Wednesday, 8 February 2023

कामगार पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

 कामगार पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

- कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे

राज्यस्तरीय कामगार केसरी, कुमार केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३ विजेत्यांना बक्षीस वितरण.

            मुंबई, दि. ८ : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या पाल्यांना कला, क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कामगारांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे केले.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाच्यावेळी मंत्री डॉ. खाडे बोलत होते. यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, मुंबई शहर तालिम मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, महेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

            मंत्री डॉ. खाडे म्हणाले, राज्यात राजर्षि शाहू महाराज यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यांचा वारसा राज्याने जोपासला आहे. कुस्ती क्षेत्रातही नवनवीन बदल आणि तंत्रज्ञान आले आहे. मातीवरील कुस्ती आता मॅटवर होत आहे. हा बदल कुस्तीपटूंनी स्वीकारावा. खेळ म्हटला, की यश- अपयश येत राहते. मात्र, खेळाडूंनी अपयशाने खचून न जाता यशासाठी पुन्हा नव्याने तयारी करावी. कामगार कल्याण विभागाचे आयुक्त श्री. इळवे यांनी प्रास्ताविकातून या स्पर्धेची माहिती दिली. माधवी सुर्वे यांनी आभार मानले.

अरू खांडेकर, कालिचरण सोलनकर विजेते

            या राज्यस्तरीय कुमार केसरी स्पर्धेत अरू हिंदुराव खांडेकर, तर राज्यस्तरीय कामगार केसरी स्पर्धेत कालिचरण झुंजार सोलनकर यांनी विजेतेपद पटकावले. त्यांना अनुक्रमे चांदीची गदा, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि ५० व ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय अभिनंदन बोडके याने द्वितीय, ओंकार शिवाजी मगदूम याने तृतीय, तर विवेक कृष्णाजी धावडे याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. दुसऱ्या गटात भारत संजय पवार याने द्वितीय, प्रथमेश बाबा गुरव तृतीय, तर तानाजी सोपानराव विटकर याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

00000

वंदे मातरम्” नंतर “जय जय महाराष्ट्र माझा”ने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार

 वंदे मातरम्” नंतर “जय जय महाराष्ट्र माझा”ने

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. ८ : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि 27 फेब्रुवारी ते शनिवार 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, दि 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये वंदे मातरम् ने होते. आता वंदे मातरम् नंतर राज्याचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गायन केले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

            विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आज घेण्यात आली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी "वंदे मातरम्' नंतर "जय जय महाराष्ट्र माझा" हे राज्यगीत म्हटले जाणार आहे.

            भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून "जय जय महाराष्ट्र माझा - गर्जा महाराष्ट्र माझा" हे कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरण "महाराष्ट्राचे राज्यगीत" म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्फूर्ती व प्रेरणा देणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे गीत आहे.

            “जय जय महाराष्ट्र माझा” या राज्यगीतातील एकूण 2 चरणे वाजविण्यात येणार असून याचा अवधी 1 मिनिट 41 सेकंद असेल. या 2 चरणांचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून अवधूत गुप्ते, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे आणि वैशाली माडे यांनी हे गायले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र गीत येत्या दि. १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. राज्यगीताचे शब्द पुढीलप्रमाणे आहेत -

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा || धृ ||

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥

महाराष्ट्र राज्यगीत गायन, वादन संदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी :-

1. राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.

2. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांत सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.

3. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले जाईल.

4. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा / प्रार्थना / राष्ट्रगीत यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.

5. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था,खासगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.

6. राज्यगीत सुरु असताना सर्वानी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्यगीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.

7. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा बाळगण्यात यावे. हे गीत वाजविताना/ गाताना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.

8. वाद्य संगीतावर आधारित या गीताची वाद्यधून पोलिस बॅंडमार्फत वाजविता येईल.

9. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.

10. या अधिकृत राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

०००००

देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार

 देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. ८ :- महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढा देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होतांना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

            ‘न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा’ या मराठी वृत्त वाहिनीचा शुभारंभ श्री. फडणवीस यांचा हस्ते आज मुंबईत करण्यात आला. त्यावेळी "संकल्प महाराष्ट्राचा" या विशेष कार्यक्रमात श्री.फडणवीस यांनी आपले विचार मांडले.

            श्री.फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा केवळ मार्ग नसून तो आर्थिक महामार्ग आहे. या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. रस्ते विकास हा देशाच्या विकासात मोठी भूमिका पार पाडतो, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. यासाठी श्री.फडणवीस यांनी अमेरिकेचे उत्तम उदाहरण दिले की, अमेरिकेतील रस्ते उत्तम असल्याने अमेरिका प्रगती करू शकला. त्यामुळे नागपूर - गोवा, विरार - अलिबाग हे कॉरिडॉर लवकरच तयार केले जाईल, असे ते म्हणाले.

            आज मुंबईत मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वहन होत आहे. मेट्रो -३ मुळे जवळपास १७ लाख लोकांचे वहन होईल. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबई पायाभूत सोयी सुविधांमध्ये फार पुढे असणार आहे, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

            श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प असून यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या पात्रात यावे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नळगंगा - वैनगंगा प्रकल्पांमुळे खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत श्री.फडणवीस यांनी व्यक्त केले.

            आज राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्याच बरोबर, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून लवकरच जागतिक बँकेकडून ४ हजार करोड रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर शेती मालाबरोबर अन्य बाबींचे निर्यात करण्यासाठी वाढवण बंदर नव्याने तयार करण्यात येत आहे. या वाढवण बंदरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास श्री.फडणवीस यांनी या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केला.

0000

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

 महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा.

          मुंबई, दि. 8 : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले असून त्यांनी आज रेवदंडा येथे आप्पासाहेबांची भेटही घेतली.  

            14 मे 1946 रोजी जन्मलेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेली 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा निर्मूलन, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.

            डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरित्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवानंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.   

            रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

००००

मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

 मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत

 5 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश.

            मुंबई, दि. 8 : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये शस्त्रास्त्रे, हत्यार, संक्षारक पदार्थ किंवा स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत कलम 37 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.

            बृहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले असून कलम 37 चे उप कलम (1) आणि (2) कलम 2 चे पोटकलम (6) आणि कलम 10 चे पोटकलम (2) महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 द्वारे 04 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्ण बृहन्मुंबईमध्ये विविध गोष्टींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

            या प्रतिबंधात्मक आदेशानुसार बृहन्मुंबईमध्ये शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, बिना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे बाळगण्यावर मनाई करण्यात आली आहे. बंदुकीचे परवानाधारक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून, अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी असलेल्यांना यातून वगळण्यात आले आहे.

            कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे, व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे, बृहन्मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याच्या मते, शालिनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.

            जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन करत कोणताही उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र घेऊन जात असेल, अशा व्यक्तींना कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यामार्फत निशस्त्र किंवा त्यांच्याकडील वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त केले जाईल.

            हा आदेश कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत किंवा नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांना किंवा त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार, शस्त्रे बाळगण्यासाठी लागू होणार नाही. तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे साडेतीन फूटापर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगत आहेत, अशांना लागू होणार नाही.

            दि. 5 मार्च 2023 नंतर या आदेशाची मुदत संपली तरीही कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.

00000

दिलखुलास' कार्यक्रमात उद्योग विभागाचेप्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात उद्योग विभागाचेप्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 9, शुक्रवार दि. 10 आणि शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

            महाराष्ट्राने नेहमीच नावीन्यपूर्ण लोकाभिमुख संकल्पनांचा अंगीकार करून देशासाठी एक आदर्श वस्तूपाठ ठेवला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र हे देशात उद्योजकांचे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, त्यांना लागणारे मनुष्यबळ, रोजगार निर्मिती, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेच्या संमेलनात महाराष्ट्राचे उभारण्यात आलेले दालन आणि उद्योगाला सुलभ परवानग्या देण्यासाठी सुरू करण्यात आलेला मैत्री कक्ष होय. दावोस येथे झालेल्या परिषदेत राज्यात किती गुंतवणूक करण्यात आली आणि मैत्री कक्षाचे स्वरूप काय आहे, अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती, प्रधान सचिव श्री. कांबळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरूवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

            राज्याने नेहमीच नावीन्यपूर्ण लोकाभिमुख संकल्पनांचा अंगीकार करून देशासाठी एक आदर्श वस्तूपाठ ठेवला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र हे देशात उद्योजकांचे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, त्यांना लागणारे मनुष्यबळ, रोजगार निर्मिती, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेच्या संमेलनात महाराष्ट्राचे उभारण्यात आलेले दालन आणि उद्योगाला सुलभ परवानग्या देण्यासाठी सुरू करण्यात आलेला मैत्री कक्ष होय. दावोस येथे झालेल्या परिषदेत राज्यात किती गुंतवणूक करण्यात आली आणि मैत्री कक्षाचे स्वरूप काय आहे, अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती प्रधान सचिव श्री. कांबळे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

 मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत

 5 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

            मुंबई, दि. 8 : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये शस्त्रास्त्रे, हत्यार, संक्षारक पदार्थ किंवा स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत 5 मार्चपर्यंत कलम 37 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.

            बृहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले असून कलम 37 चे उप कलम (1) आणि (2) कलम 2 चे पोटकलम (6) आणि कलम 10 चे पोटकलम (2) महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 द्वारे 04 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च 2023 पर्यंत पूर्ण बृहन्मुंबईमध्ये विविध गोष्टींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

            या प्रतिबंधात्मक आदेशानुसार बृहन्मुंबईमध्ये शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, बिना परवाना बंदुका, चाकू, काठ्या किंवा लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाठी वापरली जाऊ शकते अशी हत्यारे बाळगण्यावर मनाई करण्यात आली आहे. बंदुकीचे परवानाधारक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून, अशी शस्त्रे वाहून नेण्यासाठी विशिष्ट परवानगी असलेल्यांना यातून वगळण्यात आले आहे.

            कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे, व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे, बृहन्मुंबई शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याच्या मते, शालिनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करून सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.

            जर कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही वस्तूसह सशस्त्र जात असेल किंवा अशा प्रतिबंधाचे उल्लंघन करत कोणताही उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र घेऊन जात असेल, अशा व्यक्तींना कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यामार्फत निशस्त्र किंवा त्यांच्याकडील वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त केले जाईल.

            हा आदेश कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेत किंवा नोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांना किंवा त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार, शस्त्रे बाळगण्यासाठी लागू होणार नाही. तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे साडेतीन फूटापर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगत आहेत, अशांना लागू होणार नाही.

            दि. 5 मार्च 2023 नंतर या आदेशाची मुदत संपली तरीही कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.

00000

Featured post

Lakshvedhi