लोकराज्य’चा पौष्टिक तृणधान्य विशेषांक प्रकाशित
मुंबई, दि. 22 : ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून 2023 हे वर्ष साजरे होत आहे. या औचित्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्यच्या फेब्रुवारी 2023 महिन्याच्या ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
तृणधान्ये मानवी आरोग्यासाठी महत्त्वाची असून ज्वारी, बाजरी आणि इतर भरड धान्यांची सर्वांगीण माहिती, महत्त्वाच्या पिकांची लागवड, विविध वाण, विविध खाद्यान्न, आहारातील महत्त्व, प्रक्रिया उद्योग, पौष्टिकता आणि भविष्यातील वाव, महाराष्ट्र मिलेट मिशन आदी विषयांवरील संशोधक आणि तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. यासोबतच ‘पर्यटन विशेष’ हा स्वतंत्र विभाग समाविष्ठ केला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, पर्यटन विभागाच्या योजना, याबरोबरच मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती या अंकात देण्यात आली आहे.
हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.
राज्यात पौष्टिक तृणधान्य पणन व मूल्यसाखळी कार्यक्रम राबविणार
- अपर मुख्य सचिव अनुप कुमार
मुंबई, दि. 22 : आहारात पौष्टिक तृणधान्यांचे (मिलेट) संतुलित प्रमाण व पर्यायी मिलेट उपलब्ध करून नवीन जीवनशैली विकसित करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात पौष्टिक तृणधान्य पणन व मूल्यसाखळी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले.
‘अन्न सुरक्षेतून पोषण सुरक्षेकडे’ या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पणन विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘मिलेट विपणन आणि मुल्यसाखळी’ या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. अनुप कुमार बोलत होते.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे आयोजित केलेल्या ‘मिलेट महोत्सव’चे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. अनुप कुमार म्हणाले, “तृणधान्यांना भविष्यासाठी अन्नाचा पर्याय बनविणे ही काळाची गरज आहे. या पीकांच्या आरोग्यविषयक फायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे आणि आहार साखळीमध्ये मिलेटचे स्थान परत मिळवणे गरजेचे असून आहारातील मिलेटचे प्रमाण व पर्यायी मिलेट उपलब्ध करुन नवीन ग्राहकवर्ग तयार करणे हे उद्दिष्ट्ये आहे”, असे सांगून ‘मिलेटचे महत्व’ या विषयावर सादरीकरण करण्यात केले.
कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले म्हणाले, तृणधान्याला अधिक बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तृणधान्य पिकाच्या उत्पन्न व उत्पादन वाढीमुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना फायदा होईल. तृणधान्य पिकाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. या पिकाचे घटते क्षेत्र व आहारातील महत्व लक्षात घेऊन तृणधान्यापासून तयार केलेले पोषक खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यासाठी देशांतर्गत आणि परदेशी बाजारातील मागणी वाढेल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
ऋजुता दिवेकर म्हणाल्या, “भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा प्रमुख देश आहे. मिलेट खाद्यसंस्कृती आपली जुनी परंपरा आहे ती आपण जपली पाहिजे. सध्याच्या आहारातील मिलेटचे प्रमाण कमी झाले आहे, ते वाढविणे गरजेचे आहे. कमी दरात सहज उपलब्ध होणाऱ्या जंक फुडच्या ठिकाणी मिलेट फूड उपलब्ध झाले पाहिजेत. विमानतळ, रेल्वे, बसस्थानक या सारख्या ठिकाणीसुद्धा मिलेट फूड उपलब्ध झाले पाहिजे. त्यामुळे लोकांना आवड निर्माण होईल. मिलेट आहार हा आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, असे सांगून ज्वारी, बाजरी, नाचणी याचा आरोग्यासाठी कसा लाभ होतो हे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन राज्यगीताने करण्यात आली. दरम्यान अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी संपादन केलेल्या ‘आपले तृणधान्य ओळखावे’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पणन विभागाचे सह सचिव डॉ.सुग्रीव धपाटे, कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक विनय आवटे, पणन महामंडळाचे सहसंचालक विनायक कोकरे, वखार महामंडळाचे सहव्यवस्थापक रमेश शिंगटे, मिलेट तज्ज्ञ सुनील कराड, मिलेट विपणन तज्ज्ञ निलम जोरावर, वरिष्ठ शास्त्रज्ञ सुरेश साखरे, मिलेट उद्योजक तात्यासाहेब फडतरे, महेश लोंढे व संबंधित अधिकारी, मिलेट उत्पादक, शेतकरी उत्पादन संस्था प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment