Wednesday, 8 February 2023

देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार

 देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. ८ :- महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढा देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होतांना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


            ‘न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा’ या मराठी वृत्त वाहिनीचा शुभारंभ श्री. फडणवीस यांचा हस्ते आज मुंबईत करण्यात आला. त्यावेळी "संकल्प महाराष्ट्राचा" या विशेष कार्यक्रमात श्री.फडणवीस यांनी आपले विचार मांडले.


            श्री.फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा केवळ मार्ग नसून तो आर्थिक महामार्ग आहे. या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. रस्ते विकास हा देशाच्या विकासात मोठी भूमिका पार पाडतो, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. यासाठी श्री.फडणवीस यांनी अमेरिकेचे उत्तम उदाहरण दिले की, अमेरिकेतील रस्ते उत्तम असल्याने अमेरिका प्रगती करू शकला. त्यामुळे नागपूर - गोवा, विरार - अलिबाग हे कॉरिडॉर लवकरच तयार केले जाईल, असे ते म्हणाले.


            आज मुंबईत मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वहन होत आहे. मेट्रो -३ मुळे जवळपास १७ लाख लोकांचे वहन होईल. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबई पायाभूत सोयी सुविधांमध्ये फार पुढे असणार आहे, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.


            श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प असून यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या पात्रात यावे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नळगंगा - वैनगंगा प्रकल्पांमुळे खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत श्री.फडणवीस यांनी व्यक्त केले.


            आज राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्याच बरोबर, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून लवकरच जागतिक बँकेकडून ४ हजार करोड रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर शेती मालाबरोबर अन्य बाबींचे निर्यात करण्यासाठी वाढवण बंदर नव्याने तयार करण्यात येत आहे. या वाढवण बंदरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास श्री.फडणवीस यांनी या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केला.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi