*कुणी आपल्याला त्याचा अनुभव सांगितला की आपल्यालाही वाटतं की, मला पण तो अनुभव यावा. कुणी म्हटलं की हे स्तोत्र खूप प्रभावी आहे, हा मंत्र खूप भारी आहे, की लागले मागे त्या मंत्राच्या... अनुभव ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट असते, त्याला आला तसाच आपल्याला कसा येईल बरं?? प्रत्येकाचं प्रारब्ध, पापपुण्य, संचित, भाव हा वेगवेगळा असणार की नाही?*
*तुमची जिथं श्रद्धा, प्रेम आहे ना त्याच शक्तीचा तुम्हाला अनुभव येईल नेहमी. असं कोण न कोण तुम्हाला भेटत राहीलच आणि त्यांचे अनुभवही सांगत राहतीलच, त्यानं एवढं हुरळून जाऊ नये*
*अनुभव हा श्रद्धेतून जन्म घेत असतो. आपण जी उपासना करतोय, त्यावरच आपली श्रद्धा नाही, त्यामुळेच अनुभव येत नाही... विचित्र मानसशास्त्र आहे.*
*काही दिवस रामरक्षा म्हणायची, कुणी अजून काही म्हटलं की शाबरी कवच म्हणायचे. कुणी अजून काही... आयुष्य संपून जाईल, पण काहीच मिळणार नाही. जर १०० फुटांवर पाणी लागणार असेल तर एकाच ठिकाणी १०० फूट खणाल का १ फुटाचे १०० खड्डे खणाल??*
*तुलना करायची घाणेरडी सवय असते प्रत्येकाला. प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य असतंच की नाही?? गुलाबाचं फुल डोक्यात घालतात, झेंडूच्या माळा करतात, मोगऱ्याचा गजरा करतात. झेंडूचा गजरा करायचा प्रयत्न नका करू. प्रत्येक उपासना आपल्या जागी श्रेष्ठ आहे, पण आपल्या विचारानेच त्याला आपण कमीपणा आणतो. मन हे फार बेइमान असतं बरं. आपलं काम झालं नाही की देवच बदलायचा, हे कुठलं गणित? शेवटी सगळ्या नद्या समुद्रालाच जाऊन मिळतात ना??*
*एकदा समर्थ श्रीरामदास स्वामींकडून ज्याने गुरुमंत्र घेतला होता, असा माणूस श्री तुकाराम महाराजांकडे आला आणि म्हणाला की, "मला गुरुमंत्र द्यावा." तुकाराम महाराजांनी आपल्या अंतर्ज्ञानाने सगळं जाणलं आणि म्हणाले की, "ठीक आहे, पण तू तुझ्या गुरूंना मंत्र परत देऊन ये, मग मी देतो." मग आला हा समर्थांकडे आणि म्हणाला की, "मला तुमचा गुरुमंत्र परत करायचा आहे, याच्यात ताकद नाही." समर्थ हसले आणि म्हणाले की, "ठीक आहे. जा आणि चूळ भरून टाक त्या दगडावर." त्यानं तसं करताच त्या दगडावर सुवर्ण अक्षरात गुरुमंत्राची अक्षरे उमटली. मग त्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने समर्थांची माफी मागितली.*
*चंचलता आणि अस्थिरता हे मनाचं स्वरूप आहे. जितकी घाई कराल, तितकाच उशीर होत जाईल, हे विचित्र सत्य आहे. फलाकांक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला अधीर बनवते. जितकं मन फळासाठी आतुर, तितकंच ते श्रद्धाहीन असतं.*
*🌺श्री स्वामी समर्थ🌺*
No comments:
Post a Comment