Thursday, 2 February 2023

मुख्यमंत्री शिष्यवृत्ती निधी १८ लाखांवरुन १ कोटी रुपये

 मुख्यमंत्री शिष्यवृत्ती निधी १८ लाखांवरुन १ कोटी रुपये

महाराष्ट्र एनसीसी पथकाचे यश गौरवास्पद


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने केलेली कामगिरी दिमाखदार आणि गौरवास्पद असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिष्यवृत्ती निधी १८ लाख रुपयांवरुन १ कोटी रुपये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.


            सह्याद्री अतिथीगृहात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या १२५ एनसीसी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कर्नल निलेश पाथरकर, ब्रिगेडिअर लाहेरी, राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी, प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्रसैनिक आदी उपस्थित होते. या सर्वांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पंतप्रधान बॅनर सुपूर्द करण्यात आला, तसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला.


            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, एनसीसीच्या पथकाने नवी दिल्ली येथील संचलनात उत्कृष्ट कामगिरी करून प्रधानमंत्री ध्वज मिळवून महाराष्ट्राची शान वाढवली. महाराष्ट्राचा प्रत्येक युवक हे यश पाहून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यात सहभागी होईल.


            महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य आहे आणि प्रगत राहील. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, कुशल प्रशासक अशा राजाचा वारसा लाभला आहे. राज्याच्या या युवकांनी कठोर परिश्रम करुन यश प्राप्त केलेले आहे. त्याना उत्कृष्ट प्रशिक्षण देवून मार्गदर्शन करणारे अधिकारी लाभले असल्याने हे यश सुकर झाले. भविष्यात यापुढेही असेच यश मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.शिंदे यांनी एनसीसी छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.


             एनसीसीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील. भविष्यात ही अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी व्यास यांनी केले, तर आभार मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी मानले

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करावा

 पणन विभागातील कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 1 : राज्यातील बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेतयादृष्टीने सर्व बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा आणि त्यामाध्यमातून दर्जेदार सोयी-सुविधांची निर्मिती करावीअसे निर्देश मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

            सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पणन विभागाचा आढावा घेण्यात आला. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्य वखार महामंडळपणन महासंघकृषी राज्य पणन मंडळग्राहक महासंघकापूस उत्पादक पणन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            काळाची गरज लक्षात घेता बाजार समित्यांचा पुनर्विकास करून तिथे येणारे शेतकरीकष्टकरीकामगार यांच्यासाठी सोयी-सुविधा तयार करण्यात याव्यात.  पाणीस्वच्छताअंतर्गत रस्ते आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

            पणन महासंघाच्या माध्यमातून शेतमालाला उत्तम भाव देण्यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय खतांच्या निर्मितीला चालना द्यावी तसेच शेतीपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याला प्राधान्य द्यावेअसे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

            समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचा विस्तार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी  वखार महामंडळपणन महासंघकृषी राज्य पणन मंडळग्राहक महासंघकापूस उत्पादक पणन महासंघाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. 

००००

अनुभव ची सत्यता

 *कुणी आपल्याला त्याचा अनुभव सांगितला की आपल्यालाही वाटतं की, मला पण तो अनुभव यावा. कुणी म्हटलं की हे स्तोत्र खूप प्रभावी आहे, हा मंत्र खूप भारी आहे, की लागले मागे त्या मंत्राच्या... अनुभव ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट असते, त्याला आला तसाच आपल्याला कसा येईल बरं?? प्रत्येकाचं प्रारब्ध, पापपुण्य, संचित, भाव हा वेगवेगळा असणार की नाही?* 


*तुमची जिथं श्रद्धा, प्रेम आहे ना त्याच शक्तीचा तुम्हाला अनुभव येईल नेहमी. असं कोण न कोण तुम्हाला भेटत राहीलच आणि त्यांचे अनुभवही सांगत राहतीलच, त्यानं एवढं हुरळून जाऊ नये*


*अनुभव हा श्रद्धेतून जन्म घेत असतो. आपण जी उपासना करतोय, त्यावरच आपली श्रद्धा नाही, त्यामुळेच अनुभव येत नाही... विचित्र मानसशास्त्र आहे.*


*काही दिवस रामरक्षा म्हणायची, कुणी अजून काही म्हटलं की शाबरी कवच म्हणायचे. कुणी अजून काही... आयुष्य संपून जाईल, पण काहीच मिळणार नाही. जर १०० फुटांवर पाणी लागणार असेल तर एकाच ठिकाणी १०० फूट खणाल का १ फुटाचे १०० खड्डे खणाल??*


*तुलना करायची घाणेरडी सवय असते प्रत्येकाला. प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य असतंच की नाही?? गुलाबाचं फुल डोक्यात घालतात, झेंडूच्या माळा करतात, मोगऱ्याचा गजरा करतात. झेंडूचा गजरा करायचा प्रयत्न नका करू. प्रत्येक उपासना आपल्या जागी श्रेष्ठ आहे, पण आपल्या विचारानेच त्याला आपण कमीपणा आणतो. मन हे फार बेइमान असतं बरं. आपलं काम झालं नाही की देवच बदलायचा, हे कुठलं गणित? शेवटी सगळ्या नद्या समुद्रालाच जाऊन मिळतात ना??*


*एकदा समर्थ श्रीरामदास स्वामींकडून ज्याने गुरुमंत्र घेतला होता, असा माणूस श्री तुकाराम महाराजांकडे आला आणि म्हणाला की, "मला गुरुमंत्र द्यावा." तुकाराम महाराजांनी आपल्या अंतर्ज्ञानाने सगळं जाणलं आणि म्हणाले की, "ठीक आहे, पण तू तुझ्या गुरूंना मंत्र परत देऊन ये, मग मी देतो." मग आला हा समर्थांकडे आणि म्हणाला की, "मला तुमचा गुरुमंत्र परत करायचा आहे, याच्यात ताकद नाही." समर्थ हसले आणि म्हणाले की, "ठीक आहे. जा आणि चूळ भरून टाक त्या दगडावर." त्यानं तसं करताच त्या दगडावर सुवर्ण अक्षरात गुरुमंत्राची अक्षरे उमटली. मग त्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने समर्थांची माफी मागितली.*


*चंचलता आणि अस्थिरता हे मनाचं स्वरूप आहे. जितकी घाई कराल, तितकाच उशीर होत जाईल, हे विचित्र सत्य आहे. फलाकांक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला अधीर बनवते. जितकं मन फळासाठी आतुर, तितकंच ते श्रद्धाहीन असतं.*


*🌺श्री स्वामी समर्थ🌺*

बांधा आंब्याची पाने चे तोरण,करेल आरोग्याचे रक्षण

 आंब्याची पाने कापल्यानंतर किमान दोन दिवस ऑक्सिजन सोडत राहतात. म्हणूनच ते सर्व सण आणि कार्ये मध्ये वापरले जातात विशेषत: जेव्हा आसपास बरेच लोक असतात तेव्हा हवा ताजी ठेवण्यासाठी. आपली संस्कृती आंब्याची पाने आपल्या दारात बांधण्यास का प्रोत्साहन देते. या व्हिडिओमध्ये प्रयोगशाळेत आंब्याचे पान कापून सूक्ष्मदर्शकाखाली ठेवले आहे. पानांमधून बाहेर पडणारे बुडबुडे ऑक्सिजन असतात. आपल्या ऋषीमुनींना हे हजारो वर्षांपूर्वी माहीत होते आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचा एक भाग बनवला.


आपल्या बऱ्याच सांस्कृतिक पद्धतींचा वैज्ञानिक अर्थ होता ज्याची आपल्याला माहिती नाही. सनातन हिंदु संस्कृती |


>

Wednesday, 1 February 2023

सगळेच म्हातारे थोडे क्रॅक असतात !!*

 *सगळेच म्हातारे थोडे क्रॅक असतात !!*


काही आऊट ऑफ

ट्रॅक असतात

काही फारच

फ्रॅंक असतात

काही सपोर्टिंग

आर्क असतात 

काही अडगळीतले

रॅक असतात.

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही रगेल असतात

काही रंगेल असतात

काही बनेल असतात

काही टगेल असतात.

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही खवय्ये असतात

काही गवय्ये असतात

काही लढवय्ये असतात

काही नचैय्ये असतात ( बायकोच्या तालावर)

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही फक्कडबाज असतात

काही पिअक्कडबाज असतात

काही अक्कडबाज असतात

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही खवट असतात

काही तिखट असतात 

काही आंबट ( शौकीन ) असतात

काही खारट असतात

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही जण अस्वस्थ असतात

काही जण नेमस्त असतात

काही स्वतःच्यात मस्त असतात

काही समाजातील प्रस्थ असतात

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही इतिहासात रमले असतात

काही वर्तमानात हरवले असतात

काही उद्याच्या चिंतेत भरकटले असतात

पण सगळेच डिपेंडन्सीच्या जाळ्यात

अडकले असतात.

कारण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*

जागतिक मंदी थोपवणारा सकारात्मक अर्थसंकल्प -

 जागतिक मंदी थोपवणारा सकारात्मक अर्थसंकल्प - ललित गांधी


जागतिक मंदी असतांनाही देशात जागतिक मंदीचा परिणाम जाणवू न देता मंदी थोपवणारा सकारात्मक अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. पुढे ते म्हणाले, या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, पर्यटन व कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसत आहे. व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी कोविड काळात नुकसान झालेल्या व्यापार्‍यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. सुक्ष्म, लघु व व मध्यम उद्योगांसाठी 9000 कोटी रूपयांचा कर्जपुरवठा करून त्याकरीता वसुलीसाठीचे संरक्षण योजना 1 एप्रिल पासून अमलात येणार आहे, तसेच बॅटरीवर चालणार्‍या आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणारे कच्च्या मालाच्या आयातीवर स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली. अर्थसंकल्पातून व्यापार उद्योग क्षेत्राला जीएसटी संबंधी अथय योजना व सुधारणा अपेक्षित होत्या त्या मिळाल्या नाही.

देशात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींची तरतूद व देशांतर्गत विमानसेवेसाठी 50 विमानतळ उभारणे, रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद, प्रधानमंत्री कौशल्य योजनेत पुढच्या तीन वर्षात नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजानुसार युवकांचे कौशल्य विकास करण्यावर भर देणार असून त्यासाठी विविध राज्यांमध्ये 33 किल डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी,

1 कोटी शेतकर्‍यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, यासाठी दहा हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना, छोट्या सहकारी संस्थांना प्रगतीसाठी प्रोत्साहन देणार या योजनांमधून अप्रत्यक्षरीत्या व्यापार उद्योगांना फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे. एक जिल्हा एक उत्पादनासाठी मॉल उभारणार राज्याच्या राजधानीमध्ये राज्याच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी युनिटी मॉल उभारणार यामुळे स्थानिक उत्पादनांना चालना व बाजारपेठ देण्याचा प्रयत्न चांगला आहे.

बचतगटांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम सुरू

 बचतगटांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम सुरू

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. १ : बचतगटांच्या माध्यमातून महिला उत्कृष्ट काम करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान आणि सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आजपासून राज्यात सुरू होणाऱ्या जेंडर ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम (जी. टी. एम्.) उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी मदतच होणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


           राजभवन येथे आज महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) राबवित असलेल्या नव तेजस्विनी 'जेंडर ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझमच्या अंमलबजावणी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम आयफॅडच्या विशेषतज्ञ नदिया बेल्टचिका, जी टी एम च्या भारत प्रमुख मीरा मिश्रा, आयफॅडचे रोम, इटली व भारतातील प्रतिनिधी तसेच बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी व वॉशिंग्टन विद्यापीठातील, सनियंत्रण आणि मूल्यमापन तज्ज्ञ, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


           राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल अॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणारा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ उत्कृष्टपणे राबवेल. आगामी सहा वर्षात या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड शंभर टक्के होते. त्यामुळे बँका देखील त्यांना कर्ज देण्यासाठी उत्सुक असतात. महिलांच्या विकासासाठी जागतिक स्तरावरून होत असलेले सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. शासनाकडून देखील महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम व योजना राबवल्या जातात. कोणत्याही योजनेचा लाभार्थी असेल त्याला अनुदान देताना थेट ग्राहकांच्या खात्यात दिले जाते.


             महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. साहजिकच महिलांचे विकासात योगदान वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही देशाची प्रगती आहे. आज बचत गट काम करताना व्यापक स्वरूपात काम करू शकतात. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष म्हणून जाहीर केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात पौष्टिक तृणधान्यांना आरोग्य विषयक महत्व व आहारातील वापर वाढवण्याकरता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन महिला बचत गटाने देखील पौष्टिक तृणधान्य या संस्कृतीला पुढे नेणे गरजेचे आहे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.


आयफेडचे ग्रामविकासात महत्त्वाचे योगदान : नदिया बेल्टचिका


            ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम आयफॅडच्या विशेषतज्ञ नदिया बेल्टचिका म्हणाल्या की,इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंटचे ग्राम विकासामध्ये खूप मोठे योगदान आहे. 'जी. टी. एम्.' साठी निवड करण्यात आलेल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जी. टी. एम. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात आगामी सहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येईल.


जी. टी. एम. या उपक्रमासाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य


- प्रधान सचिव आय. ए. कुंदन


              महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन म्हणाल्या की, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने जी. टी. एम. या उपक्रमासाठी सहा वर्षासाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. जी. टी. एम. च्या उपक्रमाची अंमलबजावणी वर्ष २०२३-२४ पासून सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्राने लीड राज्य म्हणून राष्ट्रीय स्तरावर ‘माविम’ने केलेल्या कामांच्या यशोगाथांचे सादरीकरण केले. माविम ने आपल्या कार्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला बचत गटांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन सक्षमीकरण करणे, ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी महिला बाल विकास विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही त्या म्हणाल्या.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांनी केले.


00

Featured post

Lakshvedhi