshvedhi