Wednesday, 22 February 2023

नदी साक्षरतेविषयी 19 मार्चला मुंबईतभव्य नृत्यनाट्याचे आयोजन

 नदी साक्षरतेविषयी 19 मार्चला मुंबईतभव्य नृत्यनाट्याचे आयोजन.

            मुंबई, दि. 22 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या "एक भारत श्रेष्ठ भारत" या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना तथा खासदार हेमा मालिनी पावन गंगानदीविषयी नृत्यनाट्याचे भव्य सादरीकरण मुंबईत करणार आहेत. सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील एनसीपीए नाट्यगृहात 19 मार्च रोजी या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.


            खासदार हेमा मालिनी यांनी नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली, तेव्हा या कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या "चला जाणूया नदीला" या जलसाक्षरता उपक्रमाविषयीची माहिती खासदार हेमा मालिनी यांना यावेळी दिली गेली. "गंगा नदीविषयी आपले हे नृत्य - नाट्य देखील नदी साक्षरतेविषयी असल्याने ते ही या उपक्रमाचा भाग समजता येईल", असे हेमा मालिनी यावेळी म्हणाल्या.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या "एक भारत श्रेष्ठ भारत" या संकल्पनेअंतर्गत देशातील विविधतेतील सांस्कृतिक एकात्मता आणि भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये यांचे महत्त्व समाजासमोर पुन्हा एकदा अधोरेखित केले जाणार आहे. देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे पैलू उजळले जातील.


००००

लोकराज्य’चा पौष्टिक तृणधान्य विशेषांक प्रकाशित

 लोकराज्य’चा पौष्टिक तृणधान्य विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. 22 : ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून 2023 हे वर्ष साजरे होत आहे. या औचित्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्यच्या फेब्रुवारी 2023 महिन्याच्या ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.


तृणधान्ये मानवी आरोग्यासाठी महत्त्वाची असून ज्वारी, बाजरी आणि इतर भरड धान्यांची सर्वांगीण माहिती, महत्त्वाच्या पिकांची लागवड, विविध वाण, विविध खाद्यान्न, आहारातील महत्त्व, प्रक्रिया उद्योग, पौष्टिकता आणि भविष्यातील वाव, महाराष्ट्र मिलेट मिशन आदी विषयांवरील संशोधक आणि तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. यासोबतच ‘पर्यटन विशेष’ हा स्वतंत्र विभाग समाविष्ठ केला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, पर्यटन विभागाच्या योजना, याबरोबरच मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती या अंकात देण्यात आली आहे.


हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.


राज्यात पौष्टिक तृणधान्य पणन व मूल्यसाखळी कार्यक्रम राबविणार

- अपर मुख्य सचिव अनुप कुमार


        मुंबई, दि. 22 : आहारात ‍पौष्टिक तृणधान्यांचे (मिलेट) संतुलित प्रमाण व पर्यायी मिलेट उपलब्ध करून नवीन जीवनशैली विकसित करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात पौष्टिक तृणधान्य पणन व मूल्यसाखळी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले.


            ‘अन्न सुरक्षेतून पोषण सुरक्षेकडे’ या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पणन विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘मिलेट विपणन आणि मुल्यसाखळी’ या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी श्री. अनुप कुमार बोलत होते.


           मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे आयोजित केलेल्या ‘मिलेट महोत्सव’चे आज उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. अनुप कुमार म्हणाले, “तृणधान्यांना भविष्यासाठी अन्नाचा पर्याय बनविणे ही काळाची गरज आहे. या पीकांच्या आरोग्यविषयक फायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे आणि आहार साखळीमध्ये मिलेटचे स्थान परत मिळवणे गरजेचे असून आहारातील मिलेटचे प्रमाण व पर्यायी मिलेट उपलब्ध करुन नवीन ग्राहकवर्ग तयार करणे हे उद्दिष्ट्ये आहे”, असे सांगून ‘मिलेटचे महत्व’ या विषयावर सादरीकरण करण्यात केले.


            कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले म्हणाले, तृणधान्याला अधिक बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तृणधान्य पिकाच्या उत्पन्न व उत्पादन वाढीमुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना फायदा होईल. तृणधान्य पिकाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. या पिकाचे घटते क्षेत्र व आहारातील महत्व लक्षात घेऊन तृणधान्यापासून तयार केलेले पोषक खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यासाठी देशांतर्गत आणि परदेशी बाजारातील मागणी वाढेल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.


            ऋजुता दिवेकर म्हणाल्या, “भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा प्रमुख देश आहे. मिलेट खाद्यसंस्कृती आपली जुनी परंपरा आहे ती आपण जपली पाहिजे. सध्याच्या आहारातील मिलेटचे प्रमाण कमी झाले आहे, ते वाढविणे गरजेचे आहे. कमी दरात सहज उपलब्ध होणाऱ्या जंक फुडच्या ठिकाणी मिलेट फूड उपलब्ध झाले पाहिजेत. विमानतळ, रेल्वे, बसस्थानक या सारख्या ठिकाणीसुद्धा मिलेट फूड उपलब्ध झाले पाहिजे. त्यामुळे लोकांना आवड निर्माण होईल. मिलेट आहार हा आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, असे सांगून ज्वारी, बाजरी, नाचणी याचा आरोग्यासाठी कसा लाभ होतो हे त्यांनी यावेळी सांगितले.


            कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन राज्यगीताने करण्यात आली. दरम्यान अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी संपादन केलेल्या ‘आपले तृणधान्य ओळखावे’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


            यावेळी पणन विभागाचे सह सचिव डॉ.सुग्रीव धपाटे, कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक विनय आवटे, पणन महामंडळाचे सहसंचालक विनायक कोकरे, वखार महामंडळाचे सहव्यवस्थापक रमेश शिंगटे, मिलेट तज्ज्ञ सुनील कराड, मिलेट विपणन तज्ज्ञ निलम जोरावर, वरिष्ठ शास्त्रज्ञ सुरेश साखरे, मिलेट उद्योजक तात्यासाहेब फडतरे, महेश लोंढे व संबंधित अधिकारी, मिलेट उत्पादक, शेतकरी उत्पादन संस्था प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


000

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृह इमारतींचे

 मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृह इमारतींचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

            शिर्डी, दि. 22 :- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोणी येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतुक केले.


            यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे आदी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली‌. समाजकल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या वसतिगृह इमारतींची वैशिष्ट्ये सांगितली‌. मौजे हसनापूर शिवारात मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या दोन्ही नवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येकी २ एकर असे ४ एकरांवर ५४ हजार चौरस फूट बांधकाम करण्यात आले आहे. तळमजल्यासह तीन मजल्यांची सुसज्ज, सुविधायुक्त इमारत बांधण्यात आली आहे. मुलांच्या वसतिगृहासाठी १० कोटी ६५ लाख व मुलींच्या वसतिगृहासाठी १० कोटी ५९ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त श्री.नारनवरे यांनी यावेळी दिली.


००००

महसूल विभागाचे बळकटीकरण करणार

 महसूल विभागाचे बळकटीकरण करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन

            शिर्डी, दि. 22 : महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोणी येथे केले. जनतेची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधावा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.


            राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मागील सहा महिन्यांत जनतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयात महसूल विभागाचे सर्वाधिक निर्णय आहेत. शासनाचे निर्णय राज्याच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. राज्याच्या उत्पन्नाच्या २५ टक्के महसूल हा या विभागाचा असतो. महाराजस्व मोहीम, ई-प्रॉपर्टी कार्ड, ४ लाख फेरफार नोंदी ऑनलाईन करणे, ड्रोन द्वारे जमिनीची मोजणी, जिल्ह्याचे नकाशे डिजिटल करणे असे सर्वसामान्यांच्या हिताचे अत्याधुनिक प्रकल्प महसूल विभाग राबवित आहे.


            गावठाण जमाबंदी प्रकल्प देशात प्रथम महाराष्ट्रात राबविला जात आहे. देशात महाराष्ट्राचा महसूल विभाग प्रथम क्रमांकावर आहे. राज्याच्या वाळू धोरणात अधिक सुटसुटीतपणा आणण्याची आवश्यकता आहे. गाळमुक्त धरण, गाळमुक्त नदी ही संकल्पना राबविण्याची गरज आहे. यावर या महसूल परिषदेत निश्चितच चर्चा होईल‌, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेशी थेट संवाद साधतात. याचा आदर्श महसूल अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. महसूल कारभार पारदर्शी व गतिमान होण्यासाठी जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला हा घटक केंद्रबिंदू ठेवत थेट संवादावर भर दिला पाहिजे. लोकप्रतिनिधी व प्रशासन ही विकासाची दोन चाके समान वेगाने धावली तरच राज्याच्या विकासाला गती मिळेल. राज्याच्या विकासासाठीच्या अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना केंद्र सरकार मदत करत आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


निळवंडे प्रकल्पास ५ हजार, १७७ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता


            अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता तसेच महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पास ५ हजार, १७७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील ६८ हजार, ८७८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. शासनाने आतापर्यंत अशाप्रकारच्या २२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.


एका क्लिकवर सर्वसामान्यांना अनेक महसूली सुविधा देणार - महसूलमंत्री श्री. विखे पाटील


            महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, महसूल विभाग लोकाभिमुख काम करत आहे‌. सलोखा योजना , महाराजस्व अभियान, डिजिटल मॅपींग, ई-प्रॉपर्टी कॉर्ड हे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागाकडून ५५ हजार कोटींचा महसूल राज्याला मिळतो. येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वसामान्यांना एका क्लिकवर अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल. महसूल विभागाच्या वतीने राज्यातील जनतेसाठी हितकारक ठरावेत,असे धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने ही महसूल परिषद लोणी येथे आयोजित करण्यात आली असल्याचे महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने करण्यात आली.त्यानंतर 'ई-चावडी' संकेतस्थळाचे लोकार्पण व ' ई-पीक पाहणी संख्यात्मक अहवाल' व 'महसूल, वन विभागाचे लेखाविषयक शासन परिपत्रके' या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


            या राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या उद्घाटन समारंभास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.


पुणे येथील ‘अमृत’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय जोशी नियुक्तत

 पुणे येथील ‘अमृत’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय जोशी नियुक्तत 

            मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) या पुणे येथील संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर अपर जिल्हाधिकारी विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नागरी सेवा मंडळाने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पदोन्नतीने शिफारस केलेल्या इतरही बदल्या पुढील प्रमाणे आहेत :-


            डॉ.राणी ताटे-नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (करमणूक), अनिल खंडागळे- अमरावती येथील विभागीय लोकसेवा हक्क आयोग येथे उप सचिव, रविकांत कटकधोंड- मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी, संजीव जाधव- अपर जिल्हाधिकारी, अकोला, देवदत्त केकाणे- अपर जिल्हाधिकारी, धुळे, अनिल खंडागळे- विभागीय लोकसेवा हक्क आयोग, अमरावती येथे उप सचिव


-----०-----


बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स,हॉट एअर बलूनच्या उड्डाणास १४ मार्चपर्यंत बंदी.

 बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स,हॉट एअर बलूनच्या उड्डाणास १४ मार्चपर्यंत बंदी.

            मुंबई, दि. २२ : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅराहॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअरच्या विनापरवाना उड्डाणाला १४ मार्च पर्यंत बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी विशाल ठाकूर यांनी जारी केले आहेत.


            संभाव्य घातपात रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात अशा घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक असल्याने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १४ मार्च २०२३ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उपआयुक्त(अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील.


            हा आदेश १४ मार्च २०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती दंडास पात्र असेल.


0000

ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार५ हजार १७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता ----

 ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार५ हजार १७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता

----

१८२ गावांना सिंचनाचा लाभ

            अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.


            प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरु होऊन तो ८५ किलोमीटर लांब आहे. नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा ९७ किलोमीटर आहे. या दोन्ही कालव्यातून ६८ हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. २०२७ पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील १८२ गावांना सिंचनाचा लाभ होईल.



Featured post

Lakshvedhi