Thursday, 19 January 2023

दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी पदाच्या मुलाखतीनंतर पाच तासांत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर.

 दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी पदाच्या मुलाखतीनंतरपाच तासांत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर.

            मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या मुख्य कार्यालयात दिनांक ०९ ते १७ जानेवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती पार पडल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या ५ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.


             आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांना भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out ) दिनांक २४ जानेवारी, २०२३ पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तद्नंतर अंतिम शिफारस यादी गुणवत्ता यादीसह आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत

 महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत

१६ जानेवारी २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णयाबाबत

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने केलेले स्पष्टीकरण

            पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या १६ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयात हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख झालेला होता. सदरचा उल्लेख यापूर्वीच्या शासन निर्णयांमध्ये असल्याने त्याची पुनरावृत्ती अनवधानाने या शासन निर्णयामध्येही झालेली होती. आता सदर शासन निर्णयामध्ये आवश्यक तो बदल करून शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे, असे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने स्पष्ट केले आहे.


००००

दहिसर कांदळवन उद्यानाचा रस्ता सहा महिन्यात करावा

 दहिसर कांदळवन उद्यानाचा रस्ता सहा महिन्यात करावा

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. १९ : कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतचं कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन उद्यान’ उभे राहणार आहे. या उद्यानाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून उद्यानाला पोहोचणारा रस्ता सहा महिन्यात करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.


            सह्याद्री अतिथीगृह येथे कांदळवन उद्यानाबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार मनीषा चौधरी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, सहसचिव भानुदास पिंगळे, मनपाचे कार्यकारी अभियंता (रस्ते) सु.बा. बाविस्कर, कार्यकारी अभियंता (विकास) रा.आ. जाधव, उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले, मानवी जीवनासाठी आणि नैसर्गिक जैवविविधता टिकून राहण्यासाठी कांदळवनाचे महत्व आहे. कांदळवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याची शास्त्रीय माहिती जनतेला होण्यासाठी आणि त्यांच्या मनात कांदळवन परिसंस्थेबाबत आपुलकी निर्माण करण्यासाठी मुंबईत कांदळवन उद्यान उभे राहत आहे. दहिसर आणि गोराई येथे हे उद्यान उभे राहणार आहे. त्यातील गोराई कांदळवन उद्यानाचे काम सुरू झाले आहे. दहिसर येथील कांदळवनला पोहोचणारा रस्ता तयार करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने त्वरित आराखडा तयार करावा. नियमानुसार त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


0000

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचापरिपूर्ण विकास आराखडा सादर करावा

 कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचापरिपूर्ण विकास आराखडा सादर करावा

- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. १९ : कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.


            कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिम गुप्ता, सहसचिव भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक सरोज गवस आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवास संवर्धनाला प्राधान्य देत परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सूचित करुन कर्नाळा परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी अलिबाग येथील वन विभागाची मान्यता घेवून स्थलांतर करावे. कोणत्याही परवानग्या, मान्यता वन विभागाकडून प्रलंबित राहता कामा नये. कर्नाळा किल्ल्याची डागडुजी, दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.


            श्रीमती गवस यांनी यावेळी सादरीकरण केले. आराखड्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क, मुलांची खेळाची जागा, धबधबे, पुलांची दुरूस्ती, पाथवे, बचत गटांचे कॅन्टीन, प्रवेशद्वारावर आणि परिसरात सीसीटीव्ही, विद्युतीकरण, पक्षी निरीक्षण पॉईंट आदींचा समावेश आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलपासून १२ कि.मी. तर मुंबईपासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे मुंबईसह आसपासचे हजारो पर्यटक भेट देत असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्नाळा किल्ला हा पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. १२.१०९४ चौ.कि.मी. क्षेत्राच्या अभयारण्यामध्ये पक्षांच्या १४७ प्रकारच्या जाती आहेत. हिवाळ्यात ३७ स्थलांतरीत पक्षी येथे पहावयास मिळतात. विविध प्रकारच्या ६४२ वृक्षप्रजाती येथे आहेत. ११ प्रकारचे सस्तन प्राणी, २३ प्रकारचे सर्प, ५ प्रकारचे सरडे आणि बेडूक, १० प्रकारचे कोळी आणि फुलपाखरांच्या ५६ प्रजातीही येथे अस्तित्वात आहेत. या सर्वांचे जतन करून निसर्ग पर्यटन आराखडा अंतिम करावा.


००००



 



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन, स्वागत.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन, स्वागत.

            मुंबई, दि. १९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.


            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २ अ (दहिसर पूर्व ते डी एन नगर) व मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) चे उद्घाटन करण्यात येणार असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २० नवीन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे देखील उद्घाटन होणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सांडपाणी प्रक्रिया, रुग्णालय बांधकाम व पुनर्विकास, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आदी कामांचे भूमिपूजन होणार आहे.  


0000

Prime Minister of India Narendra Modi arrived in Mumbai.

      Mumbai, 19th Jan : Prime Minister of India Narendra Modi arrived in Mumbai on a day's visit. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, Chief Minister Eknath Shinde, Dy Chief Minister Devendra Fadnavis welcomed the Prime Minister.


      The Prime Minister will be dedicating to the people Mumbai Metro Line 2 A and 7 (Phase 2), open 20 new 'Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Aapla Davakhana' and lay the foundation of various projects during the visit.


0000



 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'एक्झाम वॉरियर्स' च्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'एक्झाम वॉरियर्स' च्या मराठी आवृत्तीचे प्रकाशनवि




द्यार्थांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे


- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


            मुंबई, दि. १९ : “प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास भयमुक्त वातावरणात केला पाहिजे, हाच संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वारियर्स’ या पुस्तकातून मिळतो”, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.


            नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रधानमंत्री श्री. मोदी लिखित 'एक्झाम वॉरियर्स' पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन आज राजभवन येथे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, आपल्या देशाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. अशा या आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाच्या माधमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपला अमूल्य असा भारत देश समजून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून आपला अभिमान बाळगला पाहिजे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विद्यार्थ्यांनादेखील योद्धा म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थी योद्ध्यांनी भयमुक्त होवून परीक्षा द्याव्यात. या पुस्तकाची प्रत प्रत्येक ग्रंथालयास द्यावी, असेही त्यांनी सांगितले.


एक्झाम वॉरियर्स ठरेल दीपस्तंभ : दीपक केसरकर


            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, उत्कृष्ट शिक्षण देणे महाराष्ट्राची परंपरा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रधानमंत्री श्री. मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल. मुलांचे भविष्य घडवण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे. मातृभाषेतून शिक्षण दिले जावे असे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वप्न आहे. मातृभाषेत सर्वोत्कृष्ट शिक्षण देता येते. आपल्या मातृभाषेतून शिक्षण मुलांना लवकर अवगत होते. ते त्यांना लवकर समजण्यास मदत होते. त्याचा लाभ त्यांना पुढील शिक्षणासाठी होतो. चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी शाखेची पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी मनातील भीती दूर करून पुढे गेले पाहिजे. हे पुस्तक प्रत्येक शाळेत पोहोचविण्याचे नियोजन शासनातर्फे करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


            गायत्री चौबे (गार्डियम स्कूल), आरव सांघवी (कॅम्पियन स्कूल), मोहन इराणी (सेंट मेरी स्कूल) प्रज्ञा दळवी (बालमोहन विद्यामंदिर), खलिदा अन्सारी (अंजुमन इस्लाम) या पाच शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. देओल यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव इम्तियाज काझी यांनी आभार मानले.


००००

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, २७ फेब्रुवारी रोजी मतदान

 विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, २७ फेब्रुवारी रोजी मतदान

            मुंबई, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड (जि. पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.


            आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या मतदारसंघांमध्ये तत्काळ प्रभावाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार दि. ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी छाननी होईल. शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर सोमवार २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल. गुरुवार २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर शनिवार ४ मार्च २०२३ रोजी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल.


०००००

Featured post

Lakshvedhi