Thursday, 12 January 2023

अल्पसंख्याक विकासविषयक विविध योजनांची

 अल्पसंख्याक विकासविषयक विविध योजनांची

प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या विविध विभागांना सूचना.


- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य कुमारी सय्यद शहजादी.

            मुंबई, दि. ११ : राज्यातील वक्फ बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यांच्या नियुक्त्या करणे, उर्दू अकादमीमार्फत मुशायऱ्याचे आयोजन करणे याबरोबरच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सय्यद शहजादी यांनी दिली. 


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ८ जानेवारीपासून आजपर्यंत त्या राज्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी विविध धार्मिक प्रमुखांशी चर्चा केली, तसेच राज्य शासनाचे मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव यांच्यासमवेत आढावा बैठका घेण्यात आल्या. मुंबईत अल्पसंख्याक समाजाच्या काही कार्यक्रमांना त्या उपस्थित राहिल्या. या कार्यवाहीसंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.


            त्या म्हणाल्या की, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत स्मार्ट वर्ग खोल्या, शौचालये, सदभाव मंडप हॉस्टेल्स इत्यादी योजना आहेत. केंद्र तसेच राज्य शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. या दौऱ्यामध्ये या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. राज्यात अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी २४ वसतिगृहे असून ८ वसतिगृहांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. यासाठी २०२१-२२ मध्ये १७.७३ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आल्याचे कुमारी सय्यद शहजादी यांनी सांगितले.


            वक्फ बोर्डाच्या जागांवरील अतिक्रमणे काढणे, बोर्डातील कामकाजासाठी मनुष्यबळाची उपलब्धता करणे, रिक्त जागांची भरती याअनुषंगानेही दौऱ्यामध्ये आढावा घेण्यात आला. मशीद, मदरसे, अशुरखाना तसेच कब्रस्तान यांच्या नोंदणीसाठी व्यापक प्रयत्न करावेत, जेणेकरुन शासनाच्या विविध सुविधा त्यांना मिळू शकतील, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.


            ख्रिश्चन समाजासह विविध अल्पसंख्याक समूहाच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. उर्दू अकादमीच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला असून मागील काही वर्षापासून कोरोना संकटामुळे बंद असलेला मुशायऱ्याचा कार्यक्रम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २६ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे दरवर्षीप्रमाणे मुशायऱ्याचा कार्यक्रम पुन्हा सुरु करावा, तसेच त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे कुमारी सय्यद शहजादी यांनी सांगितले.


००००

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

निधी समिती मदत व पुनर्वसन विभागास हस्तांतरीत करणार

समितीसाठी अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

            मुंबई, दि. ११ : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निधी समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. ही समिती मदत व पुनर्वसन विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत निर्देश देतानाच समितीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार मकरंद पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते तर आमदार पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


            या समितीच्या मार्फत कोयना भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येणाऱ्या आठ तालुक्यांच्या दुर्गम भागात वसलेल्या गावांच्या विकासासाठी भूकंप पिडितांना अर्थसहाय्य देण्यात येते. समितीमार्फत सन २०२२-२३ मध्ये विकासकामांसाठी प्रस्तावित ३० कोटी रुपये यावेळी मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर ‘महाजेनको’ने मार्चपर्यंत ३५ कोटी रुपये देण्याचा निर्णय यावेळी झाला.


            ही समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येत असून ती मदत व पूनर्वसन विभागास हस्तांतरीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता देतानाच समितीसाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश दिले.


०००००



३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

 पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते

३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन.

            पुणे, दि. ११ : राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे उद्घाटन करण्यात आले.


            यावेळी राज्याचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिह, कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद, होमगार्डचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.


            पुण्याच्या सांस्कृतिक आणि क्रीडा नगरीत पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे आयोजन होत असल्याबाबत आनंद व्यक्त करून श्री. सेठ म्हणाले, पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील एकूण १३ संघ सहभागी होत असून १८ क्रीडाप्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. राज्यातून २ हजार ५९० खेळाडू सहभागी झाले आहेत.


            पोलीस दलातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य, खेळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या स्पर्धेतील सहभागामुळे खेळाडूंचा दर्जा उंचावून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुण्यात पोलीस दलातील खेळाडूंसाठी पोलीस क्रीडा संकुल उभारण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असेही श्री. सेठ म्हणाले.


            श्री. सिंह म्हणाले, या क्रीडा स्पर्धेत सहभागी संघामध्ये अतिशय चुरशीच्या लढती होणार आहेत. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळावे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू तयार होतील त्याचा फायदा खेळाडू सोबतच राज्य पोलीस दलालादेखील होणार आहे. राज्य पोलीस दलातील खेळाडूंनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत सहभागी होऊन उत्तम कामगिरी करावी, असेही ते म्हणाले.


            यावेळी पोलीस महासंचालक श्री. सेठ यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. स्पर्धेत सहभागी सर्व १३ संघांनी शानदार संचलन केले. संचलनप्रमुख पोलीस उपनिरीक्षक किशोर कुमार टेंभुर्णे यांनी खेळाडूंना शपथ दिली. प्रारंभी पोलीस दलातील श्वान पथकाने सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांना तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.


0000






राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त

 राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन


        मुंबई, दि. १२ :- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


            'वर्षा' शासकीय निवासस्थानी हे अभिवादन करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अभिवादन कार्यक्रमास आमदार राजेंद्र पटणी आदी मान्यवर उपस्थित होते.


0000

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन.

            मुंबई, दि. १२ :- राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            मंत्रालयातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय सुधारणा) च्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, उपसचिव ज.जी.वळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनीही राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे

 युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे


- राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

            मुंबई, दि. १२ : युवाशक्तीसाठी स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि विचार मार्गदर्शक ठरणारे आहेत. विवेकानंद जीवनचरित्र मराठी, हिंदी, बंगाली अशा विविध भाषेत उपलब्ध आहे, युवकांनी हे चरित्र आत्मसात करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केले.


            स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद युथ कनेक्ट संस्थेच्यावतीने मुंबई शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.


            यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ॲड. आशीष शेलार, विवेकानंद युथ कनेक्ट संस्थेचे डॉ. राजेश सर्वज्ञ, गोपाल आचार्य, नानक रूपानी आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना यावेळी स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशात सर्वत्र युवा दिन साजरा होत आहे. तर, मॉ जिजाऊ यांची जयंती साजरी होत आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये पहिल्या भाषणात 'मेरे भाई और बहिनो' या वाक्यांनी सुरवात करून विश्वबंधुत्वाची भावना जगाला दाखवून दिली. आपल्या विद्वत्तेतून जगाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. विश्वकल्याण आणि प्रखर राष्ट्रभक्ती यांबाबत त्यांनी परखडपणे मांडणी केली. युवकांना जागृत करण्याचे काम त्यांनी केले.


             बदलत्या वातावरणामुळे वातावरणीय बदल, पर्यावरण, विकास याबाबत देशात सर्वांगीण विचार होत आहे. प्रगती, विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विवेकानंद युथ कनेक्ट संस्थेचे कार्य युवकांना एकत्र करून त्यांना वर्तमान आणि भविष्यात एकत्र ठेवणे अशा प्रकारचे आहे.


            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, जगाला विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करू असे सांगून ते पुढे म्हणाले की, मुंबईत आज बऱ्याच पायाभूत सुविधा होत आहेत मेट्रो, कोस्टल रोड व पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक कामे चालू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सौर उर्जेचे विविध स्रोत तयार करणे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, वाहतूक सिग्नलमध्ये सुसुत्रता आणणे, असे काम चालू आहे. देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा ३० टक्के वाटा आहे. मुंबईच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री श्री. केसरकर यांनी केले.


000000

मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज

 मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. १२ : वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबई एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी, त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.


            वर्षा निवासस्थानी यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतूक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच सादरीकरण करण्यात आले.


            एमएमआरडीए क्षेत्र एकात्मिक वाहतुक प्रणालीद्वारे जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबतच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईसाठी मल्टीडेक टनेल काळाची गरज असून, त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीम सोबत बैठक घेऊन या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.


            यावेळी आमदार राजेंद्र पटणी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारासू आदी उपस्थित होते.


००००



 

Featured post

Lakshvedhi