Saturday, 28 January 2023

अर्थव्यवस्था आणि स्टॉकमार्केट अभ्यासक यांची पोस्ट

 अजय रायगडकर

अर्थव्यवस्था आणि स्टॉकमार्केट अभ्यासक यांची पोस्ट

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अडानीचा Game तसा सोपा आहे..


फक्त ६ टप्प्यात सांगायचा प्रयत्न करतो..👇


Step १ - आपल्या कंपनीचा IPO करायचा.

IPO केला म्हणजे आपल्या कंपनीचे किमान २५% शेअर्स मार्केटमध्ये देवाणघेवाण होते..आणि ती देवाणघेवाण किती किमतीला होते त्यावर पूर्ण कंपनीची किंमत ठरते.


Step २ - IPO त शेअर विकून आलेले पैसे मॉरिशस किंवा केमन आयलंड सारख्या कमी/ शून्य व्याजदर असलेल्या देशातल्या आपल्या किंवा आपल्याच कोणाच्या कंपनीच्या अकाउंटवर घ्यायचे.

म्हणजे सरकारला कराचा एक नवा पैसा द्यायला नको..😐


>>एकाच दिवशी तयार केलेल्या अडानीच्या ?खोट्या कंपन्या (चित्र क्र 1)


Step ३ - हा करमुक्त पैसा २ पद्धतीने वापरायचा..

 १) त्याच देशात नवनवीन कंपन्या तयार करायच्या आणि त्यात हा पैसा वळवायचा आणि त्याने भारतातल्या आपल्याच कंपन्यांचे IPO केलेले शेअर्स विकत घ्यायचे..पण इतके शेअर एकच कंपनी घेत असेल तर शंका येऊ शकते म्हणून- 


>> पैसा कसा वळवला असू शकतो👇


२) रा मार्ग वापरायचा - ह्यातील काही पैसा त्या देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांना द्यायचा..आणि त्यांना फक्त अडानीच्या कंपन्यात गुंतवणूक करायला सांगायची..!


>>Normally म्युचुअल फंड किमान २०-३० कंपन्यांत गुंतवणूक करतात..पण ह्या ५ फंड 👇 नी फक्त अडानीच्या कंपनीचेच शेअर्स विकत घेतलेत.


Step ४ - ह्या टप्प्यापर्यंत खूप शेअर्स ह्या ?खोट्या कंपन्यांनी विकत घेतल्याने, अडानीच्या शेअर्सची कृत्रिम टंचाई निर्माण होते आणि मग शेअर्सची किमंत आपोआप वाढायला लागते.त्या वाढत्या किमतीचा ट्रेंड तयार होतो..आणि एकदा का तो झाला की आणि मग ट्रेडर्स पण ह्या वाहत्या गंगेत उडी घेतात..!


कोणत्याही ट्रेडरचा फंडा असतो की जोपर्यंत शेअर्सची किंमत एका विशिष्ट प्रमाणात खाली येत नाही तोपर्यंत ते काही शेअर्स विकत नाही..म्हणून मग ह्या टप्प्यात अडाणीचे काम फक्त हे असते की शेअर्सची किंमत त्या विशिष्ट किमती (support खाली) खाली येऊ द्यायची नाही..आणि एकदा का असे झाले की -


शेअर्सची किंमत वाढत जाते..वाढतच जाते..अशाने मग LIC व भारतीय म्युचुअल फंड सारख्या मोठ्याना पण ह्या गर्दीत उडी मारावीच लागते..त्यांच्याकडे अमाप पैसा असतो..ते असेल त्या किमतीला शेअर विकत घेतच राहतात..आणि मग होतो स्फोट..शेअर्सच्या किमतीचा..न् अदनीचे शेअर्स वर्षात १०-२०+पट वाढतात !


Step ५ - ह्या टप्प्यात अडानी शेअरच्या किंमतीला काहीचच करत नाही..कारण आतापर्यंत ट्रेण्ड तयार झालेला असतो..शेअरची किंमत चॅनलमधे वाढत जात असते..अशा वेळी अदानी मग ह्या ?फुगवलेल्या शेअरची किमंत दाखवतो आणि ते शेअर तारण (Pledging) ठेऊन कर्ज घ्यायला सुरुवात करतो..लाखो कोटीची कर्ज..


ह्या कर्जाच्या पैशातून तो खरेदी करत सुटतो..सरकार..सॉरी..सरकारी कंपन्या..जमीन..बंदरे..विमानतळ.. माणसांची नीतीमत्ता(?!)..माणसे(?!).. सगळं सगळं..जे जे काही विकणे आहे ते ते सर्व तो विकत घेत सुटतो..व शेअर मार्केट मात्र ह्या गोष्टींना बिझनेसचा मोठा Win मानत शेअर्सचा भाव वाढवतच राहते..!


आणि मग कालपरवापर्यंत भारतातल्या पहिल्या १००त कसाबसा बसू शकेल असा अडाणी जगातील पहिल्या ५ श्रीमंत लोकांत जागा मिळवतो..तो वाढलेल्या शेअर्सच्या किमतीवर..सरकारी बँकाच्या कर्जावर..सरकारी LIC ने पडेल त्या किमतीला घेतलेल्या शेअर्सच्या बळावर..!


आता इथून पुढे काय ??

👇👇👇


ते माहीत नाही..पण जगातल्या जवळपास सगळ्या Scam मध्ये होते तसे ते इथेही होऊ शकते..👇


कोणीतरी आधीच श्रीमंत असलेला अजून जास्त श्रीमंत होईल..गरीब असलेला अजून गरीब होईल..फक्त LIC च्या जीवावर रिटायर होऊ पाहणारे काही मध्यमवर्गीय त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशाला मुकतील..काही बँका ज्यानी शेअर्सच्या तारणावर मोठ्ठं कर्ज दिले त्या तारणवाल्या शेअर्सची किंमत घसरल्याने बुडतील..मोठ्या SBI सारख्या बँकात NPA तयार होतील..ते NPA बुडीत काढण्यासाठी पेट्रोल डिझेल महाग ठेवले जाईल..अन् महागाई वाढत जाईल..श्रीमंत अजून श्रीमंत होत जाईल आणि गरीब अजूनच गरिबीत लोटला जाईल..!


जे म्हणतात..आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत नाही म्हणजे आम्ही safe आहोत..त्या लोकांना पण अडाणी बुडाला तर चटका नक्कीच बसेल..इतका पैसा LIC ने ह्या शेअर्समध्ये ओतलाय..इतकी कर्ज सरकारी बँकांनी दिलीत..अर्थव्यवस्था म्हणजे पत्तांचा बंगलाच जणू..एक पत्ता जागचा हलला अन् खेळ संपला..😐


टीप - हंडनबर्ग रिसर्च नावच्या एका प्रतिष्ठित संस्थेने अडाणी ग्रुप मधील फेरफार ह्यावर ३३ हजार पानांचा रिपोर्ट तयार केलाय..त्याचा ~ ५० ट्विटचा सारांश वाचून वरील १३ ट्विटचा कोणालाही समजेल असा मराठी थ्रेड लिहायचा प्रयत्न केला आहे तरी त्यात काही त्रुटी (imperfections) असू शकतात..🙏

Salutesss फौजी wife.

 


आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार.

 आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार.

- बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे.

            मुंबई, दि. 27 :- आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.


            सहयाद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा 30 वा वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे, इंटरनॅशनल जस्टिस मशीनचे संचालक येसुदास नायडू, फेसबुक पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या अँड गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण हे उपस्थित होते.


            मंत्री दादाजी भुसे म्हणाले,राज्य महिला आयोग गेल्या तीन दशकांपासून अत्यंत चांगले काम करत आहे. काही चांगल्या बाबी शासनस्तरावर प्रगतीपथावर आहेत.राज्यातील माता भगिनींना आनंद होईल असे महिला सन्मान धोरण प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे धोरण येत्या आर्थिक वर्षात अंमलबजावणी करताना दिसतील. महिला आयोगाने केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करणार आहे. ओमानमध्ये अडकलेल्या महिलांसाठी केंद्र शासनासोबत चर्चा करून यावर नक्कीच तोडगा काढू. आरोग्य विभागाच्या पुढाकारातून "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच कोटींहून अधिक महिलांची तपासणी झाली आहे.


            कृषिमंत्री म्हणून देखील काम केले तेव्हा महिला शेतकऱ्यांना कृषीच्या योजना प्राधान्याने राबवल्यामुळे अनेक ठिकाणी महिलांचे नाव सातबाराला लावले गेले. हा अत्यंत सकारात्मक परिणाम होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महिलांचे नाव सातबाराला लागले गेले. महिलांना शिक्षणामध्ये संधी आणि जगण्यामध्ये समान संधी देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत हे मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.


संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर - रुपाली चाकणकर


            संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर असून. आयोगापुढे नवी आव्हाने आहेत. कामाच्या ठिकाणी होणारा अत्याचार,सायबर गुन्हेगारी वाढली आहे त्यासाठी फेसबुकने सुरु केलेले 'मिशन ई सुरक्षा' कॅम्पेन महत्त्वाचे आहे. मागील पंढरपूरच्या वारीमध्ये राज्य महिला आयोगाने आरोग्य वारी आपल्या दारी उपक्रम सुरु केला. या सॅनिटरी नॅपकिन प्रथमच पुरवले.गेल्या 13 ते 14 महिन्यात आयोगाने विविध समस्या साडेदहा हजार केसेस दाखल केल्या त्यातील 9 हजारांहून अधिक केसेस निकाली काढल्या असेही श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या.


            श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या,मानवी तस्करीचे प्रमाण वाढले आहे.पुणे, पिंपरी चिंचवड मधील 85 महिला व युवती ओमानमध्ये अडकल्या आहेत.महाराष्ट्रातील महिला व युवतींची संख्या अडीच ते तीन हजारावर आहे.


            नोकरीचे अमिष दाखवत व्हिसा व पासपोर्ट काढून घेतले गेले आहेत.या महिलांवर लैंगिक अत्याचार केले गेले. भारतीय दुतावासासोबत संपर्क साधून पाठपुरावा करून या महिलांना सोडवणे गरजेचे आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड सारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मिसिंग सेल अॅक्टीव्ह होणे गरजेचे आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी दामिनी पथक व बीट मार्शल शाळेच्या आवारात ठेवा. पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीय पंथीयांचे स्वतंत्र विभाग सुरु केले आहे. 25 खाटांचे हा विभाग लवकर सुरू केला जावा, अशी सूचनाही श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केली.


            जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाउल उचलणारी हेरवाड ग्रामपंचाय तीचे सरपंच सूर गोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.


            राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, आयोगाच्या वर्ष २०२३ च्या कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन, राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.                                    


            राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांनी प्रास्ताविक केले. महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे, इंटरनॅशनल जस्टिस मशीन चे संचालक येसुदास नायडू, फेसबुक पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, यांनी मनोगत व्यक्त केले.

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला पंतप्रधानांच्या 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभाग

 लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला

पंतप्रधानांच्या 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभाग

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 27 : ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले.


            ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थ्यांना आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. त्याचबरोबर ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांचे त्यांनी आभारही मानले.


            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.


            परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा संदेश दिला. तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे, तणावाचा सामना कसा करावा, पालकांनी विद्यार्थांशी नक्की कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले.


मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेला भेट


            मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री. शिंदे आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. पंतप्रधानांच्या संवादानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शाळा क्रमांक २३ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, देशालाच एक कुटंब मानून, त्याच्या प्रमुखाच्या नात्यानं प्रचंड कामाच्या व्यापातही परिक्षा याविषयावर सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे पंतप्रधान आपल्याला लाभले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान श्री. मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. त्यांचे विचार ऐकणारे विद्यार्थी त्यातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि परिक्षेदरम्यान येणारा तणाव दूर सारून आपल्या क्षमता हेरून आपले आयुष्य घडवतील अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 


            परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी सुमारे १५० देशांतील विद्यार्थ्यांनी, ५१ देशातील शिक्षकांनी आणि ५० देशातील पालकांनी नोंदणी केली आहे. देशातील सुमारे ३८ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक आज या ‘परिक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत असे सांगतानाच विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आयुष्यात आलेल्या अपयशानंतर खचलो नाही, असे सांगितले.


‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत


            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक ठाणे महानगरपालिकेच्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.


मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत


            शाळा क्रमांक २३ विषयी आठवणी जाग्या करतानाच आपले वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री आठवणीत रमले.


            कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संगणक लॅब, वर्ग खोल्या, तसेच पिण्याच्या पाण्याच्या जागेची पाहणी केली. बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.


०००००

आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिनानिमित्त मंत्रालयातील चित्रप्रदर्शनास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट.

 आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिनानिमित्त मंत्रालयातील

चित्रप्रदर्शनास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट.

            मुंबई, दि. 27 : महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यू बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांची प्रार्थनास्थळे आणि संस्थांच्या देखभालीसाठी शासन नक्कीच प्रयत्न करेल, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.


        संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 27 जानेवारी हा ‘आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात पर्यटन विभाग आणि इस्त्रायल कॉन्सुलेटतर्फे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, इस्त्राइलचे वाणिज्यदूत कोबी शेनॉन तसेच वाणिज्यदूत कार्यालयाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते

मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना.

 मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी

चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना.

            मुंबई, दि. 27 : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी, चित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.


            ही पुनर्रचित समिती आता अर्थसहाय्याची शिफारस करेल. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख हे 15 अशासकीय सदस्य असतील. तर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत असेल.


            चित्रपट परिक्षणाकरिता 33 टक्के सदस्यांची उपस्थिती आवश्यक राहील. समिती सदस्यांनी केलेल्या शिफारशींवर योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्यासाठी २ मार्च पर्यंत मुदतवाढ.

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्यासाठी २ मार्च पर्यंत मुदतवाढ.

            मुंबई, दि. 27 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका व पुस्तके दि. १ जानेवारी, २०२३ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मागविण्यात आली आहेत. तथापि, या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दि. २ मार्च, २०२३ हा असणार आहे.


            विहित कालमर्यादेनंतर (१ जानेवारी, २०२३ ते २ मार्च, २०२३) येणाऱ्या प्रवेशिका व पुस्तके स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi